– सुमीत मेहता

देशभरात लॉकडाउन सातत्याने वाढवला जात असताना भारतातील शाळा हळूहळू कोविड-१९ नंतरच्या काळातील नव्या शिक्षण व्यवस्थेशी जुळवून घेऊ पाहत आहेत. शाळांचे संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्गामध्ये आणि घरी अशा दोन्ही ठिकाणी भविष्यातील शैक्षणिक जीवनाची तयारी करत आहेत. या नवीन शैक्षणिक जीवनावर पारंपरिक आणि आधुनिक शिक्षणाचा समसमान प्रभाव असणार आहे.
शिक्षणव्यवस्थेचे पारंपरिक आधारस्तंभ असलेल्या पूर्व-प्राथमिक आणि किंडरगार्टन ते बारावीपर्यंतच्या शाळा कायम राहणारच. विटा, भिंतींनी बनलेल्या शाळा सामाजिक परिस्थितीची गरज आहेत. शाळांमध्ये मुले वाढतात, स्वतःला व्यक्त करतात, कलाकौशल्ये, यश संपादन करतात आणि मित्रमैत्रिणी जोडतात.

काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या या शिक्षणसंस्था आपल्या युवा पिढीला मित्रमैत्रिणींसोबत शिकण्याचे, शारीरिक कवायती, खेळ खेळण्याचे, शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवण्याचे आणि आपले अनुभव इतरांसोबत जगण्याचे लाभ मिळवून देतात. याउलट ऑनलाईन किंवा डिजिटल शिक्षणात फक्त ऑडिओ आणि व्हिज्युअल टूल्स असतात, विद्यार्थी व शिक्षक एकमेकांना प्रत्यक्ष समोरासमोर भेटत नाहीत, जे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप गरजेचे आहे. कोविड नंतरच्या काळात शाळा असतीलच पण भारतातील शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या (एडटेक) शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसोबत मिळून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या एकंदरीत शिक्षण अनुभवांमध्ये सुधारणा व्हावी आणि शिक्षण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करतील. कोविड-१९ नंतरच्या काळात आपल्या देशात शिक्षणक्षेत्रात पुढील पाच प्रकारे बदल होतील असे मला वाटते.

१. शाळांना तंत्रज्ञान स्वीकारणे आणि वापरणे भाग असेल: तंत्रज्ञानाशिवाय आपले काम चालू शकते हा विचार सोडून देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शाळांपाशी उरणार नाही. ज्या शाळा तंत्रज्ञानाची कास धरणार नाहीत त्या मागे राहतील आणि त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहील. आपल्या प्रक्रिया सुधारण्यासाठी, शिक्षण अधिक विद्यार्थीकेंद्री व्हावे आणि शिक्षकांची कार्यक्षमता वाढावी यासाठी तंत्रज्ञान स्वीकारणे आणि ते वापरणे हेच सर्वार्थाने योग्य ठरेल.

२. तंत्रज्ञानामार्फत शिक्षक सक्षम बनतील: यापुढे शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर फक्त स्वतःच्या शिकण्यासाठी नव्हे तर मुलांना शिक्षणप्रक्रियेत सहभागी करवून घेण्यासाठी देखील करतील. शिक्षकांचे प्रशिक्षण मॉडेल संमिश्र स्वरूपाचे असेल यामध्ये ऑनलाईन, मागणीनुसार शिक्षण आणि व्यक्तिगत सराव सत्रांना एकत्रित केले जाईल. बहुतांश शाळांमध्ये वेळापत्रकानुसार चालणाऱ्या आणि कोविड-१९ काळात ज्यांची कोणाला आठवण देखील येत नाही अशा वार्षिक प्रशिक्षण वर्गांपेक्षा हे खूपच वेगळे असेल. आणखी एक बदल म्हणजे शिक्षक या लॉकडाउनच्या काळाचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, धडे योजना आणि गृहपाठ देण्यासाठी, स्मार्टफोन्स, टेक्स्ट मेसेजेस, ईमेल्स आणि व्हाट्सअप मार्फत विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडीअडचणी सोडवण्यासाठी करत आहेत. ही प्रक्रिया पुढे देखील सुरु राहील आणि विद्यार्थी व शिक्षक यांच्या दरम्यानचा ऑनलाईन संवाद अधिक वाढेल.

