– सॅबी परेरा

२०१७ साली रिलीज झालेला कोंकणा सेनशर्मा दिग्दर्शित “अ डेथ इन द गंज” हा सिनेमा म्हणजे शुट्टू या पात्राच्या न्यूनगंडापासून वैफ़ल्यग्रस्तते पर्यंतच्या प्रवासाची हळुवार कहाणी आहे.

आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. ज्या कुटुंबात आपण जन्मलो, जगलो आणि वाढत आहोत तिथे आपल्याला काही किंमत नाही. ज्या शेजाऱ्या पाजाऱ्यांत, नातेवाईकांत आपण वावरतो त्यांच्या आपण खिजगणतीत नाहीत. ज्या मित्रमैत्रिणींच्या कोंडाळ्यात आपण असतो त्यांनाही आपल्या असण्या-नसण्याने काही फरक पडत नाही. क्वचित कधीतरी त्यांच्या गरजा भागविण्यापुरता, त्यांची करमणूक करण्यापुरता त्यांना आपण लागतो. पण आपण नसलो तर त्यांचं काही अडत नाही. आपण ज्यांना आपले समजतो त्या कुणालाच आपली उणीव भासत नाही. आणि या सगळ्यांच्या पलीकडे जे जग आहे ते तर परकंच आहे. त्यात आपलं कुणी नाही की आपण कुणाचे नाहीत. एकंदरीत आपण रिडंडन्ट आहोत. अशी सगळीकडून नाकारले गेल्याची भावना आणि न्यूनगंडाचा काच सहन करणाऱ्या श्यामल चटर्जी उर्फ शुट्टूच्या आयुष्यातील शेवटच्या सात दिवसाची गोष्ट म्हणजे अ डेथ इन द गंज.

या जगात आपण रिडंडन्ट असल्याच्या भावनेने शुट्टूला आतून पोखरले आहे. तो परीक्षेत नापास झालाय पण आपलं हे दुःख शेअर करता येईल असं शुट्टूकडे हक्काचं, विश्वासाचं कुणी नाहीये. आपल्या कुटुंबीयांपैकी कुणाशी हे शेअर केलं तर आपल्या पाठीवर कुणी सहानुभूतीचा हात ठेवणार नाही की मनोबल वाढविणारे चार शब्द कुणी बोलणार नाही ह्याची शुट्टूला मनोमन खात्री आहे. म्हणून त्याने आपला रिझल्ट दडवूनच ठेवलाय. त्याचा मावसभाऊ, वहिनी, त्यांचे मित्र या सगळ्यासाठी शुट्टू म्हणजे केवळ एक हक्काचं मनोरंजनाचं पात्र आहे, ज्याची कधीही, कुठेही, कशीही चेष्टा मस्करी करता येईल असं हक्काचं गिर्हाईक आहे. त्यातल्या त्यात शुट्टूशी संवाद साधते ती त्याच्या मावसभावाची किशोरवयीन मुलगी तानी.

शुट्टूला आयुष्यभर जशी नाकारले गेल्याची वागणूक मिळते साधारणतः तशीच वागणूक एका प्रसंगात शुट्टू तानीला देतो आणि त्या प्रसंगानंतर तानी कुठेतरी हरवते. ती घरादारात कुठे सापडत नाही. रात्रीच्या वेळी सगळे तिला शोधायला जंगलात जातात. आपल्या मावसभावासोबत शुटटूही जातो. बरीच शोधाशोध झाल्यानंतर तानी सापडते. सगळे घरी येतात. आपल्यासोबत जंगलात गेलेला शुट्टू परत आलेला नाही हे कुणाच्या ध्यानातही येत नाही. घरातील नोकराच्या मदतीने शुट्टू घरी येतो तेव्हा सगळे मेजवानी आणि हास्यविनोदात रमलेले दिसतात. तेव्हाही शुट्टू आल्याची कुणी दखल घेत नाही. शुट्टू तानीकडे जातो तर तीही शुट्टूशी बोलायचं नाकारते. आणि हीच बहुधा, उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरते.

ऐशीच्या दशकातलं कलकत्त्याचं एक बंगाली कुटुंब आपल्या मित्रपरिवारासह ख्रिसमसच्या सुट्टीसाठी बिहारमधील मैक्लुस्कीगंज येथे राहणाऱ्या आपल्या आई वडिलांच्या (ओम पुरी आणि तनुजा) घरी आलेलं आहे. हे सगळे एकाच कुटुंबातील, मित्र परिवारातील असले आणि एन्जॉय करण्यासाठी एकत्र आलेले असले तरी त्यांच्या नात्यात सारं काही आलबेल नाहीये. एकमेकांबद्दल संशय, मत्सर, दुसऱ्याला कमी दाखविण्याची खुमखुमी आणि स्वतःचा बडेजाव मिरविणाची हौस अशा ताण्याबाण्यांनी जुनेर कापडागत विरलेली तरीही न तुटलेली ही फॅमिली आहे.

