काही गोष्टी आपण विसरू म्हणता विसरू शकत नाही. त्या मनात अगदी खोलवर रुतून बसलेल्या असतात. असाच एक प्रसंग कोणताही अपघात घडला की अगदी कालच घडल्यासारखा डोळ्यासमोर उभा राहतो.

मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. बिल्डिंगमध्ये नवीनच राहायला आलो होतो. दोन मजली बिल्डिंग व प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक्स होते. आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो. अजून कोणाशी फारशी ओळख नव्हती. पहिल्या मजल्यावर जिन्याच्या जवळ एक कुटुंब राहत होते. आई, वडील व तीन बहिणी. वय असतील अडीच ते सहापर्यंत. गोड होत्या त्या मुली. त्या आमच्याकडे खेळायला येत असत. तसं इतकं लहान आमच्याकडे कोणीच नव्हतं. त्याच्याकडूनच आईला बरं नसतं. कधी कधी हॉस्पिटलमध्ये असते. एवढं समजलं होतं. वडील कधी जिन्यात भेटले तर गुड मॉर्निग यापलीकडे बोलणे गेले नव्हते. जरूरही वाटली नाही.

MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?
Girls intimate Holi Celebration Inside Delhi Metro
“अंग लगा दे रे, मोहे रंग…”, मेट्रोमध्ये तरुणींच्या अश्लील डान्समुळे ओशाळले प्रवासी! Viral Video पाहून संतापले नेटकरी

तो रविवारचा दिवस होता. साधारण चारचा सुमार असेल. मी, आई व बहीण असेच गप्पा मारत हॉलमध्ये बसलो होतो. आईचे बाहेर लक्ष गेले तर समोरच्या इमारतीतील लोक त्यांच्या गॅलरीमध्ये दाटीवाटीने उभे राहून आमच्या इमारतीकडे बघत होते. पलीकडच्या वाडीतले लोक इकडेच बघत होते. काय झालं म्हणून आई गच्चीत गेली व डोकावून पाहिले तर खाली घरात काही पेटले असावे असे वाटले. आईने मला हाक मारून काय झालंय बघून यायला सांगितले.

मी जिन्यातच असताना लहान बेबी जी अतिशय घाबरली होती, पळत आली व माझा हात धरून ‘‘ताई बघ माझी आई’’ असं म्हणत मला ओढतच घरात घेऊन गेली. आतील दृश्य बघून मीच खरं म्हणजे फार घाबरले. पण प्रसंगावधान दाखवून त्या बेबीला उचलून पळत बाहेर आले. जिना चढून घरी येऊन आईला म्हटले, ‘‘हिला सांभाळ व पटकन मला ब्लँकेट दे.’’ आईने मला थांबवून काय झालं याची चौकशी केली. ‘‘त्या बाई संपूर्ण पेटल्यात. अक्षरश: डोक्यापासून पायापर्यंत व जागच्या जागी डोलत होत्या. आवाज अजिबात नव्हता. त्यांचे यजमान इतके घाबरले होते की ते बेडरूममध्ये सर्व पांघरुणे, ब्लँकेटची नुसती उलथापालथ करत होते. आपण काय करतोय याची त्यांना बहुतेक जाणीवच नव्हती.’’ मी आईला सांगितले. आईने ब्लँकेट तर दिले पण एकटी जाऊ नकोस तू कोणातरी मोठय़ा माणसाला घेऊन जा. त्या बाईंनी तुला धरलं तर सुटणं कठीण होईल. असं बजावलं. मी हो म्हटलं.

ब्लँकेट हातात घेऊन मी खाली आले. त्या मजल्यावर इतर तीन बिऱ्हाडं राहत होती. प्रत्येकाकडे गेले. सर्व सांगून मदत करण्यासाठी विनवले. सर्व पुरुषमंडळी घरात असूनसुद्धा एक हरीचा लाल माझ्याबरोबर आला नाही. उलट एका घरात या कुटुंबातल्या दोघी बहिणी खेळत होत्या त्यांना बाहेर काढले व दार लावून घेतले. आमच्या मजल्यावरच्या दोन कुटुंबाची हीच कथा. पोलीस केस आहे आपण काय करणार? वर सल्ला दिला, ‘‘मुकाटय़ाने घरी जा. लहान वय आहे, रूपाचे बेरूप करून घेऊ नकोस’’ आता एकच बिऱ्हाड उरले होते ते तरी मदत करतील का अशी शंका आली तरी धीर धरून बेल वाजवली. एका तरुण गृहस्थाने दार उघडले. त्याच्या मागे तशीच एक तरुणी उभी होती. त्यांना सर्व परिस्थिती सांगितल्यावर एक शब्द न बोलता त्यांनी माझ्या हातातले ब्लँकेट घेतले व जाता जाता मुलींना घरी ने, तू येऊ नकोस, असे सांगितले व तीरासारखे खाली गेले. अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली, पोलिसाला बोलावले व सर्व सोपस्कार पार पडले. त्या बाई तर गेल्याच.

इतक्या वर्षांनंतरही मी हा प्रसंग विसरू शकत नाही. काही गोष्टी मनावर कोरल्या जातात, हेच खरं.
उषा परांजपे –