३. ट्युशन्स आधुनिक बनतील: आपल्या देशामध्ये ट्युशन्स ही शाळांना समांतर अशी एक व्यवस्था बनली आहे. ट्युशन्समध्ये मुलांना गृहपाठात मदत मिळते, अभ्यासातील शंका दूर केल्या जातात, अधिक जास्त शिकवले जाते आणि परीक्षांसाठी तयारी करवून घेतली जाते. कोविड-१९ च्या काळात यापैकी कितीतरी पूरक प्रयत्न थांबले आहेत. पालकांच्या लक्षात आले आहे की तंत्रज्ञानामुळे वैयक्तिकीकरण वाढले आहे, विद्यार्थी घरी बसून सराव करू शकतात, आपल्या शंकांचे निरसन करून घेऊ शकतात आणि अधिक जास्त शिक्षण मिळवू शकतात. त्यामुळे ट्युशन्स बऱ्याच प्रमाणात ऑनलाईन सुरु होतील. ट्युशन्स आणि शाळा यांचे एकमेकांना अनुरूप असे हे जग जे आजवर वास्तवात समांतर चालत आले आहे ते लोप पावेल आणि त्याऐवजी अधिक एकात्मिक सुविधा निर्माण केल्या जातील.

४. शिकवणे शिक्षककेंद्री नव्हे तर अधिक जास्त विद्यार्थीकेंद्री बनेल: प्रत्येक मुलाचा शिकण्याचा वेग वेगवेगळा असतो, प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन पातळी वेगळी असते. शाळा या मुळातच सामूहिक शिक्षणावर आधारित असतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत क्षमतांनुसार शिक्षण उपलब्ध करवून देण्यात माहिती आणि तंत्रज्ञान यांची खूप मोठी भूमिका असेल. कोविडमुळे तंत्रज्ञान स्वीकारावे आणि वापरावे लागण्याचा वेग वाढला आहे आणि कोविड-१९ नंतरच्या काळात देखील हाच ओघ कायम राहील असे मला वाटते. सर्व प्रकारच्या शिक्षणावर याचा प्रभाव पडेल.

५. निसर्गाशी सुसंवाद साधेल अशी जीवनशैली: अभूतपूर्व प्रमाणात करोनाचा प्रकोप झाल्यामुळे संपूर्ण मानवजातीला निसर्ग किती महान आहे हे एव्हाना समजून चुकले आहे, निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी आपल्या जीवनशैलीची, प्राथमिकतांची पुनःपडताळणी करण्याची ही संधी आपल्याला मिळाली आहे. कोविड-१९ च्या काळात आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना शिकवता येईल की त्यांना निसर्गाचा मान कसा राखता येईल आणि निसर्गासोबत सुसंवाद साधणे किती महत्त्वाचे आहे. या आजाराच्या साथीमधून निसर्ग आपल्याला काय सांगत आहे? अतिशय गंभीर आणि महत्त्वाच्या अशा या प्रश्नाचे उत्तर आपल्या भविष्यातील अभ्यासक्रमांचा महत्त्वाचा भाग बनेल.

सारांश असा की, विटा-भिंतींच्या शाळा असतीलच पण त्यांचे कामकाज, तेथील शिक्षण प्रक्रिया आमूलाग्र बदललेली असेल, तंत्रज्ञानावर आधारित संमिश्र शिक्षण मॉडेल आपल्याला पाहायला मिळेल. शिक्षण सुरु राहील पण विद्यार्थ्यांसाठी ते अधिक जास्त वैयक्तिक बनेल, शाळेतील अभ्यासाला पूरक ठरतील असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होतील.

(लेखक लीड स्कूलचे सह-संस्थापक व सीईओ आहेत)