News Flash

मिनारी: स्थलांतरितांच्या रुजण्याची गोष्ट

१९८०च्या दशकात कोरियाहून अमेरिकेला स्थलांतरित झालेल्या कुटुंबाची ही कथा आहे

सॅबी परेरा
आपल्या पोटापाण्यासाठी, आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्या भूमीत आपण जन्मलो, वाढलो ती भूमी सोडून परक्या भूमीत जाणे, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे, छोट्यामोठ्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षांचा सामना करणे हे खरंतर सर्वच स्थलांतरितांचे भागधेय असते. अंतिमतः या स्थलांतरितातील काहीजण भौतिक आयुष्यात कितीही यशस्वी झाले तरीही अंतःकरणाच्या खोल कप्प्यात कुठेतरी उपरेपणाची भावना घेऊन जगतात. याउलट काहीजण आपल्या पारंपरिक जीवनपद्धतीची आणि मूल्यांची नव्या भूमीतील जीवनाशी सांगड घालून, ‘काही आपलं काही त्यांचं’ असं करत स्वतःला त्या नव्या भूमीत केवळ जगण्यायोग्यच बनवत नाहीत तर त्या परक्या भूमीत रुजून फोफावताना, बहरताना  त्या भूमीला आणि तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक वातावरणालाही समृद्ध करतात.

मिनारी ही कोरियात आढळणारी अशी एक जंगली वनस्पती आहे जी, तिला जिथेकुठे थोडंफार पाणी मिळेल अशा तलावाच्या, ओहोळाच्या किंवा नदीच्या काठी उगवते. कसलीच काळजी न घेताही ती वाढत राहते. तिचं बी नवीन ठिकाणी नेऊन पेरलं तर उगवल्यानंतर पहिल्या मोसमात ती काहीशी खुरडी असते मात्र नंतर ती उत्तरोत्तर वाढतच जाते, फोफावत राहते. मिनारी ही कोरियन लोकांची रोजच्या जेवणातील आवडती भाजी / वनस्पती असून ती औषधी आहे. ती खाल्याने अनेक संभाव्य आजारापासून संरक्षण मिळते. मिनारी जिथे रुजते तिथली जमीन सुपीक करते, तिथलं पाणी शुद्ध करते अशी कोरियन लोकांची समजूत आहे. जगण्याचे रूपक म्हणून मिनारी या वनस्पतीचा वापर केलेला ‘ली आयसॅक चुंग’ या दिग्दर्शकाचा कोरियन-अमेरिकन सिनेमा म्हणजे ‘मिनारी.’

१९८०च्या दशकात कोरियाहून अमेरिकेला स्थलांतरित झालेल्या कुटुंबाची ही कथा आहे. जेकब आणि मोनिका हे तरुण जोडपं आपल्या दोन मुलांसह कॅलिफोर्नियातलं शहरी वातावरण सोडून अर्कान्सासमध्ये एका निर्जन ठिकाणी राहायला येतात. त्यांचा धाकटा मुलगा डेव्हिड हृदयविकारानं आजारी आहे तर थोरली मुलगी ॲन शांत आणि समजूतदार असून आपल्यापरीने आईवडिलांना मदत करीत असते.  जेकब आणि मोनिका एका पोल्ट्रीमधे कोंबडीच्या पिल्लांना लिंगानुसार वेगळे करण्याचं काम करतात. जेकबने आपलं शेती करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पन्नास एकराची शेती घेतली आहे. तिथे त्याला कोरियातील शेतांप्रमाणे भाजीपाला उगवायचा आहे. त्या भाजीपाल्याला कोरियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या लोकांकडून खूप मागणी येईल अशी त्याला आशा आहे. मोनिकाला मात्र शहरातील सोयीसुविधा सोडून शेजारी-पाजारी कुणी नसलेल्या, शाळा, चर्च, हॉस्पिटल, मॉल इत्यादी सुविधा नसलेल्या या विराण ठिकाणी राहणे जीवावर आलेले आहे. या मुद्द्यांवरून जेकब आणि मोनिकामधे भांडणं, कटकटी होत असतात.

नोकरी निमित्त दिवसभर बाहेर असणारे जेकब-मोनिका आपल्या अनुपस्थितीत आपली शाळकरी मुलगी अॅन आणि आजारी मुलगा डेव्हिड याची देखभाल करण्यासाठी मोनिकाच्या आईला (सुंजा) दक्षिण कोरियातून बोलवून घेतात. कोरियातून येताना मोनिकाची टिपिकल कोरियन आई (युरोप-अमेरिकेत आपल्या मुलाबाळांकडे जाणाऱ्या भारतीय आईप्रमाणेच) आपल्या मुलीसाठी आणि नातवांसाठी खाण्यापिण्याचं बरंच सामान घेऊन येते. त्या सामानातच एक पुडी असते मिनारी या वनस्पतीच्या बियांची. ते मिनारीचं बी, सुंजा आपल्या नातवासोबत शेतातील ओढयाकाठी पेरते आणि नातवाला मिनारीची वैशिष्टये आणि कोरियन समाजातील त्या वनस्पतीचं महत्व समजावून सांगते.

