22 February 2020

News Flash

अ‍ॅण्टीसिपेशन

कुठेतरी अपेक्षाभंगाची थोडी भीतीही वाटत असते.

‘वेटिंग इजंट इझी. बट गेस, देअर इज फन इन अ‍ॅण्टिसिपेशन!’ असं वाक्य सुचलं परवा आणि ते स्टेट्स म्हणून टाकलं एफबीवर. ‘व्हॅलेंटाइन स्पेशल का?’ अशा प्रतिक्रियाही आल्या त्यावर एक-दोघांच्या. मीही ब्लशिंग आणि जीभ बाहेर अशा स्माइलीज् टाकून त्यावर ‘शब्दाविण संवाद’ वगैरे साधला. पण नंतर वाटलं हे वाक्य व्हॅलेंटाइनच काय तर दुसऱ्या कुठल्याही दिवसासाठी चपखल असंच तर आहे. एखादी हवी असलेली गोष्ट किंवा अपेक्षित उत्तर मिळेपर्यंतच्या प्रतीक्षेचा काळ ‘अ‍ॅण्टीसिपेशन कॅन बी फन’ची प्रचीती देणारा असाच तर असतो.

एखादी परीक्षा चांगली गेली किंवा एखाद्या स्पर्धेत उत्तम देऊन आल्यावर सुरू होतो तो हा अ‍ॅण्टीसिपेशनचा मजेदार काळ. मग तो काही मिनिटांचा असो वा अनेक महिन्यांचा, आपण तर चांगलं दिलंय त्यामुळे निकालही चांगलाच लागणार अशी ग्वाही देत असतं मन. कुठेतरी अपेक्षाभंगाची थोडी भीतीही वाटत असते. आणि मन झोके घेत राहतं या हो-नाहीच्या झुल्यावर.

एखादी व्यक्ती भेटते, जुन्या ओळखीचं कोणी नव्याने भेटावं तशी किंवा नव्याने भेटूनही जुन्या ओळखीची वाटावी अशी. ती आवडायला लागते आणि सुरू होतं मनाचं हिंदोळणं. आपल्याबद्दल काय वाटलं असेल त्याला? जे आपल्या मनात आलं तेच त्याच्याही मनात असेल? त्याचा मेसेज येईल की आपण त्याला फोनच करावा? पुन्हा भेटण्यासाठी तोही उत्सुक असेल आपल्या इतकाच? बहुधा असावा.. की तसं काहीच वाटलं नाहीये त्याला? पण मग तो हे असं कशाला म्हणाला असता, ते तसं कशाला बोलला असता? अनुकूल निकालाचे अंदाज बांधण्यातली मजा घेत असतं मन, दुसरं काय? अ‍ॅण्टीसिपेशनमधल्या फन एलिमेंटची प्रचीती येते अशाही वेळी.

या बाबतीतलं असो वा परीक्षा, स्पर्धा किंवा इंटरव्ह्य़ूबाबत, ती वाट पाहणं आणि त्यातला आशावाद खराच. मग आपण मिळवू पाहणारी गोष्ट मनाच्या जितकी जवळची, तितक्या या मजा आणि भीतीच्या भावनाही प्रखर. आपण गुंतत जातो त्या गोष्टीमध्ये, व्यक्तीमध्ये आणि त्याची एक प्रकारची नशा यायला लागते आपल्याला. मग ते स्वप्न काबीज करतं आपल्या विचारांना. पण हे वाऱ्यावर स्वार झालेलं मन मध्येच घाबरतंही. वाटतं, ही नशा उतरल्यावर काय? किंवा अपेक्षित निकाल नाही लागला तर? त्या हँगओव्हरवरचा उपाय कोणता आणि तो कोणाकडे मिळणार..?

पण काहीही असलं तरी ते झुरणं, झुलणं, अपेक्षाभंगाच्या भीतीवर आशेने, आत्मविश्वासाने मात करणं अनुभवायलाच हवं. आयुष्यात एकदातरी, उत्कटपणे मनापासून हव्या असणाऱ्या गोष्टीसाठी झटायलाही हवं मनापासून, त्याची वाटही पाहायला हवी वेडं होऊन. अपेक्षित तेच अ‍ॅण्टीसिपेशन करायला हवं, शंका, भीती सारं झुगारून देऊन. मस्त झोके घेणाऱ्या मनाला थांबवायचं कशाला? अगदी ती गोष्ट नाहीच मिळाली तरी एक समाधान तर राहील मनाला, प्रतीक्षेचा प्रत्येक क्षण भरभरून जागल्याचं.
मनाली ओक – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 16, 2016 1:15 am

Web Title: anticipation
Next Stories
1 देणाऱ्याचे हात
2 मॉर्निग वॉक
3 एक पावसाळी दिवस