पै. मतीन शेख

पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटातल्या पात्रता फेरीच्या पहिल्याच लढतीत बहारिनच्या अॅडम बेतिरोव्हने सुशील कुमारला नामोहरम केलं, सुशीलच्या या पराभवाबरोबरच त्याचं जकार्ता एशियाडमधलं आव्हान संपुष्टात आलं. यामुळे संपूर्ण भारतीय क्रिडा रसिकांचा हिरमोड झाला. सुशील २००६च्या दोहा एशियाडमध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेत त्याने कांस्यपदकाची कमाई केली होती. नंतर आशियाई स्पर्धेत तो कधीच सहभागी झाला नाही.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवल्यानंतर सुशीलला आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक आपल्या नावावर करण्याची मनस्वी इच्छा होती परंतु त्याचं हे स्वप्न भंगलं आहे.

एक म्हण आहे, “कुस्ती ही दोन पायांची वावडी असते.” याचा अर्थ असा की कुस्तीत कधी ही काही ही घडू शकतं. या खेळात अनेकदा अंदाज फोल ठरतात. सुशीलच्या बाबतीत तसंच झालं. लढतीच्या सुरवातीलाच सुशीलने आक्रमक खेळी करत पट काढून कब्जा घेत दोन गुण घेतले नंतर मात्र तो वेळखाऊ खेळी करायला लागला तसेच त्याने प्रतिस्पर्धी मल्लाला डोक्‍यात पंच मारला त्याच्या या चुकीच्या व नकारात्मक खेळीमुळे सुशीलला आंतरराष्ट्रीय नियमानुसार शिक्षा म्हणून पंचानी समोरच्या मल्लाला एक गुण बोनस म्हणून दिला. सुशीलला हे अपेक्षित नव्हतं, इथेच तो जरासा बिथरला. सुशीलला पुढे पुर्ण क्षमतेनं आणि आत्मविश्वासानं लढायला हवं होतं. परंतु याचवेळी सुशील आणखीन धीम्या अन् बचावात्मक म्हणजे कोणताच डाव न मारता हात पाय चालवत लढु लागला. याचाच फायदा घेत बहारिनच्या अॅडम बेतिरोव्हने सुशीलचा पट काढून दोन वेळा कब्जा घेत दोन – दोन असे चार गुण घेत आपला स्कोअर ५ गुणांनी अबाधित ठेवला. सुशीलच्या दहा बारा वर्षांतल्या खेळीत तो या लढतीत बराच बिथरुन लढला.

कुस्ती हातातून जातेय हे लक्षात येऊन ही सुशील आक्रमक खेळी करत कोणताच डाव मारण्याचं धाडस दाखवायला तयार नव्हता, त्याने विरोधी मल्लाला मॅटच्या बाहेर ढकलत एक गुण घेतला खरा पण तरीही २ गुणांनी तो पिछाडीवर होता. त्याने ‘करो या मरो’ या उक्ती प्रमाणे लढण्याऐवजी अॅडम समोर पुर्ण आत्मसमर्पण केलं जे त्याच्या कारकिर्दीत त्याने आधी कधी ही केलं नव्हतं. जास्त डाव न मारता आपली ताकद न वाया घालवता पुढच्या लढतीसाठी दम राखुन ठेवुन ही लढत सहज कशी जिंकता येईल असा सुशीलच्या डोक्‍यात होतं. पण, फासे उलटे पडले आणि सुशीलला ही हातची कुस्ती गमवावी लागली. ६६ किलो वजनी गटात तो दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता ठरला त्याच बरोबर जागतिक कुस्ती स्पर्धेत ही तो अव्वल ठरला पण सध्या त्याने आपला वजन गट बदललाय. ६६ वरुन तो थेट ७४ किलो वजनी गटात खेळात सुरवात केली तशी त्याची कुस्ती बरीच सैल झाली.

कुस्ती हा डावपेचासोबतच चांगल्या दमाने म्हणजे स्टॅमिनाच्या साधीने लढला जाणारा खेळ मन (आत्मविश्वास), मेंदू(डोक्याने आखले जाणारे डावपेच) आणि मनगट(शारिरीक दाकद) या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधुन कुस्ती लढावी लागते. यातील कोणत्या ही एका गोष्टींने साथ सोडली तर कुस्तीचा निकाल बदलतो. ३५ वर्षीय सुशील मोठा अनुभवी पैलवान पण आपला पहिल्या सारखा लढण्याचा स्टॅमिना तो या लढती टिकवू शकला नाही त्याच बरोबर तो कोणताच डाव मारायला धजला नाही यामुळे त्याला पराभवाला सामोरं जाव लागलं…