आधीच लिखाणात उत्तम उतरलेलं शुट्टूचं कॅरेक्टर, विक्रांत मेस्सी या कलाकाराने आपल्या नैसर्गिक अदाकारीने इतकं सुंदर वठवलंय की हा संवेदनशील शुट्टू आपल्याला लगेच अपील होतो आणि पुढील सिनेमा आपण त्याच्याच नजरेने पाहू लागतो. त्याला झालेली वैफल्यग्रस्ततेची भावना, मावसभावाचं त्याला जाणवणारं दडपण, आपल्या आईशी फोनवर बोलताना आलेलं अवघडलेपण, छोट्या तानी सोबत त्याची मैत्री, विक्रम (रणवीर शौरी) सोबत त्याची होणारी नोकझोक, मिमी (कल्की कोचेन) सोबतचे प्रणयाचे क्षण हे सारं काही आपण शुट्टूच्या नजरेने पाहतो आणि त्याच्याच (काहीशा अती भासणाऱ्या) संवेदनशीलतेने अनुभवतो.

सिनेमा जरी शुट्टूभोवती फिरत असला तरी त्यातील प्रत्येक छोट्यामोठ्या पात्राला एक निश्चित असा चेहरा आहे, त्याचं असं एक स्वभाव वैशिष्ठय आहे. सर्वच कलाकारांची कामे उत्तम झालीयेत. सिनेमाची सगळ्यात उजवी बाजू आहे त्याचा कोंकणा सेनशर्माने लिहिलेला स्क्रीनप्ले आणि तिचं प्रभावी दिग्दर्शन.

सिनेमातील पात्रं आधुनिक दाखविण्यासाठी दारू, सिगारेट, सेक्सचं केलेलं प्रयोजन हा काहींना क्लिशे वाटणे शक्य आहे पण ही कथा जिथे घडते ते मैक्लुस्कीगंज हे ठिकाण इंग्रजांनी वसविलेलं असल्याने हा तेथील अँग्लो इंडियन संस्कृतीचा परिपाक असावा असा बेनिफिट ऑफ डाउट दिग्दर्शिकेला द्यायला हरकत नाही.

सिनेमाला वेग असायला हवा, प्रेक्षकाला विचार करण्याची उसंत न देता सिनेमात सतत काही घडत राहायला हवं अशी अपेक्षा असणाऱ्यांसाठी हा सिनेमा नाहीये. मसाला सिनेमाच्या चाहत्यांनी या सिनेमाच्या वाट्याला जाऊच नये. हा शाम बेनेगल, सत्यजित रायच्या सिनेमाच्या जातकुळीतला संथ, हळुवार परंतु विचार करायला लावणारा सिनेमा आहे. आपल्याच कुणा पूर्वजाची डायरी आपल्या हाती लागावी आणि ती वाचता वाचता आपण त्या ठिकाणी, त्या काळात जावे असा अनुभव हा सिनेमा देतो.

बाहेरून शांत दिसणारी एखादी व्यक्ती आतून प्रचंड कोलाहलाने भरून गेलेली असू शकते. तिच्या आतल्या त्या शांततेचा आवाज आपल्याला ओळखता यावा. ज्या लोकांत आपण जगतो, वाढतो, खेळतो, बागडतो त्यांच्या भावनांचा आपल्याला आदर करता यावा. आपल्या उक्तीने, कृतीने, नजरेने, देहबोलीने एखादी संवेनशील व्यक्ती निराशेच्या गर्तेत जाऊ शकते, एखादा टोकाचा आत्मघातकी निर्णय घेऊ शकते हे भान आपल्याला यावं निदान त्यादृष्टीने आपली विचार प्रक्रिया सुरु व्हावी अशी चावी आपल्या मुर्दाड होत चाललेल्या मनाला देण्याचं मोलाचं काम हा सिनेमा करतो.

कधीतरी टीव्हीवर, अशा प्रकारच्या ऑफ-बिट सिनेमावर भाष्य करताना कुणीतरी एक समीक्षक बोलला होता ते या सिनेमाच्या संदर्भात लागू पडते असे मला वाटते. तो म्हणाला होता “ऐसी फिल्मे बनना जरुरी है, ऐसी फिल्मे देखना भी जरुरी है. ये वो बूटी है जिसके लिए हनुमान द्रोंणगिरी पर्वत ही उठा के ले आये थे.”