News Flash

घे भरारी

एवढय़ात ‘काव काव’ ‘काव काव’ असा कावळ्यांचा एकच कलकलाट ऐकू आला.

दुपारची वेळ होती. आभाळ छान भरून आले होते. नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे हवेत एक हवाहवासा उबदारपणा भर दुपारीही जाणवत होता. घरी एकटीच होते. एकांताचा आस्वाद घेत खुर्चीत ताणून बसले होते. एवढय़ात ‘काव काव’ ‘काव काव’ असा कावळ्यांचा एकच कलकलाट ऐकू आला. आमच्या स्वयंपाकघराला गच्ची आहे आणि तिथूनच आवाज येत होता. काय झाले हे पाहायला मी उठून गेले. पाहते तर काय? दहा-बारा कावळे गच्चीच्या कठडय़ावर बसले होते आणि दोन-तीन कावळे गच्चीवरील पाइपावर बसले होते. एवढे कावळे का बरं आले असतील म्हणून उत्सुकतेने पाहिले तर गच्चीत खाली कावळ्यांची दोन छोटी पिल्ले होती. बहुधा पहिल्यांदाच घरटय़ातून उडाली होती. कारण ती दोन्ही पिल्ले चोच वर करून अतिशय केविलवाण्या नजरेने वर बसलेल्या कावळ्यांकडे पाहत होती. दोघेही पार बिचकून गेले होते. अगदी शाळेतल्या पहिल्या दिवशी नर्सरीतल्या बाळाची नजर असते ना अगदी तशीच पाहत होते ते. भिरभिरत्या नजरेने. एवढय़ात पाइपावर बसलेल्या कावळ्याने जरा जोरातच ‘काव काव’ केलं. बहुतेक ते त्यांचे वडील असावेत. दोन्ही पिल्लांनी तिरक्या नजरेने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. त्याबरोबर त्या कावळ्याने पंखांची फडफड केली आणि पाइपाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे गेला आणि ‘काव काव’ असे जोरात ओरडला. जणू तो त्या पिल्लांना आपल्याबरोबर उडायला सांगत होता.

मला मात्र ते बघून खूप आश्चर्य वाटले. मनुष्यप्राणी आपल्या बाळांना शिकवताना त्याचं बोट धरून शिकवतो आणि त्याच्या डोळ्यात आणि प्रत्येक शिकवणीत एक आपलेपणा असतो. मी का कोण जाणे त्या कावळ्यांच्या शाळेत दाखल झाले आणि दुरूनच त्यांची शाळा निरखू लागले. त्या जमिनीवरील एका पिल्लाने आपले पंख फडफडवले आणि आपल्या बाबांनी दाखवल्याप्रमाणे उडण्याचा प्रयत्न केला पण हुश्श! ते पिल्लू धडपडले आणि पटकन खालीच आले. त्याबरोबर आजूबाजूच्या जमलेल्या सर्व कावळ्यांनी एकच काव काव केली. जणू त्या पिल्लाला उडता येत नाही हे त्यांना झेपलंच नाही. पुन्हा एकदा त्या पिल्लांच्या बाबांनी जरा जोरातच काव काव केलं. जणू आता नीट लक्ष द्या असे त्यांनी सांगितले असावे. ती दोन्ही पिल्ले मान कलती करून चोच वरून आपले पाय उंच करून एकटक आपल्या बाबांकडे पाहत होती. त्यांची जणू वार्षकि परीक्षा होती कारण इथून उडून ते एका मुक्त जगात वावरणार होते. मुक्तपणे विहार करणार होते. अगदी स्वतंत्रपणे. पण या स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी त्यांना पंखात बळ एकवटायचं होतं.

