फॅण्टसी- इंग्रजीमधल्या या शब्दाचा अर्थ काय?
कोरी कल्पना- अशी कल्पना जी एकदम भिन्न आणि सुंदर असते. पण ती आपली असते. जगात प्रत्येकाची काही तरी कल्पना असते. ज्यावर ते सतत विचार करत असतात. स्वत:चे विणलेले रंगीत स्वप्न आणि त्या स्वप्नांचे पूर्ण होण्याचे किंवा त्यांना पूर्ण करता येण्याचे विचार भरपूर असतात. हीच ती ‘फॅण्टसी’ जी आपल्या मनाला खूप आनंद देते. पण आपल्या या फॅण्टसीशिवायही एक फॅण्टसी असते, जी गेल्या दोन वर्षांपासून मी अनुभवत आहे.
एक कोमल मनाची ‘फॅण्टसी’.. सुंदर, भावपूर्ण आणि अतिशय निराळी कल्पना.
कल्पना- माझ्या बाळाची. त्याच्या मनात आलेल्या प्रश्नांची. त्यांनी कळत-नकळत केलेल्या विचारांची. खरे म्हटले तर एका लहान बाळाचे जीवन जगणे म्हणजेच सुखी जीवन जगणे आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्याबरोबर वेळ घालवला की जीवनातल्या सगळ्या दुसऱ्या विचारांना विसरून जावेसे वाटते.
माझ्या बाळाची ‘फॅण्टसी’ म्हणजे एक वेगळेच जग. जिथे आहे त्यांनी विणलेले स्वप्न आणि कल्पना.
‘‘आई, माझी ही ट्रेन थूप छान आहे ना.. आपण हे फ्रिजमधे थेऊ या.. आनि थंदी झाली की छान भाजी कलुया।’’
रात्री झोप येत नाहीये आणि म्हणून आईला म्हटले, ‘‘आई आपण पेंटिंग कलुया का?’’ कसली पेंटिंग करू या विचारले तर आकाशाकडे बघून म्हणतो, ‘‘अं आपण या मूनची पेंटिंग तलु का? थूप शुंदल दिसेल ना..’’ आणि त्यांनी म्हटल्याबरोबर मी बसले त्याला घेऊन रात्री १२.३० वाजता मूनची पेंटिंग करायला. छोटय़ा छोटय़ा नाजूक बोटांनी ब्रश पकडून माझ्याबरोबर पेंटिंग पूर्ण केली. पेंटिंग झाल्यावर त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर खूप सुंदर दिसत होता. एक समाधान मनाला. आपण एक आवडीचे काम पूर्ण केल्याबद्दल. आईने त्याला पायजे तसे करू दिल्याबद्दलचा आनंद.
धावत बाल्कनीत जातो आणि म्हणतो, ‘‘आई आता आपल्या कळे आपला मून आहे ना..’’ मग स्वत:च्या कॅन्व्हासकडे बघून आणि आकाशातल्या मूनला दाखवून म्हणतो, ‘‘आई सेम-सेम आहे ना..’’ सकाळी उठल्यावर..‘‘आई..बद-बद तो मून गेला.. आपला आहे ना.. आपण सगळ्यांना दाखवू या!’’
वर्किंग लेडी असल्यामुळे असे किती तरी क्षण असतात जे आपण नाही जगू शकत.. आपल्या बाळाबरोबर. पण जितकेही क्षण आपण त्यांना देऊ शकतो ते खूप महत्त्वाचे. काम करणे चुकीचे नाही. पण त्याचे अधीन होऊन जगातील सर्वात सुंदर ‘फॅण्टसी’कडे दुर्लक्ष करणे नक्कीच चुकीचे आहे.
माझ्या बाळाने विचारलेला एक खूप संदर प्रश्न. ज्याला ऐकून मला हसू आले.
रोजप्रमाणे ऑफिसमधून घरी आल्यावर मी किचनमध्ये काम करत असताना बघतो- सगळे आवरून झाले की हात धुणे, मग लाइट बंद करून त्याला जवळ घेणे. त्या दिवशी किचनच्या दारावर उभा राहून विचारतो, ‘‘आई.. तुझे बॉस तुला हॅण्डवॉश पण देतात का, काम झाल्यावर?’’
काम करणे म्हणजेच ते आहे, जे घरी आई आणि आजी वगैरे करतात.
‘‘आई तू ऑफिसमधे का जाते?’’.. आपण जेव्हा छान अभ्यास करतो. आपल्याला जे आवडते, ते सुंदर गोष्टी करतो. जे काम केल्याने कोणाला त्रास नाही देत.. मग मोठे झाल्यावर बाप्पा आपल्याला तसेच आवडीचे काम देतो. जे आपल्याला ऑफिसमध्ये बसून करायचे असतात.
‘‘हो ता.. मी पण छान ताम तलेल.. आज आपण थूप मोथी पेंटिंग तलु या..तू पण ऑफिसमधे छान ताम तल्ते ना..’’
मुलांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हवे असते आणि आपल्याला नेहमीच ते उत्तर देता येईल, हे पण आवश्यक नाही. तरीही असे उत्तर द्यायचा प्रयत्न नेहमी करू शकतो, जे त्यांना समजू शकेल, जे उत्तर त्यांच्या वयानुसार त्यांना समजेल.
लहानपणाची सुंदर आणि निर्मळ ‘फॅण्टसी’, जी प्रत्येक मुलाची वेगळी आणि भिन्न अस्ते. आणि त्या ‘फॅण्टसी’ला अनुभव करून त्यात जगण्यातही एक वेगळाच आनंद असतो.
ज्योती अस्तूनकर – response.lokprabha@expressindia.com