सुरुवातीला जेकबला त्याच्या शेतीत फारसं यश मिळत नाही. जे काही माफक यश मिळते त्याची चव चाखेपर्यंत तो यशाचा प्याला त्याच्या हातून गळून जातो. जेकब आणि मोनिकाच्या आयुष्याकडे पाहण्याच्या परस्पर विरोधी विचारसरणीमुळे, सुखाच्या दोन टोकाच्या कल्पनांमुळे त्यांचं कुटूंब भंगण्याची वेळ येते. पण पुढे एक घटना अशी घडते कि विस्कटू लागलेल्या या कुटुंबाचे बंध अधिक मजबूत होतात, कोसळू लागलेलं कुटुंब नव्या उमेदीने, जिद्दीने, जोमाने  पुन्हा एकदा उभं राहू लागतं.

अमेरिकेतच जन्म झाल्यामुळे भाषा आणि आचारविचार अमेरिकी असलेले डेव्हिड-अॅन कोरियात जन्मून, वाढून नोकरी-धंद्यासाठी अमेरिकेत आलेले ना धड  कोरियन, ना धड अमेरिकन असे जेकब-मोनिका आणि उभं आयुष्य कोरियात घालवून कोरियन भाषा, आचारविचार, संस्कृती याच्याशी घट्ट नाळ असलेली सुंजा असा हा तीन पिढ्यांचा संघर्ष आहे आणि त्याचवेळी आपापल्या परीने एकमेकां सोबत जुळवून घेण्याचा आटापिटा आहे.

डेव्हिड आणि त्याची आज्जी यांच्यातील नातेसबंधाचा ट्रॅक विशेष उल्लेखनीय झाला आहे. आजी येणार म्हणून खुश असलेला, आजी आल्यावर ती आपल्या कल्पनेतल्या आजीपेक्षा खूप वेगळी आहे हे पाहून खट्टू झालेला, आजीला आपल्यासोबत आपल्या खोलीत घ्यायला तयार नसलेल्या डेव्हिडचा नकोशा आज्जीपासून मैत्रिण झालेल्या आजीपर्यंतचा प्रवास खूप हळवा आणि सुंदर झालाय.

अपयश आलं तरी चालेल पण आपल्या स्वप्नांचा पाठलाग अर्ध्यावर सोडणार नाही असा निर्धार केलेला जेकब (स्टीवन यूआन), एका बाजूला नवऱ्याचं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुलांचं भवितव्य, आपल्या कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक गरजा या द्वंद्वात सापडलेली मोनिका (हान ये-री), आपल्या मुलीच्या संसाराला हातभार म्हणून आलेली आई, आपल्या नातवांचं प्रेम मिळविण्यासाठी धडपडणारी आजी आणि आपल्यामुळे आपल्या मुला नातवंडांना मदत होण्याऐवजी त्रास होतोय हे जाणवून विरक्ती आलेली सुंजा (यॉन यू-जंग) आणि दोन्ही पोरं (अँलन किम, नोएल चो) ही सर्वच पात्रं अभिनयात सरस उतरली आहेत.

सुंदर छायाचित्रण आणि पियानो मेलडीजचा वापर केलेलं तितकंच उत्तम पार्श्वसंगीत सिनेमा पाहताना आपल्याला खिळवून ठेवतं. दर्जेदार पटकथा, दिग्दर्शन, अभिनय आणि संगीत यामुळे या सिनेमाला एक तलम पोत प्राप्त झाला आहे. छोट्यामोठ्या प्रसंगातून, चित्रणातून, संवादातून, प्रतीकांतून मानवी भावभावनांचे हेलकावे बारकाईने टिपण्यात हा सिनेमा यशस्वी झालेला आहे.

स्वतःच्या स्वप्नामागे धावणारा जेकब आणि पारंपरिक पत्नीप्रमाणे नवऱ्यासाठी कौटुंबिक तडजोडी करणारी मोनिका या दोघांमधील संघर्ष क्लायमॅक्स पर्यंत नेताना प्रतिकूल परिस्थितीत तगून रहायचा आणि आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा संदेश अमेझॉन प्राईम वरील  ‘मिनारी’ हा सिनेमा देतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 1:35 pm

Web Title: amazon prime minari movie review avb 95
Next Stories
1 गुन्ह्यांचा शोध घेणाऱ्या दोन धाडसी महिला -“मेअर ऑफ ईस्टटाऊन” आणि “नोव्हेंबर स्टोरी”
2 “फॅमिली मॅन”चा झाला “सुपरमॅन”
3 मिसेस मुख्यमंत्र्यांचा नवा अवतार!
Just Now!
X