केदार ओक

१८ तारखेपासून इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजेच ‘एशियाड’ चालू होत आहेत. आपल्याला एशियाड म्हणलं की एशियन गेम्सपेक्षा एसटी महामंडळाच्या एशियाड गाड्या आठवतात, हो ना? ह्यातला थोडासा गमतीचा भाग सोडा पण आशियाई स्पर्धा हा खरोखरच एक चांगला मोठा क्रीडा सोहळा असतो. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्वेकडील देशांना हळूहळू स्वातंत्र्य मिळायला लागलं होतं. ऑलिम्पिक्स ही जागतिक पातळीवर खेळली जाणारी क्रीडास्पर्धा होतीच पण आपलं वेगळं असं काही असावं ह्या भावनेतून आशियाई देश एकत्र आले आणि १९५१ साली आपल्या दिल्लीत एशियन गेम्सचा शुभारंभ झाला. पूर्वी आशियाई संघटनेकडून चालवले जाणारे एशियाड गेम्स आता ऑलिम्पिक्स संघटना चालवायला लागली आणि योगायोग म्हणजे त्यांच्या पहिल्या स्पर्धेचं यजमानपदही १९८२ साली दिल्लीकडेच होतं. त्या वर्षीचा दिल्ली एशियाड गेम्स हा आधुनिक भारताच्या पायाभरणीतला एक महत्वाचा टप्पा होता असं म्हणायला हरकत नाही. एक मोठी स्पर्धा यशस्वीपणे आपण पार पाडली. एशियन गेम्सच्या निमित्तानेे देशभरात रंगीत टीव्हीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला हेही एक विशेष.

यंदाच्या स्पर्धेत भारताचा सहभाग –

खेळाचे चाहते म्हणून आपल्याला वाईट वाटतं पण आपल्या देशात कोणत्याही मोठ्या स्पर्धेपूर्वी काहीतरी वादंग होतच असतात. यंदाही खेळाडूंच्या संख्येवरून कितीतरी दिवस संभ्रम चालू होता. असो, सगळ्या नाट्यानंतर स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि प्रत्यक्ष खेळावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ झाली. आजच्या लेखात आपण भारताच्या ‘टेनिस’ खेळाच्या संघावर नजर टाकणार आहोत. टेनिस खेळाला आशियाई स्पर्धेत विशेष ‘ग्लॅमर’ नाही कारण आपल्या खंडातून तितक्याश्या प्रमाणात जागतिक दर्जाचे विश्वविजेते खेळाडू अजून तयार झालेले नाहीत. मुळातच कमी आकर्षण असलेल्या ह्या स्पर्धेत – आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण ‘अमेरिकन ओपन’ स्पर्धा नेमकी आशियाई स्पर्धेच्या दरम्यान होत आहे. यूएस ओपन ही टेनिस टूरवरची एक अत्यंत महत्वाची स्पर्धा आहे. भारताचा युकी भांबरी, जपानचा केई निशीकोरी, आशियाई स्पर्धेचा गतविजेता जपानचाच निशियोका, दक्षिण कोरियाचा उदयोन्मुख खेळाडू चुंग हे प्रमुख खेळाडू ‘यूएस ओपन’मुळे आशियाई स्पर्धेला मुकतील. ह्या सर्वांच्या अनुपस्थित उझबेकिस्तानच्या डेनिस ईस्तोमीनचं पारडं जड आहे. युकी भांबरी भारताचा एकेरीतला सर्वोत्तम खेळाडू आहे. सध्या तो कारकिर्दीतल्या एका महत्वाच्या टप्प्यावर उभा आहे. ग्रॅण्डस्लॅम्स स्पर्धांच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याची त्याला सातत्याने संधी मिळते आहे. त्याचं वय, फॉर्म बघता सध्याच्या परिस्थितीत ही अशी उत्तम संधी तो चुकवू शकत नाही कारण ही वेळ परत येणार नाहीये. आशियाई स्पर्धेत आपल्याला त्याची उणीव जाणवेलच पण त्याच्या न खेळण्याच्या भूमिकेचा आपण आदर करून त्याला शुभेच्छा द्यायलाच हव्यात.

युकी नसला तरी अजून एक नवोदित खेळाडू आपल्या एकेरीतल्या पदकाच्या आशा पूर्ण करू शकतो. त्याचं नाव आहे रामकुमार रामनाथन. नुकत्याच झालेल्या न्यूपोर्ट एटीपी स्पर्धेची अंतिम फेरी गाठून त्याने आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. मस्त उंची असलेला हा खेळाडू जुन्या पद्धतीचा सर्व्ह अँड व्हॉलीचा खेळ खेळण्यात तरबेज आहे. एकेरीतला आपला दुसरा खेळाडू प्रज्ञेश गुणेश्वरनमध्येही धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता आहे. दोन महिन्यांपूर्वीच स्टुटगार्ट स्पर्धेत कॅनडाच्या डेनिस शपोवोलोव ह्या एटीपी टूरवरच्या अत्यंत गुणवान नवोदित खेळाडूला प्रज्ञेशने हरवलं आहे.

