ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव साधासुधा नव्हे तर जिव्हारी लागणारा होता, फिंच आणि वॉर्नर या जोडीने भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. एका सामन्यातील पराभवामुळे काही आभाळ कोसळत नाही, किंवा एक पराभव पदरी पडला म्हणून टीम इंडिया दुबळी ठरत नाही. मात्र गेल्या काही दिवसांत, कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने जी प्रयोगशाळा सुरु केली आहे ती आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून भारतीय संघाला घातक ठरु शकते.

सर्वात प्रथम आपण पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करुया, २०१९ च्या अखेरच्या महिन्यांमध्ये शिखर धवन हा दुखापतीमुळे आपलं संघातलं स्थान टिकवू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलला संधी मिळाली. कसोटी संघातलं आपलं स्थान गमावून बसलेल्या राहुलनेही अनपेक्षित चांगली कामगिरी केल्यामुळे आता सलामीला कोणाला संधी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. आता या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विराट कोहलीने पहिल्या वन-डे सामन्यात आपल्या हक्काची तिसरी जागा लोकेश राहुलला दिली आणि स्वतः चौथ्या जागेवर फलंदाजी करणं पसतं केलं. सलामीवीर रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र ही जोडी फुटल्यानंतर भारताची फलंदाजी कोलमडली. कर्णधार विराट कोहलीही या सामन्यात झटपट माघारी परतला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये खेळत असताना चौथ्या क्रमांकावर अपयशी ठरत आलेला आहे. सामना संपल्यानंतर विराटने, आपला हा प्रयोग पूर्णपणे फसल्याची कबुलीही दिली. फलंदाजीचा क्रम बदलणं हा वरवर फार छोटा मुद्दा वाटत असला तरीही….एका पावलामुळे संघाची बसलेली घडी पूर्णपणे विस्कटते. वानखेडे मैदानावर आपण याचा प्रत्यय घेतला. यंदा भारत ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक खेळणार आहे. या स्पर्धेआधी असे आत्मघातकी प्रयोग करणं मूर्खपणाचं लक्षण आहे. तिसऱ्या क्रमांकावरच्या फलंदाजाने अधिकाधिक चेंडू खेळून आपल्या संघाला एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करुन देणं गरजेचं असतं. यानंतर चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज आणि मधल्या फळीतले फलंदाज गरजेनुसार फटकेबाजी करुन धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतात. विशेषकरुन ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यासारख्या अव्वल संघांविरोधात असे प्रयोग करणं हे घातकच ठरु शकतं.

हा मुद्दा विराटने स्वतःचा फलंदाजीचा क्रम बदलला इथपर्यंत येऊन थांबत नाही. तर याचा परिणाम खालच्या फलंदाजांवरही होतो. श्रेयस अय्यर या युवा खेळाडूकडे चौथ्या क्रमांकाची जबाबदारी आलेली आहे. अय्यरकडे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसला तरीही गेल्या काही सामन्यांपासून त्याचा खेळ बहरत चाललेला आहे. शिवम दुबेही मधल्या फळीत आश्वासक खेळ करतोय. वरच्या फळीत एका फलंदाजाचा क्रम बदलला की साहजिकच खालच्या फळीतल्या फलंदाजीवर त्याचा परिणाम होणारच. विश्वचषकाला इतका कमी कालावधी राहिलेला असताना विराट ही जोखीम का घेतोय?? हे न उलगडलेलं कोडं आहे. संघात एक जास्तीचा सलामीवीर खेळवायचा म्हणजे तुम्हाला एक अष्टपैलू फलंदाज किंवा एका फिरकीपटूचा बळी द्यावा लागणार हे नक्की आहे. सध्याच्या घडीला विराट ही जोखीम घेण्यासाठी तयार आहे का??

हे झालं फलंदाजीचं, आता येऊया ऋषभ पंतकडे. खरंतर या विषयावर बोलणं आता थांबवायला हवं असं वाटायला लागलंय. कितीही खराब खेळ झाला…तरीही त्याला आता संघातली त्याची जागा आता कायम राहणार हे आता नक्की झालंय. मात्र, जे भारतीय संघ व्यवस्थापन सलामीवीराला एक पर्याय तयार करतंय ते संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला सक्षम पर्याय उपलब्ध का करत नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात पॅट कमिन्सचा चेंडू खेळत असताना, पंतच्या हेल्मेटला चेंडू लागला. यामुळे पंत दुसऱ्या डावात यष्टीरक्षणासाठी उतरला नाही, लोकेश राहुलने त्याची जबाबदारी पार पाडली. मात्र नेहमीप्रमाणेच यष्टींमागची ढिसाळ कामगिरी ही कायम राहिली. समजा, टी-२० विश्वचषकात पंतला अशीच एखादी दुखापत झाली आणि दुर्दैवाने त्याला माघार घ्यावी लागली…तर तुमच्यासमोर पर्याय काय?? संजू सॅमसनला संघ व्यवस्थापन म्हणावी तशी संधी मिळत नाहीये…अशावेळी पंतला काही झालं तर राहुलसारख्या खेळाडूकडे यष्टीरक्षण सोपवणं टीम इंडियाला परवडणारं आहे का??

एका पराभवामुळे सगळं काही संपलं असं मानण्याची खरंच काहीही गरज नाही. पण, टी-२० विश्वचषकाच्याआधी असे प्रयोग करणं हे टीम इंडियासाठी घातक ठरु शकतं. २०१९ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषकात, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कोणी करायची या प्रश्नाने टीम इंडियाचा घात केला होता. ही अनिश्चीतता संघाला संपवावीच लागेल…नाहीतर जे इंग्लंडमध्येच घडलं तेच ऑस्ट्रेलियात घडल्याशिवाय राहणार नाही. बाकी सूज्ञास अधिक सांगणे न लगे…