शेजारच्या आजी नातवाला गोष्ट सांगत होत्या. मुलगा नोकरी करून आला. त्यामुळे थकला असावा आणि सूनबाईची त्याच्यासाठी रात्रीचा स्वयंपाक करण्याची गडबड असावी. (बरं झालं तीही नोकरीवर नव्हती.)

तर आजीने कितीही गोष्ट रंगवून सांगितली तरी मुलगा झोपेचे नावच घेईना. वास्तविक दिवसभर खेळून बागडून थकलेले शरीर एकदा झोपेच्या अधीन झालं की सर्व आपल्या कामाला मोकळे आणि त्यासाठी तर त्याचे जेवण आधी उरकून त्यास झोप यावी म्हणून आजीची गोष्ट सांगण्यासाठी ‘चर्पटपंजरी’ सुरू होती.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

आजीने सांगितलेली, किंवा सांगत असलेली गोष्ट मुलाला ऐकून ऐकून बोअर की काय म्हणतात तशी वाटत असावी. त्याला हवी होती काहीतरी नवीन, कधी न ऐकलेली व नवलाईची गोष्ट. अन् आजीचं आपलं तेच सुरू होतं, जुनं झालेलं ‘‘कावळ्याचं घर होतं शेणाचं चिमणीचं घर होतं मेणाचं’’ मुलानं कधी मेण पाहिलं नव्हतं की कधी शेण पाहिलं नव्हतं, कारण ते राहात होते आलिशान फ्लॅटमध्ये अन् चवथ्या मजल्यावर. शाळेत जायचं ते रिक्षाने अन् यायचं तेही रिक्षाने. मध्येच मुलगा विचारायचा. ‘‘आजी चिमणी कशी असते गं! मेण कसं असतं गं! आणि खोटं खोटं नको सांगू आम्हाला. सांगायची असेल तर आम्हाला अगदी नवीन गोष्ट सांग, आजीनं लाडानं कावळ्याला काऊ-काऊ म्हटलं तर ते मूल काऊ म्हणजे गाय म्हणायचं. आता काय करावं? काऊ म्हणजे गाय कशी, हे आजीला कळेना. अशी दोघांचीही घालमेल, मी जवळून मजेने पाहात होतो. मलाही त्याची ‘बडबड गीतं’ ऐकवा अशी इच्छा पूर्ण करावीच असं वाटलं.

मग मी विचार करून मी त्याला समजावीत सांगितले. ‘‘बाळा ये! मी तुला अगदी नवीन, कधी न ऐकलेली गोष्ट सांगतो.’’ आता काका काहीतरी नवीन सांगणार म्हणून तो आनंदी झाला असावा. त्याने आजीला सोडलं अन् माझी नवीन गोष्ट ऐकायला त्यानं कान टरकावले असावेत. मीही माझी गोष्ट सांगणे सुरू केले.

एक होता साहेब, त्याला सर्व साहेबा म्हणायचे. एक होता रायबा, त्याला सर्व गरीब म्हणून चिडवायचे. कारण साहेबाचं घर होतं माडीचं अन् रायबाचं घर होतं काडय़ांचं. एकदा काय झालं खूप- खूप पाऊस आला (खोटं-खोटं सांगू नका, खूप-खूप पाऊस कधी येतो का हो, पाऊस कसा असतो काका) मुलानं प्रश्न विचारून मला भंडावून सोडलं. आता काय करावं काही सुचेना, तरी मी मनाला सावरलं अन् लगेच सुधारणा केली. ‘पाऊस’ नाही आला ‘भूकंप’ झाला आणि मग काय साहेबाचं घर गेलं पडून अन् रायबाचं घर गेलं उडून. मग काय झालं? पुढे काय होणार, साहेब गेला दबून, रायबा गेला निघून. असं कसं झालं? रायबा का तर नाही दबून गेला, मुलगा बराच ‘चिकित्सक’ वाटला. मी पुढे माझी गोष्ट सुरूच ठेवली. अरे बाळा ‘‘साहेबाने लोकांचे माना मुरडून पैसे गोळा केले होते, लुबाडून पैसे गोळा केले होते.’’ पण रायबाला ते काही जमलंच नव्हतं, तो होता साधा भोळा, अन् म्हणूनच रायबानं काडय़ांचं घर बांधलं होतं.

‘‘काका- काका साहेबाकडे त्यांच्या मित्राची नवीन गाडी यायची ना हो त्याचं काय झालं?’’ बेटा ती त्यांची गाडी नव्हती, त्यांनी बँकेचं कर्ज घेतलं होतं. ते वेळेवर दिले नव्हते म्हणून ती गाडी यायची. कारण साहेब स्वत:चे पैसे खर्च न करता कर्ज न देण्याचे सोंग करत होता. पुढे काय झालं? पोरगा विचारातच होता, मला मजा वाटत होती.

पुढे मग काय होणार? रायबा पुन्हा परत आला, नवीन जागेची पाहणी केली अन् नवीन झोपडी उभी केली. अन् सायबाचं काय झालं? ‘‘आता कसं सांगू बाबा’’ साहेबाने लोकांचे लुबाडलेले पैसे ज्या बँकेत ठेवले होते ती बँकच बंद झाली, मग काय? नवीन घरासाठी पैसे नाहीत, अन् बँक पैसे देत नाही. (मागचेच पैसे देणे झाले नव्हते ना?) साहेबसुद्धा त्या रायबाच्या बाजूलाच झोपडीत राहू लागला.

‘‘म्हणूनच कुणाचं मनं दुखवू नये, कुणाचे पैसे लुबाडू नये. नाही काहो काका?’’ मुलाने मलाच विचारलं. काय बोलावं मला सुचेना, एवढय़ा लहान मुलाला दुष्परिणाम समजतात, अन् आम्हाला समजू नये काय? काय सांगावं, मुलगा तर केव्हाच झोपी गेला होता. पण मी वरील विचाराने जागाच होतो.
लक्ष्मण कुऱ्हेकर – response.lokprabha@expressindia.com