दुहेरीत आपली मदार पुन्हा एकदा लिअँडर पेसवरती आहे. लिअँडर पेस तब्बल १९९० सालापासून भारताला आशियाई स्पर्धेत पदक जिंकून देत आला आहे. ग्रॅण्डस्लॅम्स स्पर्धांमधली दुहेरीची भरपूर विजेतेपदं मिळवलेला लिअँडर पेस खरोखर एक महान खेळाडू आहे. त्याचे भारतीय टेनिसमधल्या लोकांशी, खेळाडूंशी वाद झाले, पण त्याचं खेळावरचं प्रेम, निष्ठा, त्याचा अचंबित करणारा फिटनेस कुणीही नाकारू शकत नाही. वयाच्या ४५ व्या वर्षी तो पुन्हा एकदा आशियाई पदक मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या जोडीला कोण खेळेल ह्याबद्दल अजून एकमत झालेलं दिसत नाही. नवोदित खेळाडू सुमीत नागल पेसच्या जोडीला खेळेल अशी बातमी आली होती तेव्हा बऱ्याच जणांनी ह्या गोष्टीला विरोध केला होता. सध्या मात्र रामकुमार रामनाथन पेसच्या साथीने खेळेल अशी लक्षणं दिसत आहेत. भारताची दुसरी दुहेरी जोडीही पदकाची भक्कम दावेदार आहे. अनुभवी रोहन बोपण्णा मिश्र दुहेरीतला ग्रॅण्डस्लॅम विजेता आहे. त्याचा जोडीदार डावखुरा दिविज शरणही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रोहन बोपण्णाची दुखापत मात्र थोडासा चिंतेचा विषय आहे पण स्पर्धा चालू होईपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल अशी आशा करूया.

कोणत्याही खेळाची संस्कृती देशाच्या नसानसात भिनायला वेळ लागतोच. मुळात ती तयार होण्यासाठी कुठल्यातरी खेळाडूला दैदिप्यमान यश मिळवावं लागतं. सानिया मिर्झाने आपल्या महिला टेनिसला एक मोठा बूस्टर दिलाय असं वाटलं होतं. तिच्या यशानंतर अनेक मुली खेळाकडे वळल्या असतील पण अजून तरी त्याचे निकाल मिळताना दिसलेले नाहीत. जागतिक स्पर्धा गाजवतील अशा मुली दिसत नाहीत, त्यात यंदा सानिया मिर्झा बाळंतपणाच्या सुट्टीवर असल्यामुळे खेळणार नाहीये. खरं सांगायचं तर अनुभवाच्या कमतरतेमुळे महिला गटातून आपल्याला पदकाच्या आशा कमी आहेत. मात्र यापूर्वीही चमत्कार घडलेले आहेत त्यामुळे आपल्या मुलींना संधी नाहीच असं म्हणणं वावगं ठरेल. विशेषतः आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिक्स स्पर्धा अशा ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतात.

त्यातल्या त्यात अनुभवी अंकिता रैना आणि नवोदित आशास्थान करमन कौर थंडी ह्यांच्यावर एकेरीतली मोठी जबाबदारी आहे. दोघींनी जागतिक क्रमवारीत २०० च्या घरात उडी घेतलेली आहे. ग्रॅण्डस्लॅम्स स्पर्धांच्या पात्रता फेऱ्या त्या दोघी खेळू शकतात. आपल्या महाराष्ट्रातल्या ऋतुजा भोसले आणि प्रार्थना ठोंबरे ह्या दोघी कशी कामगिरी करतात तेही बघायला आपल्याला नक्कीच आवडेल. प्रार्थनाने गेल्या आशियाई स्पर्धेत सानियाच्या जोडीने ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे. यंदा सानिया नसल्याने प्रार्थना तिचा दर्जा दाखवायला नक्कीच उत्सुक असेल.

थोडक्यात सांगायचं तर एका प्रतिष्ठित स्पर्धेत फारसं वलय नसलेली एक टेनिस स्पर्धा लवकरच चालू होतेय. काही अपवाद सोडले तर लौकिकार्थाने जागतिक पातळीवरचे विजेते इथे नसतील पण हे खेळाडूही त्या एका पदकासाठी नक्कीच जीव तोडून खेळतील. प्रत्येक खेळाडूला स्वतःचं असं काहीतरी मिळवायचं आहेच. प्रत्येका खेळाडूची आपल्याला छोटी वाटू शकणारी पण त्यांच्या दृष्टीने मोठी असणारी उद्दिष्ट असतीलच. बाकी, पदकं मिळत नाहीत म्हणून नाकं मुरडून, नावं ठेऊन उपयोग नाही. आपल्या देशाला खेळ संस्कृती नाही हे कटू सत्य आहेच पण ते बदलण्यासाठी आपणही आपापल्या परीने प्रयत्न केला पाहिजे, नाही का? पालक म्हणून आपल्या मुलांना खेळण्यास प्रोत्साहित करूया, खेळाचे चाहते म्हणून आपण आपल्या सगळ्या खेळाडूंना लढताना बघूया, त्यांचं कौतुक करूया, त्यांच्याबद्दल बोलूया, त्यांच्याविषयी लिहूया, जेणेकरून त्यांनाही हुरूप येईल.

आशिया स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या सगळ्या खेळाडूंना भरपूर शुभेच्छा. Go for the glory, all the best!!