01 March 2021

News Flash

‘द टर्मिनल’ खरंच घडतो तेव्हा…

तीन महिने शिकागोच्या ओहारा विमानतळावर बेकायदेशीररीत्या राहिल्याबद्दल त्याला आता अटक करण्यात आली आहे.

(Aditya Singh Photo by AP and Airport Photo by Reuters)

– सुनीता कुलकर्णी

स्टीव्हन स्पीलबर्गचा २००४ मधला ‘द टर्मिनल’ हा टॉम हँक्सची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा अनेकांचा आवडता आहे. क्रॅकोझिया नावाच्या देशातून न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरलेल्या व्हिक्टरच्या देशाचं अचानक अस्तित्व नाकारलं जातं आणि त्याचा पासपोर्ट बाद होतो. व्हिक्टर विमानतळाच्या बाहेरही पडू शकत नाही आणि विमानप्रवासही करू शकत नाही. नाईलाजाने तो विमानतळावरच रहायला सुरूवात करतो.
अशीच एक घटना एका इंडो अमेरिकन माणसाच्या बाबतीत घडली असून तीन महिने शिकागोच्या ओहारा विमानतळावर बेकायदेशीररीत्या राहिल्याबद्दल त्याला आता अटक करण्यात आली आहे. पण त्याची सगळी बातमी ‘द टर्मिनल’ची तंतोतंत आठवण करून देणारी होती.

३६ वर्षीय आदित्य सिंग लॉस एंजेलिस मध्ये राहतो. १९ ऑक्टोबर २०२० मध्ये तो विमानाने शिकागोच्या ओहारा विमानतळावर पोहोचला. पण करोनाच्या महासाथीमुळे त्याला तिथून बाहेर पडायची भीती वाटायला लागली. (जगात अमेरिकेला करोनाचा सगळ्यात जास्त फटका बसला असून आजवर तिथे २३ लाख ९३७ हजार लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तीन लाख ९७ हजार लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.)
मग त्याने काय करावं… तर त्याने चक्क विमानतळाच्या सिक्युरिटी झोनमध्ये रहायला सुरूवात केली. विमानतळ कर्मचाऱ्यांनी नुकतंच त्याच्याकडे ओळखपत्र मागितलं. तर त्याने त्यांना एक बॅच दाखवला.

पण तो बॅच त्याचा नाही हे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. तो बॅच होता एका एअरपोर्ट ऑपरेशन्स मॅनेजरचा. त्याने तीन महिन्यांपूर्वीच आपला बँच हरवला असल्याची तक्रार दिली होती. तो बॅच या आदित्य सिंगला सापडला आणि बाहेर पडायची भीती वाटत असल्यामुळे त्याने त्या बॅचचा वापर करत त्याने विमानतळाच्या सिक्युरिटी झोनमध्ये रहायला सुरूवात केली. प्रवाशांनी दिलेल्या खाद्यपदार्थांवर त्याने या तीन महिन्यांच्या काळात गुजराण केली. त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभं करण्यात आलं तेव्हा सगळा प्रकार एकून न्यायाधीशदेखील हैराण झाले. ‘एक बेकार तरूण, ओहारा आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या ठिकाणी सुरक्षा विभागात तब्बल तीन महिने अनधिकृतपणे राहतो आणि ते यंत्रणेला समजूही शकत नाही हे कसं घडू शकतं ते जरा मला समजावून सांगा,’ असं त्यांनr पोलिसांना सांगितलं.

आदित्य सिंग लॉस एंजेलिसमध्ये आपल्या काही मित्रांबरोबर राहतो. त्याने हॉस्पिटॅलिटी या विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. पण तो बेकार आहे. त्याला आता विमानतळाच्या सिक्युरिटी झोनमध्ये बेकादेशीररीत्या राहणं, तिथल्या कर्मचाऱ्याचा बँच चोरणं या आरोपांखाली अटक करण्यात आली असली तरी त्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्या या गुन्ह्याचं स्वरूप वेगळं असलं तरी त्याने कोणत्याही प्रकारची हिंसा केलेली नाही, विमानतळाच्या सुरक्षाव्यवस्थेला त्याने कोणताही धोका निर्माण केला नाही, ही जमेची बाजू आहे असं संबंधित जाणकारांचं म्हणणं आहे. तो शिकागोला कशासाठी आला होता याचा आता तपास सुरू आहे.

लोक सिनेमाची कॉपी करतात की समाजातल्या घडामोडींमधून सिनेमातलं कथानक रचलं जातं हा सनातन वाद आहे. तो फक्त सिनेमाबाबतच नाही तर सगळ्याच साहित्यकृतींबाबत आहे. आता आदित्य सिंगची कहाणी समजल्यावर ‘द टर्मिनल’ बघून त्याला असं काही करायची स्फूर्ती मिळाली असावी की अशा एखाद्या उदाहरणातूनच स्पीलबर्गला आपला सिनेमा सुचला असावा ही चर्चा रंगू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:57 pm

Web Title: aditya singh indian american arrested for living in chicago airport for 3 months due to fear of covid nck 90
Next Stories
1 सोनू सूदचं टेलरिंग शॉप
2 माकडदाढी वाढतेय…
3 रोज नवा हिरो सापडला अन् पोरांनी इतिहास घडवला
Just Now!
X