‘कांडर’ अगदी पायरीपाशी येऊन विसावा घेत होती. तुम्ही तिला काय म्हणता? मण्यार! आहे जहरी, पण त्यापेक्षा जास्त लहरी आहे. मधूनच सात-आठ दिवस भूमिगत होते. ‘पाताळ लोकांत जाऊन येते असं आपलं म्हणायचं! ‘मॅजेस्टिक’चं ‘पाखरं’ पुस्तक वाचत मी सोनेरी दुपारी गॅलरीत बसलो होतो, तेव्हा कांडर दडग्यात दडली. कातर वेळी तिचा झाडावर चढण्याचा प्रयत्न होता. पण तिथं ‘चाबूक सापा’चं वर्चस्व आहे. तुम्ही त्याचं काय नाव घेता? हरणटोळ!

सकाळी मण्यार चावली तर सूर्य मावळायच्या आधी ‘पेशन्ट’ गतप्राण होतो म्हणून ती ‘सूर्यकांडर.’ रात्री डसली तर चंद्र मावळाच्याआधी तेच घडतं. तेव्हा ती ‘चंद्रकांडर’ ठरते. आपण आयुष्यात जे ठरवलेलं असतं, ते सर्प काही क्षणांत धुळीत मिळवू शकतो. तोंडाला फेस आल्यावर तुम्ही-आम्ही ‘फेसबुक’ काय वाचणार?..

itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…

आमच्या आवरातच अनेक जातींचे साप मी पाहिले आहेत. दोन नागोबांची सत्ताझुंज गंधवती नागिणीसाठी लागली तरी गैरसमज होऊ शकतो की, विळखा घालून प्रणय चाललाय!

घोणस तर सोसायटीच्या नळाचं टिप् टिप् पडणारं पाणी प्यायला उन्हाळ्यात आला होता. मनाशी तृष्णा घेऊन मनुष्यजन्मही तसा व्याकूळवाणाच बनलेला असतो. गवत्या (ग्रासस्नेक) सापासारखी स्वत:ला ‘नाग’ समजत मान उंच करणारी सोंगढोंगही आपण करतोच की राव! एखादं प्रमोशन मिळूनही जातं, पण बाकी आपल्या इमोशनला कोण विचारतं!

दाभोळ रस्त्यावर ‘जलेबी’ नावाचं फुरसं करवतीसारखी ‘करकर’ करत मला दिसतं, तेव्हा त्याचं अवलोकन करताना मला कामावर जायला दहा मिनिटं उशीर होतो. नंतर मी माझ्या कॉलेजच्या वर्गात सर्पाबद्दल बोलत राहतो. त्यात केवळ सहानुभूती नव्हे, तर अनुभूती मिसळलेली असते.

इस्त्रीचे कपडे घेऊन परवा मी परतत होतो. तेव्हा रॅटस्नेक धामण माझ्यापुढे सळसळत गेला. नर असताना ‘ती’ धामण कसं म्हणू? त्याला ऐकू येत नाही म्हणून, नाहीतर राग येईल.

उडता सोनसर्प पॅराशूटसारखा उतरला किंवा ‘रजतबंसी’ लाल रंगाची सुंदरता दाखवत चालला होता असल्या थापा लालित्यासाठी मी कधीही मारणार नाही. भुजंग किंवा ‘नागराज’सुद्धा आमच्या परिसरात नाही. मात्र जे साप कोकणात आहेत, त्यापेक्षा जास्तं त्यांच्याबद्दल गैरसमज आहेत. ‘सोमनाथ’ हा चिमुकला सर्प तर साप वाटतच नाही. ‘मला साप म्हणा रे कुणीतरी’ असं तो वाळवी खाणारा ब्लाइंड स्नेक बिचारा बोलूही शकत नाही, पण त्याच्याकडे ‘काटा’ आहे. अर्थात् जहरी नाही!

एखादं चिमुकलं पोरगं अस्सल थापाडं असतं. ‘चाचू मी चिपळूणला गेलो होतो ना, तेव्हा ‘अ‍ॅनाकोंडा’ पाहिला. हा ऽऽऽऽ एवढा मोठा’ असं तो मला रंगात येऊन सांगत. त्याने ‘सँडबोआ’ पाहिलाही असेल. तोच त्याचा अ‍ॅनाकोंडा! विषय बदलून मग मी त्याला कापूस कोंडय़ाची गोष्ट सांगू लागतो. काही लोक मात्र विज्ञानवादी आहेत.

अनुप देशमुखसारखे तरणेबांड निसर्गभक्त सर्पाच्या संदर्भात सत्य काय, भ्रम काय याची ‘जागृती’ करतात, तेव्हा मला समाधान वाटतं की असे अनेक युवक आज कोकणात आहेत. तेच पर्यावरण राखतील!

साप ‘शीळ’ घालून डहाळीवरच्या चिमणपाखराला गवतात बोलावतो आणि मग त्याच्यावर झेप घेतो हेसुद्धा मला ‘बालसाहित्य’ वाटतं! डुरक्या घोणस केवळ वाऱ्यासारखा श्वास सोडून कोंबडी खेचून घेतो यातही तथ्य नाही.

कोब्रा खुन्नस ठेवतो व बरोब्बर त्याच माणसाची पाठ धरतो असंही काही संभवत नाही. तसं स्मरण नागाला कसं असेल? उलट, माणसंच वर्षांनुवर्षे अबोला धरतात. दोन तोंडाचा साप असत नाही. मात्र, उलट ‘दुतोंडय़ा’ माणसांनी मला आयुष्यात त्रासच त्रास दिला. निनावी पत्रं लिहिली. अफवा पसरवल्या. माणसाच्या मनातलं कृतघ्नपणाचं विष आणि अहंकाराचा फणा मी कोकणात फार वेळा अनुभवलाय, पण तो वेगळा विषय आहे. ब्लॉगरने विषयांतर करू नये. है ना?..
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com