24 October 2020

News Flash

निरुद्देश भटकंती आणि मनमुराद खादाडी

कळणाची भाकरी, मेथी-मिरची पातळ भाजी, कधी, डाळ-बाफळी, बेसन वडी रस्सा, जिलेबी, जवस चटणी...तुडुंब हाणलं...

– सुहास जोशी

जाऊ तेथे खाऊ हे गणित हल्ली इतकं परफेक्ट जमलंय की काही ठिकाणं अगदी नेमकी बोलवून घेतात. बऱ्याच दिवसापासून अर्धवट राहिलेल्या निरुद्देश भटकंतीला मुहूर्त लागला आणि बुलडाणामध्ये जंगी मेजवानीच मिळाली. कळणाची भाकरी, मेथी-मिरची पातळ भाजी, कधी, डाळ-बाफळी, बेसन वडी रस्सा, जिलेबी, जवस चटणी…तुडुंब हाणलं…

कचकून प्रवास आणि खच्चून खायचं हे एकच उद्दिष्ट. समोर पहिल्यांदा येईल ती गाडी पकडायची. रविवार रात्र 10.30 ते मंगळवार सकाळ 9.00 इतका वेळ हाती ठेवून निघालो आणि बुलडाणाला पोहचलो. इकडून परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी खादाडी महत्वाची. प्रत्येक गावातील खास खादाडी ठिकाणं शोधण्याची एक नॅक आहे. ती वापरून या हॉटेलचा शोध लागला.

मेन्यूचा भला मोठा बोर्डच होता, काय खावं यांच्या विचारात असताना मालक मुलानेच सांगितले, मिक्स थाळी घ्या. सर्व पदार्थ येतील. मग एक रिकामी थाळी आणि 3 वाट्या आल्या. भाजी, कढी वगैरेचे चार खणी पात्र आणून ठेवले. कांदा, काकडी, लिंबू, पापड पण आणले. आता आपल्याला हवं तसं हवं तेवढं वाढून घायचं. चपाती, पराठा, ज्वारीची आणि कळणाची भाकरी, मी कळणाची भाकरी घेतली. वांग्याची भाजी कम भरीत आणि मेथी-मिरचीच्या पातळ भाजी सोबत खाऊ लागलो. मर्यादित तिखट पण एकदम चमचमीत प्रकार होता.

पुन्हा तो तरुण मालक मदतीला आला. त्याने एक छोटी प्लेट दिली, म्हणाला ती भाकरी कुस्करा आणि मेथीच्या पातळ भाजीसोबत खा.. मग हळूच जवस चटणी आणि कच्चं तेल देखील आलं. मग बाफळी घेतली. हा दाल बाठीचाच एक वेगळा प्रकार. मुंबईत प्लम केक कसा स्लाइसमध्ये मिळतो तसे दिसते. ते पण कुस्करून कढीबरोबर ओरपलं. आणखीन एक भाकरी हाणली.

या भाकऱ्या चांगल्याच जाडजूड असतात. रमजानचे रोट असतात तसे. तसेही सकाळी फार खाल्ले नव्हते, त्यामुळे 2 भाकऱ्या गेल्या, नाहीतर एकच बास होईल. माझा असा खाण्याचा सोहळा सुरू असताना पानात 3-4 जिलेब्या आणि एका कागदी ग्लासात मठ्ठा आला. तिकडेच झोपावं असं वाटू लागलं होतं, मग भात रद्द केला.

खरंतर घाट चढल्यावर फक्त मटणच खावे असं मला डॉक्टरांनी सांगितलं आहे, पण आज अपवाद केला. पोटाला तडस लागेपर्यंत जेवलोय आणि आता परतीच्या प्रवासाला लागलोय. महामंडळाची नवी कोरी पांढरी गाडी आहे, विठोबा रखुमाई लिहलेली. सस्पेंशन चांगलंय, त्यामुळे आरामात टाईपता आलं.
रात्री खोपटला शिर्डीची शिवशाही सर्वप्रथम आली म्हणून ती पकडली. पहाटे शिर्डीला 5 वाजता खाण्याचे काही पर्याय नव्हते, मग जी गाडी आली ती पकडली आणि सकाळी औरंगाबादला उतरलो. समोर बुऱ्हाणपूरची गाडी खुणावत होतीच, पण किमान डबा टाकणे गरजेचे होते, त्यामुळे तिकडे गेलो नाही.
आवरून पोहे आणि रस्सा खाल्ला, चांगला होता. औरंगाबाद स्टॅन्डला बुलडाणा एसटी दिसली ती पकडली. संपूर्ण रस्त्यावर काम सुरू आहे, हायवे करताहेत. कंडक्टरला विचारलं किती वेळ लागेल तर तो म्हणाला, ‘ जातंय त्याच्या त्याच्या वेळेत’… मग वाटेत धाड नावाच्या गावात मूग वडा घेतला. हा दाळवड्यासारखाच, पण बराच पसरट, मुंबईतल्या हॉटेलमधील थालपीठाएवढा.

आवडेल तेथे प्रवास हा एसटीचा पास काढून निरुद्देश भटकायचं असा बऱ्याच दिवसांपासूनचा प्लान होता. पण गणित जुळत नव्हते. अखेरीस काल पास न काढताच 36 तास भटकायचं ठरवून निघालो आणि हे उद्योग केले. प्रवास हाच उद्देश असल्याने अधेमधे उतरणे टाळले. भोकरदनला उतरायचा मोह झाला होता, कारण त्याचं पुरातत्वीय महत्व. पण मग वेळेचे गणित बिघडले असते. वेगवेगळी गाव, दुकानाचे, शिक्षणसंस्थाचे, हॉस्पिटलचे बोर्ड त्या त्या गावाची ओळख सांगत होते. मलकापूर, पंढरपूर, कर्जत, खंडाळा अशी गावांची समान नावंही होती. दोनचार दिवस पाऊस बरा झाल्याने इकडंच वातावरण बरंच बरं आहे. सगळीकडे सोयाबीन लावलाय आणि सगळया शेतात कामं सुरू आहेत.

आता पुन्हा कधीतरी 2 -3 दिवस सवड काढून, पास काढून भटकायचं…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 12:45 pm

Web Title: aimless wandering with tasty food
Next Stories
1 BLOG : दमलेल्या आई-बाबांच्या तान्ह्या बाळाची कहाणी
2 BLOG : स्टार व मिडिया – वादाची ठिणगी आणि बरंच काही…
3 BLOG : जय श्रीराम! ते हे राम!
Just Now!
X