18 October 2019

News Flash

माणूसपण हरवलंय

शिकवता शिकवता मनात आलं, माणूस किती बदलत चालला आहे.

त्या दिवशी विद्यार्थ्यांना ‘मनोहर सोनावणे’ यांचा ‘बदलते शहर’ हा लेख शिकवत होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘‘काही वर्षांपूर्वीपर्यंत या शहराचा चेहरा अगदीच मध्यमवर्ग हाच होता. कदाचित पेशाने आणि आमदानीने लोका- लोकांमध्ये काही फरक असेलही. पण राहण्याच्या, जगण्याच्या तऱ्हांमध्ये फार मोठं अंतर होतं असं नाही.’’ मग शिकवता शिकवता मनात आलं, माणूस किती बदलत चालला आहे. पूर्वी आदिमानव निवाऱ्याकरिता गुहेत राहात असे. हळूहळू गरज वाढत जाऊन तो एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला. त्यातून गावं, शहरं वसत गेली. आज या गरजेचे रूपांतर इतके मोठे झाले आहे की आपले घर १२ व्या की १४ व्या मजल्यावर असावे याबाबत मानवामध्ये अहमहमिका सुरू आहे. परंतु, इतक्या उंचीवर राहात असताना माणुसकी, आपलेपणा, मायेचा ओलावा, एकमेकांना समजून घेऊन एकमेकांची विचारपूस करण्याचे एटिकेट्स् मात्र कुठे तरी लुप्तच  झालेले दिसतात. सगळंच जणू संकुचित झालंय. घरं उंच झाली, पण मनं मात्र जणू लहानच राहिली. ‘सेकंड होम’सारख्या संकल्पनेतून आज कित्येक कुटुंबांची दोन तरी किमान घरं आहेत. पण स्वत:च्याच वृद्ध आई- वडिलांना सामावून घेण्याकरिता घरं कमी पडतात. एवढंच नव्हे तर मोठी घरं घेताना त्यासाठीचे कर्जाचे हप्ते भरताना जिवाचा नुसता आटापिटा कित्येक जोडपी करताना दिसतात. पण, या सगळ्या धडपडीत त्या घराचा उपभोग घेणं तर विसरूनच जातं.

एक आजी त्या दिवशी सांगत होत्या, ‘‘मुलाला म्हटलं, आता तू घर मोठं घेतलंस तर बोलाव एकदा सगळ्या नातेवाईकांना, दिवाळीही आहेच.’’ तर मुलगा म्हणाला, ‘‘कशाला उगाचच? आणि नातेवाईक हवेतच कशाला? तुम्हाला विचारायचं तर विचारा, पण आम्हाला मात्र सांगू नका.’’ कोणालाच गरज नाही. जणू काही माणसातलं माणूसपण हरवत चाललंय. कुठेही अपघात झाल्यावर त्या जखमी व्यक्तीला डॉक्टरकडे नेण्याऐवजी त्याचे फोटो काढणं महत्त्वाचं झालंय.

आपापसांत एकमेकांना समजून घेणं, मदत करणं आता दुर्मीळ झालंय. नाती ही बऱ्याच अंशी व्यवहारावर चालताना दिसतात. तशी ती पूर्वीही होती, पण आता या व्यवहाराने फार मोठे स्वरूप घेतलेले दिसते. लग्नाच्या गाठी बांधतानाही ‘पॅकेजला’ महत्त्व आहे. त्या व्यक्तीचा गुण, चांगुलपणा, शिक्षण यापेक्षा ‘पॅकेज किती’? हा प्रश्न महत्त्वाचा ठरवला जातोय. यातही लग्नानंतर असं आढळून आलं की आपला ‘चॉइस’ चुकला किंवा ‘आपलं जमत नाही’ तर सरळ जोडीदाराशी घटस्फोट घेऊन रीतसर सोडून द्यावं. इतका ‘प्रॅक्टिकलपणा’ नात्यात दिसतो.

शहरातच काय पण ग्रामीण भागातही थोडय़ाफार फरकाने माणुसकीचे कोरडेपण दिसून येत आहे. पूर्वी शेतात पीक काढून झाल्यावर धसकटे काढण्याकरिता गुरांना शेतात सोडलं जायचं जेणेकरून ती धसकटे गुरांनी खाल्ल्यावर गुरांचे पोषणमूल्य वाढायचे व शेतकऱ्याचेही काम होऊन जायचे. परंतु, आता एकतर हे काम करण्याकरिता गुराखी तरी पैसे घेतो नाहीतर आपल्या शेतात गुरे सोडण्याकरिता शेतकरी तरी पैसे घेतो. एवढंच नव्हे तर रोज सकाळी भाजी मंडईत आदल्या दिवशीच्या जुडय़ाच्या जुडय़ा कचऱ्यात सर्रास फेकून दिलेल्या दिसतात. पण, या जुडय़ा थोडय़ाशा खराब होण्याअगोदरच एखाद्या गरिबाला कमी पैशात देण्याचा दानशूरपणा या आप्पलपोटी जमान्यात निश्चितच दिसत नाही.

पैसा, छानछेकी प्रत्येक गोष्टीतील इव्हेंट, पाटर्य़ा, टेक्नॉलॉजी यामुळे चंगळवाद इतका वाढलेला दिसतो की यामध्ये माणसामाणसातील माणुसकी, प्रेम यांची जागा प्रतिष्ठा, पैसा, दिखावा, मोठेपणा यांनी घेऊन माणसातील माणूसपण हरवून बसलंय.
आरती भोजने – response.lokprabha@expressindia.com

First Published on April 29, 2016 1:12 am

Web Title: blog lost humanity