घटना तशी काही फार जुनी नाही. आणि, आपण प्रत्यक्षपणे या घटनेत असलो नसलो तरी, संवेदनशील मनांतून अशा विदीर्ण करणाऱ्या घटना कधी पुसल्याही जात नाहीत.

‘माळीण’ गावावर ओढवलेल्या अस्मानी सुलतानीच्या बातम्यांनी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील प्रत्यक्ष चित्रीकरणांतून घराघरांत पोहोचलेल्या कल्लोळांतून मनाचा थरकाप उडाला होता. घास तोंडात घोळत, अडकत होते, असे ते न भूतो न् भविष्यति शहारवणारे आक्रीत होते. त्या विवक्षित प्रसंगापर्यंत हे ‘माळीण’ गाव आपल्याला स्वप्नातही कधी डोकावले नव्हते. एक विदारक संहार आपण आपल्या सुरक्षित घरांतून, दृश्यांतून आणि बातम्यांतून पाहत-वाचत होतो.- फक्त!

त्यात, मनात चिरकाल राहील असे एक दृश्य होते. निसर्गाच्या विनाशक महाप्रकोपांतून सहीसलामत वाचलेले ते बाळसेदार तान्हुले! त्याचा भूतलावरचा प्रवास नुकताच सुरू झालेला. जगात येणे म्हणजे काय! अवेळी निघून जाणे म्हणजे काय? याची यत्किंचितही, कल्पना व गांभीर्य याचा मागमूस नसलेली त्याची निरभ्र, नीतळ नजर! भवताल बिटीबिटी पाहाणारे त्याचे निरागस, निवळ, हेतूविहीन डोळे, इतके निर्धास्त! इतके भयमुक्त!— ते ओळखीपाळखीचे नसलेले बछडे मनात कायम चित्रित राहील. जाणते जग मात्र आ वासून त्या बालकाकडे भयचकित होऊन पाहत होते. कितीदाही पाहिले आणि कितीदा न पाहिले, तरी त्याच्या चेहऱ्यावरची निरागसपणाची संगती व अर्थ न लावता येणारे आपण! काल, आज, उद्याच्या चक्कर गिरकीत फिरणारे. नियमिततेत जर काही विस्कटतंय वाटले की हवालदिल होणारे आपण!— आणि इतक्या भीषण प्रलयांतही ते बाळ इतके निघरेर, निर्विकार कसे! विनाशांतल्या विक्राळ क्षणीही ते सहीसलामत वाचले कसे! याचे अतक्र्य निराकरण कायमच शोधत राहाणारे आपण! ज्या जगात ज्ञानाचा दीप घेऊन आपण जागरूक, प्रगल्भ नजरेनं पाहतो, आयुष्य बेततो, मनसुबे योजतो, भावोत्कट बंधनात गुरफटून घेतो, फलश्रुती अजमावतो, संगती लावतो- त्या जगाचे निसर्ग प्रकोप काय करू शकतो याचे सर्वार्थाने आकलन असणारे आपण! आणि–

त्या विदारक मरणांच्या महाराशींत ते बछडे नसते. कां! कसे!! कुणामुळे!!! कां कुठच्या चमत्काराने! —-हे एक अगम्य, आश्चर्यवत वास्तव मात्र मनात आयुष्यभर तसेच राहाणार आहे.

नियतीचा, दैवाचा, देवाचा हा साक्षात्कार म्हणावा का! नेमक्या निर्वाळ्याशी बोट नाही टेकवता येत. प्रसंग अक्षरश: अवाक्  करून गेला. या विधिलिखितामागे काय संकेत असेल!

पिंपळपानावरच्या बाळकृष्णा-सारखा मायेच्या मांडीवर तो पहुडला होता.

सगळं भुईसपाट होतं, तेव्हा, नव्या सृजनाची ‘श्री’ अशीच असेल का!

त्याचे आयुष्य यथार्थ होवो!
सुमन श्रीराम फडके –