News Flash

मना घडवी संस्कार!

आठवणींची आवर्तनं मनाला नवा दिलासा देतात.

आठवणींची आवर्तनं मनाला नवा दिलासा देतात. विस्मृतींच्या धुक्याआड विसावलेले भूतकाळाचे क्षण खऱ्या सुखाची झुळूक बनून येतात आणि वेदनांच्या प्रदेशात उतरलेले आठवाचे मनपक्षी काळजाला नवा तजेला देतात. त्या वेळी १४ वर्षांपूर्वी माझंही असंच काहीसं झालं. उदास मनाच्या संधिप्रकाशात स्वत:ला हरवून बसलो असताना पोस्टमनच्या अनाहूत हाकेनं तंद्री भंग झाली. अनामिक आनंदाची शिरशिरीच जणू अंगभर पसरून गेली. ‘कुणाचं असावं पत्र?’.. तो पोस्टमननं एक चिमुकलं गुलाबी रंगाचं पाकीट हातात दिलं. ते घेऊन मी त्यावरचं नाव वाचलं. अनाहूत आनंदाची अनुभूती मनाला आरपार स्पर्शून गेली. ते शुभेच्छापत्र होतं मनीचं. तिच्या कोवळ्या, निरागस अस्तित्वासारखाच त्या पाकिटाचा स्पर्शही मुलायम-निरागस जाणवत होता..‘मनी’, माझी १५ वर्षांपूर्वीची विद्यार्थिनी. त्या वेळी मी ‘किनवट’च्या एका शाळेत नव्यानेच शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. तारुण्याचा, उमेदीचा आणि संघर्षांचा तो काळ. नवी स्वप्ने, नव्या आशा-अभिलाषा आणि जबाबदाऱ्याही नव्याच.. अध्यापनाचं क्षेत्र मला तसं नवीनच होतं. पण आयुष्याच्या वळणावर पहिलंच पाऊल ठेवलेली ५ ते १० वर्षांची ती कोवळी मुलं भोवती किलबिलायला लागली तसा मी माझ्यातल्या मलाच हरवून गेलो. माझी व्यक्तिगत सुखं-दु:खं त्याच्या निरागस अस्तित्वापुढं थिटी वाटू लागली. त्यांचे टवटवीत मोगरी चेहरे आयुष्य गंधाळू लागले. निरनिराळ्या स्वभावाची ती निरनिराळी मुलं-मुली.. स्वत:त हरवेलला संदीप, भावनिक कल्पना, गोड हसरी आम्रपाली, नाजूक मनाची ज्योती, खटय़ाळ तितकीच गोड सपना, कलासक्त बालकिशन, खोडकर अनिरुद्ध, टपोऱ्या गुलाबासारखी प्रियंका, आत्ममग्न दीक्षा, लाघवी अनुजा, नृत्यकुशल करुणा, जिद्दीनं यश खेचून आणणारी नीता, साधी सात्त्विक प्रणिता, निरागस निष्पाप मनीषा आणि असेच किती तरी ..मनीचं ते चिमुकलं पत्र हातात असताना ती सारी र्वष फ्लॅशबॅकसारखी सरकत गेली. या सर्वात मनीचं स्थान खूप वेगळं. बालसुलभ निरागसता आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता याचं अजब मिश्रण तिच्यात सतत जाणवायचं. अभ्यासाइतकंच चित्र, गायन, नृत्य, अभिनय यातही तिनं वर्चस्व टिकवलं. तिच्या नाचण्या-बागडण्यानं शाळा फुलून गेली. तिच्या अस्तित्वाने निसर्ग सहलींना नवे अर्थ प्राप्त झाले. पुढं र्वष सरकत गेली. मीही माझ्या व्याप्यात बुडून गेलो. अस्तित्वहीनतेची ती र्वष जगणं म्हणजे जणू सत्त्वपरीक्षाच होती. जणू तेच माझं प्राक्तन होतं. पण पाणी डोक्यावरून वाहून गेलं आणि एके दिवशी मनाच्या द्विधा अवस्थेत शाळेच्या अर्थशून्य अस्तित्वाला कंटाळून मी ती शाळा सोडली आणि ते शहरही.. या वेळी मी पराभूत होतो. मानसिक द्वंद्वाच्या अशा अवस्थेत मुलांचा निरोप घेणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. मी त्यांना तसाच सोडून तिथून निघून आलो. शल्य डाचत होतं पण वेळ निघून गेली होती. विचारांच्या गर्तेत हरवून गेलो असतानाच पाकिटातील सुंदर नाजूक शुभेच्छा कार्डानं भानावर आलो. सोबत एक चिमुकलं पत्रही होतं. मनीनं लिहिलेलं. तिनं लिहलं होतं, ‘‘सर! जाताना तुम्ही आम्हाला भेटलाही नाहीत याचं वाईट वाटलं.. तुम्ही दिलेले संस्कार आम्ही कधीच विसरणार नाही!.. त्याला तडेही जाऊ देणार नाही!..नववर्षांच्या शुभेच्छा!..’’  मनीच्या पत्रातली ती वाक्यं मी पुन्हा पुन्हा वाचली. आणि आयुष्यात शिक्षक झाल्याचा प्रथमच अभिमान वाटला. या १५ वर्षांत मी लौकिकार्थाने काहीही मिळवू शकलो नाही.. पण या मुलांना-मुलींना संस्कार देऊ शकलो याचा प्रत्यय मनीच्या या वाक्यांनी आणून दिला. एक सुखद अनुभूती, एक सुखद जाणीव मनाला स्पर्शून गेली. बाराखडी गिरवताना पाटीआड चेहरा लपवून मुसमुसणारी ५ वर्षांची मनी इतकी प्रगल्भ झाली. हा कोणता संस्कार? अर्थातच हे तिचं आत्मनिवेदन होतं.. नवी र्वष येतात जातात. जीवन धावत राहतं पण नववर्षांच्या उंबरठय़ावर मनीचं ते पत्र जणू नव्यानं येतं. आणि अस्तित्वाला नवा अर्थ प्राप्त करून देतं. आज संस्कारशीलतेला नव्यानं रुजवण्याच्या काळात माझ्या त्या कोवळ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मला पत्र लिहून माझ्या संस्कारांची जाणीव त्याच्या शब्दांतून दिली. मनीचं ते गोड पत्र मी जपून ठेवलं आहे. आणि मनाच्या कप्प्यात तिच्या संस्कारशील निरागस भावनांनाही.. शेवटी तीच तर खरी आयुष्याची कमाई आहे…

प्रा. संजयकुमार बामणीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:09 am

Web Title: blog 16
टॅग : Blog,Blogger Katta
Next Stories
1 डार्विनच्या भाषेत एचआर!
2 आई
3 आनंदाची खिरापत
Just Now!
X