News Flash

डार्विनच्या भाषेत एचआर!

एचआर ही प्रजात अंगी कुठलेही गुण न बाळगता इतरांशी स्पर्धा करून टिकून राहू शकते.

चार्ल्स डार्वनिचा उत्क्रांतीचा सिद्धान्त असं सांगतो की, ‘‘कालानुरूप प्रत्येक प्रजातीचा जीव स्वत:मध्ये बदल घडवून आणतो, जेणेकरून तो जीव इतर जीवांशी स्पर्धा करूनही टिकून राहू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो.’’

नाही नाही.. या सिद्धान्तावर आक्षेप नाहीये माझा. किंबहुना आक्षेप घेण्याएवढी पात्रतासुद्धा नाहीये. पण काहीही म्हणा, या डार्वनिभाऊंना दूरदृष्टी नव्हतीच. मुळात त्यांनी अभ्यास केलेल्या प्रजातींशिवाय अस्तित्वात येऊ शकणाऱ्या काही प्रजातींकडे त्यांचे दुर्लक्षच झाले. त्यापकीच एक प्रजात म्हणजे ुमन रिसोर्स किंवा एचआर! डार्वनिभाऊंच्या आदरार्थ या प्रजातीची ओळख त्यांच्याच शैलीत करून देतो.

‘‘एचआर ही प्रजात अंगी कुठलेही गुण न बाळगता इतरांशी स्पर्धा करून टिकून राहू शकते. एवढेच नव्हे तर, स्पर्धा न करतासुद्धा ही प्रजात इतरांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते.’’

एचआर ही प्रजात अल्पसंख्याकांमध्ये येत असली तरी त्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होते आहे. या प्रजातीचा उदय कॉर्पोरेट संस्कृतीत झाला. फार पुरावे उपलब्ध नसले तरी ढोबळमानाने भांडवलशाही आणि समाजवाद यांच्या संघर्षांत या प्रजातीची पाळेमुळे असावी. कामगार आणि नोकरदारांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना योग्य तो मोबदला आणि हक्क देण्यात यावे या हेतूने ुमन रिसोर्स ही संस्था स्थापन झाली असावी, आणि इथेच थोडा घोळ झाला. कामाचे मूल्यमापन करणे वगरे ठीक आहे, पण ते कोणी करावे याविषयी काहीच नियम ठरवण्यात आले नाही. बरं या मूल्यमापन करणाऱ्यांनी स्वत: कोणती कामगिरी पार पाडावी याविषयीसुद्धा मौन बाळगले आहे. प्रजातीची उत्क्रांती होता होता त्यांनी स्वत: काही जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या. म्हणजे एखाद्या कामगाराच्या कौशल्याप्रमाणे त्याला काम देणे, नवनवीन कामगारांना नोकरी देणे वगरे वगरे. या जबाबदाऱ्या घेताना आपली प्रजात ही सर्वगुणसंपन्न आहे असा समज करून घेतलेला आहे. खरं म्हणजे या प्रजातीच्या उत्क्रांतीची आणखी एक थिअरी प्रचलित आहे. काहींच्या मते इसापनीतीतील ,‘दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ’ या गोष्टीतलं माकड हे या प्रजातीचा आद्य पुरुष आहे. या बाबतीत डार्वनिच्या सिद्धान्ताचा आधार घेता येऊ शकतो. डार्वनिच्या मते, माकडामध्ये बदल घडून मानव उत्क्रांत झाला. पण एचआरच्या बाबतीत माकडामध्ये खरंच काही बदल घडले की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकतो.  त्या गोष्टीतलं माकड जसं काहीही न करता मेवा खाऊन जातं तसंच आजच्या काळातही घडताना दिसतं. स्वत: मेवा नाही खाल्ला तरी चालेल, पण इतर कोणाला तो मिळणार नाही याची खातरजमा ते नक्की करतात.

आजकाल या प्रजातीमध्ये महिलावर्गाचे प्रमाण वाढले आहे. बहुतेक यांच्यातही ५० टक्के आरक्षण लागू झालं असावं. या प्रजातीत स्त्री- पुरुष असा भेदभाव केला जात नाही आणि कित्येक कामात महिला पुरुषांपेक्षा वरचढ असल्याचं यांनी आधीच मान्य केलं आहे. तसंही ‘‘मला पाहा अन फुलं वाहा’’ या तत्त्वज्ञानाचे पुरस्कत्रे असलेल्या या प्रजातीमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महिलांना पुढे आणणं क्रमप्राप्त होतं. कारण यांच्यातल्या पुरुषांकडे पाहून इतर प्रजाती दगड फेकून मारण्याची शक्यताच जास्त आहे. पण एका बाबतीत ही प्रजात अत्यंत समंजस आहे. काहीही झालं तरी एचआर मंडळी िहसक प्रत्युत्तर देत नाही. अर्थात अगदीच एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करतात असं नाही. त्यांची प्रत्युत्तर देण्याची पद्धत वेगळीच आहे. सशाला गाजर दाखवून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते शिकार करतात. आणि तरीसुद्धा ससा वाचला तर ते दुसऱ्या जंगलातून उच्च जातीचे ससे आयात करतात. कालांतराने आपला ससा स्वत:च जंगल सोडून जातो. हा प्रकार बघून इतर ससे थोडासा उठाव वगरे करतात, पण त्यांनाही याच मार्गानी शांत बसवले जाते.

