श्रुति गणपत्ये

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे… त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन…

राष्ट्रीय प्रतिज्ञेच्या सुरुवातीलाच भारताची जाती-धर्म, अन्न-वस्त्र, भौगोलिक परिस्थिती, भाषा अशी अनेक बाबतीत असलेली विविधता मान्य केली आहे. साऱ्या भारतीयांना समान दर्जा दिला आहे. शाळेत ही प्रतिज्ञा म्हणताना फार अभिमान वाटतो. पण प्रत्यक्ष समाजात जगताना मात्र या प्रतिज्ञाचा सोयीस्कर विसर पडतो. किंबहुना, याच जाती-धर्म हे माणसाचे शत्रू होऊन बसतात.

दक्षिणेकडे असलेल्या एका रामदपल्ली गावामध्ये समुद्राच्या किनारी ख्रिश्चन मच्छिमार आणि कष्टकरी मुस्लिम यांची वस्ती असते. दोन्ही समूह गरीब, मागासलेले असतात. पण एकत्र नांदत असतात. या गरिबीचा फायदा उचलत काही तरुणांना गुन्हेगारी जगताकडे खेचलं जातं. त्यातून अहमदअली सुलेमान हा तिथला दादा बनतो. साधारण १९८०च्या सुमारास भारतामध्ये अनेक परदेशी गोष्टींवर निर्बंध होते. तो माल समुद्रातून स्मगल करून विकला जायचा. या धंद्यामध्ये अली माहिर बनतो आणि पैसे कमावू लागतो. त्याला अर्थातच ख्रिश्चन मच्छिमारांची साथ असते. पुढे अली एका ख्रिश्चन मुलीशी लग्नंही करतो. पण स्थानिक राजकारणासाठी या दोन समूहांनी एकोप्याने राहणं राजकीय नेत्यांना मान्य नसतं. त्यामुळे दोन्ही समूहांमध्ये भांडणं लावून दिली जातात आणि त्यांच्यातली तेढ कायम राहते. अगदी पुढच्या पिढ्याही त्या द्वेषाचा बळी पडतात.

अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या “मालिक” या मल्ल्याळी चित्रपटामध्ये फहाद फासील या गुणी अभिनेत्याने अलीची भूमिका केली आहे तर त्याच्या बायकोची भूमिका द ग्रेट इंडियन किचन फेम निमिषा सजयनने केली आहे. दंगली कशा होतात, त्यासाठी वर्षानुवर्षे पार्श्वभूमी तयार केली जाते, द्वेषाची आग पेटत ठेवली जाते, गरिबांची पिळवणूक करून त्यांच्या साधेपणाचा फायदा उचलेला जातो, धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी अनेक निष्पापांचा बळी घेतला जातो. एकदा का तेढ निर्माण झाली की प्रत्येक जण आपल्या राजकारणासाठी त्या परिस्थितीमध्ये तेल ओतण्याचं काम करतो. धार्मिक द्वेषाचे असे अनेक पैलू या चित्रपटामध्ये उत्तम मांडले आहेत. चित्रपटाची कथा खूप सुंदर गुंफली आहे की धार्मिक द्वेषाने पछाडला तरी माणसातली माणूसकी त्याला अनेकदा स्वस्थ बसू देत नाही. आणि तीच एक आशा असते या राजकारणावर मात करण्याची.