आता त्या पिल्लांच्या बाबांनी पिल्लांकडे झेप घेतली. दोन-तीन वेळा पंख पसरवले, मग जोरजोरात फडफडवले आणि पायावर जोर देत काव काव करीत वर उडत पाइपावर येऊन बसले आणि खाली रागाने पाहिले. बहुधा त्याला पिल्लांनी आपल्याबरोबर उडावे असे वाटले असावे. इतक्यात वर बसलेल्या बाकी कावळ्यांनी ही काव काव सुरू केले बहुधा बक अप म्हणत असावेत. एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ! हे सूत्र त्यांनी अजूनही धरून ठेवले होते. त्या दोन पिल्लांतील एका पिल्लाने आता मात्र मनाचा निर्धार केला. सर्वप्रथम निर्धाराने वर बसलेल्या आपल्या बाबांकडे पाहिले. त्या बाबांच्या डोळ्यांत पाहिले. त्यांच्या डोळ्यांत त्याला उड उड अशी आज्ञाच दिसत होती. त्या पिल्लानेही मग भरारी घेतली आणि काय आश्चर्य ते पिल्लू उडाले की!. गच्चीच्या कठडय़ावर येऊन बसले. त्याबरोबर सर्व कावळ्यांनी काव काव करत अभिनंदन केलं आणि पंख फडफडवत आनंद व्यक्त केला. त्या उत्साहाच्या भरात पिल्लाने परत झेप घेतली आणि पाठोपाठ सर्व कावळे त्यापाठून काव काव करत उडत गेले. अरे पण या गडबडीत गच्चीच्या कठडय़ावर एका कोपऱ्यात चोच खाली करून भरलेल्या डोळ्यांनी एक कावळा बसला होता. कदाचित ती त्यांची आई असावी. कारण त्या पाइपवरच्या कावळ्याने जोरात काव काव केले की हा लगेचच अतिशय हलक्या आवाजात काव काव करत होता आणि हे करताना त्या पिल्लांकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहत होता. त्या नजरेने कळत होतं की तिला हे तर नसेल ना सांगायचं की नका हो ओरडू अजून. लहान आहेत हो ! या सर्व गोंधळात जवळजवळ तासभर तरी गेला. एक पिल्लू अजूनही गच्चीत होतं. परत परत पंख फडफडवत उडण्याचा प्रयत्न करत होतं पण थोडं उडालं की खाली पडत होतं. असं होता होता एकदा पटकन आमच्या ग्रीलवर बसलं. मी पटकन दरवाजा लावला; कारण माणसाचा स्पर्श पक्ष्यांना अमान्य आहे. त्यांच्या राज्यात आपण अस्पृश्य आहोत. इतक्यात एक कावळा परत पाइपावर बसला आणि कर्कश्शपणे काव काव करू लागला. त्यावरून ते त्या पिल्लांचे बाबा परत आले असे वाटले. त्याच्या त्या आवाजाने पिल्लू अजूनच आक्रसून गेलं. आता मात्र बाबांना बहुतेक राग आला. त्याबरोबर आलेल्या इतरही कावळ्यांनी जोरात काव काव करून त्या पिल्लाचा निषेध केला. त्यांच्या घराण्याला जणू काळिमाच तो. पक्ष्यांच्या जन्माला येऊन उडायची भीती वाटते म्हणजे काय? आणि ते सर्व कावळे उडून गेले. मीही परत आत येऊन बसले. मनात आलं आपण जाऊ का, असे आपल्या बाळाला सोडून?

मला राहवलेच नाही मी पुन्हा एकदा गच्चीच्या ग्रील जवळ गेले आणि पाहते तर काय.? त्या पिल्लाची आई, हो ती आईच असावी, खाली जमिनीवर उतरली होती. ती पिल्लाच्या जवळ गेली त्याबरोबर त्या पिल्लानेही काव काव करत टाहो फोडला. त्याबरोबर तिने आपल्या चोचीने त्या पिल्लाच्या चोचीला स्पर्श केला. बहुतेक पापीच घेतली. हळूहळू आपले पंख पसरवले, त्या पिल्लाला आपल्या पंखांखाली घेतलं. अगदी आईने घाबरलेल्या बाळाला कुशीत घ्यावं ना तसंच. आणि मग त्या बाळाला तिने मिठीतून दूर केलं. परत पंख फडफडवले, चोच वर केली, पाय उंच केले आणि थोडं उंच उडाली. असं तिने दोन-तीन वेळा केलं आणि परत पिल्लाजवळ आली. हळुवारपणे काव काव केलं. बहुतेक तिने समजावलं असेल, बाळा तुला उडालंच पाहिजे. त्यासाठीच आपला जन्म आहे. या वेळी त्या पिल्लानेही आपले पंख फडफडवले, भरलेल्या डोळ्यांनी आपल्या आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत आश्वासक भाव दिसले. तू उडू शकतोस आणि तू उडणार हा विश्वास दिसला. मग त्या पिल्लाने चोच वर केली, पाय उंच केले आणि भरारी घेतली. मीही माझा श्वास रोखून धरला होता. मी देवाजवळ प्रार्थना करत होते, आता त्याला उडता येऊ दे. आणि ते पिल्लू गच्चीच्या कठडय़ावर येऊन बसलं. त्याने खाली बसलेल्या आईला बघून काव काव केलं. असं दोन-तीन वेळेला ते वर-खाली गेलं. आता आईचा विश्वास वाढला होता. ती कठडय़ावर आली आणि तिने पुन्हा एकदा पिल्लाला अजून उंच जाण्याचे धडे दिले. ते पिल्लू हळूहळू वर वर उडू लागलं. आता मात्र पिल्लाचा आत्मविश्वास वाढू लागला. आणि बघता बघता त्याने आकाशात झेप घेतली. एकदाही मागे वळून पाहिले नाही त्या पिल्लाने. आणि इथे कठडय़ावर बसून आपले पिल्लू वर उडताना पाहताना तिच्या डोळ्यांतून जणू एक आनंदाश्रू पडताना मी पाहिला. अतिशय समाधानाने ती आई उडूनही गेली. आणि ते पिल्लू आपलं जग शोधत आपल्या वाटेने गेलं. मी मात्र अंतर्मुख झाले. एक आईच हे काम शकते, कारण आपल्या पिल्लाला जगामध्ये यशस्वीपणे उभं राहिलेलं पाहणं हेच तिचं ध्येय असतं आणि त्यासाठीच ती जगत असते. आई ही आईच असते, मग ती मनुष्यप्राण्याची असो की पक्ष्यांची!
मनीषा फडके – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:18 am

Web Title: baby crow learning to fly
Next Stories
1 अनुकंपा
2 ऊन येते, ऊन जाते
3 दुधावरची साय
Just Now!
X