जोगींदर शर्माच्या फुल टॉस चेंडूवर पाकिस्तानच्या मिसाब-उल-हकने उलटा मारलेला फटका श्रीशांतच्या हातात विसावला आणि भारतीय क्रिकेट संघाने टी-२० क्रिकेटचा श्री गणेशा थेट जेतेपदावर नाव कोरून केला. या विजयाबरोबरच भारतीय क्रिकेटमध्ये झटपट क्रिकेटचे नवीन पर्व सुरु झाले. अर्थात आयपीएलने या झटपट क्रिकेटला गॅलमर मिळवून देण्यास मदत केली. मात्र या विजयानंतर आणखीन एक गोष्ट भारताला गवसली आणि ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या रुपात एक प्रभावी नेतृत्व.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्याच दिवशी ११ वर्षापूर्वी धोनीने भारताला पहिलावहिला वर्ल्डकप जिंकून दिला आणि तो टी-२० सारख्या नवख्या प्रकारामध्ये. खरं तर धोनीने पाकिस्तानविरुद्धच्या १८३ धावांच्या खेळीनंतर मागे वळून पाहिलेच नाही. पण अनपेक्षितरित्या मिळालेल्या या विश्वचषकातील विजयानंतर त्याला एक कर्णधार म्हणून जो विश्वास आणि बुस्टर मिळाला ना तो आजही मैदानामध्ये त्याच्या देहबोलीत दिसून येतो. नेतृत्व कसं असावं याचं चालतं फिरतं उदाहरण आहे ही व्यक्ती असं अनेक भारतीय क्रिकेट चाहते म्हणतात. त्याने आता सर्व प्रकारातील क्रिकेटमधील कर्णधारपद सोडून बराच काळ लोटला तरी तो मैदानात कर्णधार म्हणूनच वावरतो हे दिसूनच येते. म्हणजे विराट कोहली असो किंवा अगदी कालच्या आशिया कप सामन्यामध्ये नेतृत्व करणारा रोहित शर्मा असो धोनीचा शब्द म्हणजे अगदी प्रमाण नसला तरी तो सामन्याचे पारडे पलटण्याइतका महत्वाचा असू शकतो हे सर्वच जाणतात. कर्णधार कसा असावा याचा परिपाठ धोनीने घालून दिला. यात अगदी ट्रॉफी हातात घेतल्यानंतर ग्रुप फोटोमध्ये कोपऱ्यात जाऊन उभं राहणं असू द्या किंवा विराट चांगला खेळला म्हणून शेवटची विजयी धाव त्याला घेता यावी म्हणून फुलटॉस आलेला चेंडू निर्धाव खेळून काढणे असू द्या किंवा गरज पडल्यास शेवटच्या षटकामध्ये एक गडी शिल्लक असताना अगदी १५ हून अधिक धावा करत जगातला सगळ्यात सर्वोत्तम फिनिशर ही ओळख निर्माण करण्याचे कौशल्य असू द्या हा सगळीकडे परफेक्ट बसतो माणूस.

धोनीचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं तर डीआरएसबद्दलचा त्याचा अचूक अंदाज. कालच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा त्याची झलक पहायला मिळाली. म्हणजे या सिस्टीमचे नाव बदलून धोनी रिव्हू सिस्टीम ठेवावं इतकी डीआरएस पद्धत अचूक वापरण्याची क्षमता त्याने एकदा सोडून अनेकदा सिद्ध करून दाखवली आहे. यात नशिबाचा भाग असो किंवा खेळाबद्दल त्याचे अचूक ठोकताळे असोत पण जे त्याला जमतं ते इतर कोणालाही जमत नाही हेही तितकचं खरं. कालच या संदर्भात ट्विटवर वाचण्यात आलेली एक ओळ म्हणजे, ‘धोनीने रिव्ह्यू मागितल्यावर फलंदाजाने चौथ्या पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता पव्हेलियनच्या दिशेने निघण्यास सुरुवात करावी.’ ऑन फिल्ड केलेला बांगलादेशविरुद्धचा तो रन आऊट असो किंवा पत्रकारपरिषदेमधला हजरजबाबीपणा तो सगळीकडे आपले वेगळेपण सिद्ध करतो. कॅप्टन कूल म्हणून ओळख असणारा धोनी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन खेळतो. अर्थात कधीतरी तसं होतं नाही हा भाग वेगळा तरी बऱ्याचदा त्याचा मैदानातील वावर हा शांत पण तितकाच प्रभावी असतो. एकीकडे कॅप्टन कूल तर दुसरीकडे जशाच तसं उत्तर देत बांगलादेशच्या त्या गोलंदाजाची जीरवण्यासाठी थेट त्याला नियमांमध्ये राहून धडक देत धडा शिकवणे असो किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला क्रॅम्प आल्यावर त्याच्या पायांना मसाज करणं असो तो किंवा अगदी बारावा खेळाडू म्हणून मैदानात पाण्याच्या बाटल्या घेऊन येणं असो तो सर्वकाही करु शकतो. आणि त्याच्या प्रत्येक हलचालीवर क्रिकेट चाहत्यांची नजर असते हे यावरूनच कळून येते की तो बारावा खेळाडू म्हणून पाण्याच्या बाटल्या घेऊन मैदानात आला तरी ट्विटवर ट्रेण्डिंग टॉपिक ठरतो.

आपल्या मर्यादा ओळखून पांढऱ्या कपड्यामधील क्लासिक समजल्या जाणाऱ्या क्रिकेटमधून त्याने हळूच काढता पाय घेतला. आणि त्यानंतरच्या अनेक सामन्यांमध्ये त्याने वनडे आणि  टी-२० मध्ये माझ्यासारखा कोणीच नाही हे आजही तो सिद्ध करतो तेही अगदी सहजपणे म्हणजे क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर इफर्टलेसली. सध्या कर्णधार विराट झाला असला तरी या माणसाचा विराट अनुभव पाहता आणि कामगिरी पाहता ही व्यक्ती का गरजेची आहे टीममध्ये, हे तो प्रत्येक सामन्यामध्ये सिद्ध करतो. कोहली सारख्या थोड्या बेलगाम आणि शॉर्ट टेम्पर कर्णधाराला धोनी सारखी वेसण असणे गरजेचे आहे.

हल्ली धोनी खेळत नाही, त्याने २०१९ च्या विश्वचषकाआधी निवृत्त व्हावे, धोनीचा संघाला काही उपयोग नाही असे अनेक सल्ले दिले जातात. हाँगकाँग विरुद्ध धोनी शून्यावर बाद झाला आणि पुन्हा या चर्चांना उधाण आलं. मात्र पुढच्याच दोन सामन्यामध्ये धोनीने फलंदाजी आणि नेहमीप्रमाणे तो जे करण्यात मास्टर आहे ते म्हणजेच नियोजन करत आपली संघाला का गरज आहे हे सिद्ध केले. अर्थात धोनी वयानुसार कधी निवृत्त व्हायचे ते ठरवेलच पण तोपर्यंत त्याने मनसोक्त खेळावे. आज टी-२० मध्ये असणारा भारताचा दरारा आणि वनडेमध्ये असणारी भन्नाट कामगिरी या दोन्हीसाठी कुठे ना कुठे हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार जबाबदार आहे हे अमान्य करता येणार नाही. आणि याच कर्णधाराचे नेतृत्व सिद्ध करणाऱ्या टी-२० विश्वचषक विजयाला आज ११ वर्ष पुर्ण झाली.

– स्वप्निल घंगाळे
swapnil.ghangale@loksatta.com

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 years of t20 world cup 2007 win by indian team
First published on: 24-09-2018 at 18:46 IST