– जय पाटील

आसाम म्हटलं की सर्वांत आधी आठवतं ते तिथलं जैवविविधतेने समृद्ध काझिरंगा अभयारण्य. हा परिसर जसा एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसाच तो ओळखला जातो हत्तींसाठी. पण गेल्या काही वर्षांत तिथले हत्तीही शहरीकरणाच्या कचाट्यात सापडले आहेत. वन विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून वन्य प्राणी आणि मानवातला हा संघर्ष अधोरेखित झाला आहे.  आसाममधल्या चिरांग जिल्ह्यात बुधवारी वीजतारांच्या कुंपणामुळे एका गर्भवती हत्तीणीला जीव गमावावा लागला. ही एखाद दुसरी दुर्घटना नसून गेल्या १० वर्षांत आसाममध्ये विजेच्या धक्क्यामुळे तब्बल ११३ हत्तींचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या अहवालातून स्पष्ट होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिथले वन विभागाचे आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. जनजागृतीही करण्यात येत आहे, मात्र अद्याप त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश आलेले नाही.

आसाममधील हत्ती आणि मानवातील संघर्ष बराच जुना आहे. हत्ती एकटे-दुकटे फिरत नाहीत. ते कुटुंबकबिल्यासह कळपात फिरतात. अशा कळपांच्या वाटेत येणाऱ्या शेतांचं, घरांचं मोठं नुकसान होतं. हत्ती काही शेतातली पिकं खाण्यासाठी आलेले नसतात. पण त्यांच्या मार्गात येणाऱ्या शेतांचं त्यांच्या हालचालींमुळे त्यांच्याही नकळत नुकसान होतं. शेतीच्या या नुकसानाबद्दल सरकार भरपाई जाहीर करतं पण ती वेळच्या वेळी दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असतो. मग नुकसान टाळण्यासाठी आणि हत्तींना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक विविध मार्ग अवलंबतात. त्यापैकी अतिशय क्रूर मार्ग म्हणजे वीजतारांची कुंपणं. अशा कुंपणांना स्पर्श झाल्यामुळे अनेक हत्तींना जीव गमावावा लागला आहे.

पर्यावरणप्रेमींच्या मते हत्ती आणि अन्य वन्यजिवांच्या हक्काची जंगलं तोडून त्याजागी घरं बांधली गेली, शेती करण्यात येऊ लागली. त्यामुळे नुकसानीसाठी वन्य जिवांना दोष देणे अन्यायकारक आहे. अशा प्रकारची कुंपणे काढून टाकण्यासंदर्भात वन विभाग वीज वितरण मंडळाशी पत्रव्यवहार करत असतो. विजेचा गैरवापर केल्याबद्दल चिरांग परिसरात आजवर २९ ट्रान्स्फॉरमर्सचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अनेकदा वीज वितरण मंडळाकडून दुर्लक्ष झाल्यमुळे विजेच्या तारा लोंबकळत असतात. काही वेळा हत्तीचा अशा एखाद्या तारेला स्पर्श झाला तर त्याला विजेचा धक्का बसतो. त्यामुळे तारांच्या देखभाल दुरुस्तीकडे नियमितपणे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत प्राणीप्रेमी व्यक्त करतात.