का कोण जाणे, पण सामान्य मानवजात आणि  एचआर यांच्यात फार सलोख्याचे संबंध नाहीत. दोघांनाही एकमेकांविषयी फार तक्रारी आहेत.

मानवजात म्हणते, ‘‘आम्ही लाख नालायक असू पण हे ठरवणारे एचआर कोण? त्यांची पात्रता काय?’’

तर यावर एचआरवाले म्हणतात, ‘‘आम्ही कोण म्हणुनी काय पुसिता? आम्ही मॅनेजमेण्टचे लाडके!’’

मानवजात- ‘‘ह्यंच्या शब्दावर कधीच विश्वास ठेवू नये.’’

एचआर- ‘‘एक बार हमने कमिट्मेण्ट कर दी, तो हम सौ बार उससे मुकर सकते हैं!’’

मानवजात- ‘‘हे स्वत: तर काहीच करत नाहीत. रिकामटेकडे आहेत!’’

एचआर- ‘‘अपने काम से काम ना रखना यही हमारा काम हैं!’’

आता एचआरच्या कामाचा विषय निघालाच आहे तर तेसुद्धा आपण विस्ताराने समजावून घेऊ. पण त्याआधी यशस्वी एचआर होण्यासाठी आवश्यक असलेले गुण लक्षात घेऊ या. मुळात अयशस्वी एचआर ही एक कविकल्पना आहे. अजून तरी अयशस्वी किंवा निराश झालेला एचआर माझ्या पाहण्यात आला नाही. कारण एचआरच्या प्रत्येक खेळाचा नियम ‘‘चित भी मेरी पट भी मेरी’’ इथूनच सुरू होतो. असं असूनही जर चुकून समोरचा जिंकलाच तर  ‘आय विल कम बॅक टू यू ऑन धिस’ असं एखादं शस्त्र वापरण्यात येते. एचआरचं संभाषण कौशल्य चांगलं असलंच पाहिजे असं आवश्यक नाही. फक्त काही परवलीचे वाक्य आलटून पालटून योग्य ठिकाणी वापरणं त्यांना जमलं पाहिजे. उदा. एखाद्या कामगाराने तक्रार वगरे नोंदवली असेल तर लगेच, ‘धिस इज अ‍ॅज पर कंपनी पॉलिसी’ असं उत्तर येतं. किंवा एखाद्याने काही मागणी केली असल्यास लगेच, ‘वुई आर वर्किंग ऑन इट’ असं उत्तर येतं. एखाद्याला समजवायचे असल्यास, ‘सी कंपनी हॅज बिग प्लान्स. लूक अ‍ॅट द बिगर पिक्चर’ ही भाषा आणि एखाद्याला समज द्यायची असल्यास, ‘सी, यू शूड लर्न टू मॅनेज युवर प्रायॉरिटीज अ‍ॅट वर्क अ‍ॅण्ड इव्हन इन लाइफ’ ही भाषा!

एचआर लोकांना त्यांच्या कामाचाच एक भाग म्हणून कामगारांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे लागते. अशा उपक्रमांना त्यांच्या भाषेत एम्प्लॉयी एंगेजमेंट अ‍ॅक्टिव्हिटीज असं म्हणतात. ह्यचाच पर्यायी अर्थ ‘रिकाम्या हाताला काम’ असाही होऊ शकतो. कंपनीतल्या विविध कर्मचाऱ्यांमध्ये आणि विभागांमध्ये खेळीमेळीचे वातावरण राहावे यासाठी एचआरला विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यांचे ‘ते’ विशेष प्रयत्न अत्यंत गुप्ततेने सुरू असल्यामुळे त्याचे तपशील आणि सक्सेस रेट कधीही दृश्य स्वरूपात बाहेर येत नाहीत. नवीन कर्मचाऱ्यांना कामावर घेताना एचआरला अत्यंत डिप्लोमॅटिक अ‍ॅप्रोच ठेवावा लागतो. गेंडय़ाची कातडी आणि कोल्ह्य़ाची बुद्धी असल्याशिवाय हे शक्य होत नाही. कर्मचारी आणि मॅनेजमेण्ट यांचातील दुवा म्हणूनसुद्धा एचआरला काम करावं लागतं. बरेचसे एचआर या बाबतीत चाणक्याला आपले आद्यगुरू मानत असले तरी त्यांचे वर्तन नारदमुनींपेक्षा वेगळे नसते.

ही प्रजात मॅनेजमेण्टची कितीही आवडती असली तरी काही आघाडय़ांवर मात्र अजून म्हणावं तसं यश मिळवू शकली नाही. वर्षांनुवर्षांपासून ही प्रजात जनमानसामध्ये आदराचे स्थान मिळवायचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्या पदरी उपेक्षाच येत आहे. शेवटी यांच्यातल्या काही तज्ज्ञांनी एकत्र येऊन यावर उपाय शोधण्याचे ठरवले. या मंथनातून कितीतरी प्रभावी उपाय सुचवले गेले. पण वर्षांनुवष्रे फक्त उपाय सुचवण्याचाच अनुभव असलेल्या या प्रजातीसमोर, ‘उपाय अमलात आणायचा कसा?’ हा प्रश्न उभा राहिला आहे. अर्थात या प्रश्नावर ते लवकरच उपाय शोधतील याबद्दल शंका नाहीच!!
चिनार जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2015 1:10 am

Web Title: blog on hr people
टॅग : Blogger Katta
Next Stories
1 आई
2 आनंदाची खिरापत
3 फॅण्टसी
Just Now!
X