सध्याच्या काळात अली मुस्लिम समूहाचा मोठा नेता आहे आणि त्याचं वर्चस्व राजकारण्यांना आता मान्य नाही. त्यामुळे हजच्या यात्रेला जाताना त्याला दहशतवादी म्हणून अटक होते आणि तुरुंगातच मारून टाकायचा निर्णय होतो. ही जबाबदारी कोणावर द्यायची तर त्याचवेळी पोलिसांवर हातबॉम्ब फेकले म्हणून अलीचा भाचा-बायकोच्या भावाचा मुलगा-तुरुंगात असतो. दोन्ही कुटुंबातला (मुस्लिम-ख्रिश्चन) द्वेष लक्षात घेऊन त्या मुलावर ही जबाबदारी टाकण्यात येते. पण अली जेव्हा त्याला भूतकाळ उलगडून सांगतो तेव्हा त्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकते. तो अलीला मारू शकत नाही. ही भूतकाळाची कथा हीच इथल्या भारताची-गोरगरिबांची कथा आहे. दोन वेगळे समूह कसे एकत्र नांदू शकतात आणि त्यांचा धर्म त्यांच्या आड येत नाही. अलीसारखे अशिक्षित, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही प्रसंगी धर्माला बाजूला ठेवून माणूसकीला महत्त्वं देतात ही मांडणी खूप महत्त्वाची आहे. दंगली, दोन समूहातील तेढ यांचं इतकं वास्तववादी चित्रीकरण क्वचितच चित्रपटांमध्ये येतं. पण मल्ल्याळी चित्रपट सध्या एकूणच कथानक आणि चित्रीकरणाच्याबाबत उत्कृष्ट काम करत असल्याने मलिक हा त्याला अपवाद नाही.

साधारण अशाच पार्भूर्श्वभूमीचा राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा “तुफान” हा हिंदी चित्रपटही अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. मुंबईच्या डोंगरी या मुस्लिम बहुल भागात वाढलेला अनाथ अझीझ अली (फरहान अख्तर), त्या भागातल्या रुग्णालयामध्ये डॉक्टर असणारी अनया प्रभू (मृणाल ठाकूर) आणि बॉक्सिंग कोच व अनयाचा बाप नाना (परेश रावल) यांची ही कथा आहे. नाना प्रभूला मुस्लिमांबद्दल भयंकर द्वेष असतो कारण बसमध्ये झालेल्या एका बॉम्बस्फोटांमध्ये त्याची बायको मारली जाते. ते स्फोट मुस्लिमांनीच केल्याचा त्याचा ठाम समज असतो. पण त्याची मुलगी ही त्याच्याकडेच बॉक्सिंगचे धडे घेणाऱ्या अलीच्या प्रेमात पडते आणि नानासाठी विचित्र परिस्थिती होते. आपल्या प्रेमाबद्दल ठाम असल्याने बापाचा विरोध पत्करून अनया घर सोडून निघून जाते, लग्नही करते. पण कथा तिथे संपत नाही. त्यात काही अनपेक्षित घटना घडतात. खरंतर खेळासंबंधी एखादा चित्रपट असला की त्या खेळाडूचा परिस्थिशी द्यावा लागणारा संघर्ष आणि शेवटी अत्यंत कठीण वाटणारी स्पर्धा जिंकून मिळालेली शाबासकी याच भोवती कथा गुंफली जाते. या चित्रपटाची कथाही तशीच आहे. सध्याच्या सामाजिक घडामोडींची जोड कथानकाला दिल्याने ते रंजक झालं आहे.

मुंबईमध्ये दोन वेगळ्या धर्माच्या जोडप्यांना एकत्र राहू द्यायला किंवा घर भाड्याने द्यायला लोकांचा असलेला नकार, मुलगा किंवा मुलीने धर्म बदलावा यासाठी टाकला जाणारा दबाव, कुटुंबियांची नाराजी आणि असहकार, मुस्लिमांविषयी असलेला पूर्वग्रह, पैशांची चणचण आणि आयुष्य ठीक चाललं आहे असं वाटत असतानाच अचानक उद्धस्त करून जाणारे अपघात असे अनेक प्रसंग कथानक शेवटपर्यंत कंटाळा आणात नाहीत. फक्त खेळ याविषयावरील चित्रपट म्हणून यात नवीन काहीच नाही. पण ज्या मुंबईतल्या शहरी वातावरणामध्ये ही कथा घात जाते ती खूप वास्तववादी आहे. खरंतर धार्मिक विद्वेषाच्या सध्याच्या वातावरणामध्ये “मालिक”, “तुफान”सारखे चित्रपट येणं गरजेचं आहे.

shruti.sg@gmail.com