News Flash

Asian Games 2018 Blog : कबड्डीतला पराभव जितका धक्कादायक तितकाच चिंताजनक !

इराणकडून भारताच्या वर्चस्वाला धक्का

भारत विरुद्ध इराण सामन्यातील एक क्षण

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये दोन दिवसांपूर्वीच भारतासाठी धक्कादायक निकालाची नोंद झाली. भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघाला इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला. कबड्डीतलं भारताचं वर्चस्व पाहता दोन हक्काची सुवर्णपदकं ग्राह्य धरुन चालणाऱ्या भारतीय संघाला रौप्य आणि कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या दृष्टीने हा पराभव नक्कीच धक्कादायक आहे, १९९० सालापासून आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला. यानंतर आतापर्यंत भारत कबड्डीत आपलं अव्वल स्थान कायम राखत आलेला आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेत इराणने भारताच्या सोनेरी स्वप्नांना सुरुंग लावला. या पराभवानंतर सोशल मीडिया, क्रीडा रसिकांकडून आश्चर्यवजा नाराजी व्यक्त करण्यात आली. काही जणांनी हॉकीनंतर कबड्डीतही भारत आपलं वर्चस्व गमावणार की काय अशी भीती व्यक्त केली. मात्र भारतासाठी हा पराभव खरंच चिंताजनक आहे का?

या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेल्यास, हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. वर नमूद केल्याप्रमाणे १९९० सालपासून भारत कबड्डीत आपलं वर्चस्व कायम राखून आहे. जो खेळ भारताने इतर देशांना शिकवला, त्या खेळात भारत अग्रेसर असणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र कोणत्याही खेळाचा सर्वांगिण विकास तेव्हाच होतो, जेव्हा इतर देश तो खेळ चांगला शिकतात आणि त्यामधून स्पर्धा निर्माण होते. एशियाड स्पर्धेचा इतिहास बघितला तर काही ठराविक सामन्यांचा अपवाद वगळला तर भारत कबड्डीचे सामने एकतर्फी जिंकत आलेला आहे. माझ्या मते कबड्डीचे हेच एकतर्फी सामने तिला मोठं होण्यासाठी मारक ठरत होते. काही वर्षांपर्यंत हाताच्या बोटावर मोजता येतील इतके देश कबड्डी खेळायचे, मात्र आता कबड्डीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. पोलंड, अर्जेंटिना, केनिया सारखे देशही कबड्डीकडे वळले आहेत. इराण हा गेली अनेक वर्ष भारताला चांगली टक्कर देतो आहे. अशा परिस्थीतीत भारतासारख्या देशाला आपण हरवू शकतो हा आत्मविश्वास इतर देशांमध्ये निर्माण होणं गरजेचं होतं. असा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतरच कदाचीत इतर देश या खेळाकडे अधिक गांभीर्याने पाहू शकतात. यंदाच्या एशियाडमध्ये इराणने भारताला पराभूत करुन याची सुरुवात केलीच आहे. त्यामुळे भारताचा हा पराभव जरी धक्कादायक असला तरी कबड्डी या खेळाला मोठं करण्यासाठी तो नक्कीच प्रयत्न करेल. मात्र असं असलं तरीही काही बाबी नजरेआड करुन चालणार नाहीत.

सदोष संघनिवड –

गेल्या काही महिन्यांमधला अमॅच्युअर कबड्डी संघटनेचा कारभार, सदोष संघनिवड यांच्यासारख्या अनेक बाबी भारतीय कबड्डीसाठी घातक ठरत आहेत. आशियाई स्पर्धांमध्ये झालेल्या पराभवाचं विश्लेषण करण्याची वेळ आता निघून गेली आहे. मात्र महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाची निवड कोणत्या निकषांवर केली जाते हा प्रश्नच आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघनिवडीलाही अर्जुनवीर होनप्पा आणि राजरत्नम यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. संघात काही खेळाडूंची निवड नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली हे देखील एक कोडंच आहे. रोहित कुमारसारखा उमदा खेळाडू एशियाडमध्ये फक्त राखीव खेळाडूंच्या पंक्तीत बसून राहिला, त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. संदीप नरवाल, दिपक हुडा यांना त्यांची बलस्थानं सोडून मध्यरक्षकाच्या भूमिकेत खेळवण्यात आलं. भारतीय प्रशिक्षकांची ही चाल सपशेल अपयशी ठरली. राजुलाल चौधरी या खेळाडूच्या निवडीवरही अनेक जणांनी शंका निर्माण केली होती.

रणनितीचा अभाव –

आम्ही कबड्डीचे राजे, आम्हाला कोण हात लावणार? हा माज भारतीय संघाला चांगलाच महागात पडलाय. २०१४ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत इराणने भारताला चांगलाच घाम फोडला होता. खरं पाहता याचवेळी भारतीय कबड्डीने आपल्या रणनितीत सुधार करण्याची गरज होती. आज इराण पाठोपाठ कोरियासारखा देशही कबड्डीचे छोटे छोटे दुवे चांगल्या पद्धतीने आत्मसात करतो आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांआधी दुबईत झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारताने आपला सर्वोत्तम संघ उतरवला. मात्र इराणने सावध चाल खेळत आपल्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना या स्पर्धेत उतरवलं. त्यामुळे इराणच्या खेळाडूंची कितपत तयारी आहे याचा भारतीय खेळाडूंना अंदाजच आला नाही. मात्र भारताच्या सर्व खेळाडूंचा खेळ आणि त्यांच्या चालींचा यादरम्यान इराणने चांगला अभ्यास केला. २०१४ साली सुवर्णपदक जिंकलेल्या संघातील काही महत्वाच्या खेळाडूंना यंदा डच्चू देण्यात आला. त्यामुळे संघातील काही खेळाडूंमध्ये अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसत होती. २०१६ साली अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डी विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताशी सामना करावा लागू नये यासाठी पोलंडकडून हार पत्करलेला इराण आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतावर मात करणारा इराण या दोन गोष्टींचा नीट अभ्यास केला तर एक गोष्ट नक्की कळते, ती म्हणजे सावधान रात्र वैऱ्याची आहे.

सध्या दिल्ली उच्च न्यायालयाने अमॅच्युअर कबड्डी फेडरेशनवर प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. यानिमित्ताने गेल्या २८ वर्षांपासून कबड्डी संघटनेवर जनार्दनसिंह गेहलोत यांच्या कुटुंबाची असलेली एकाधिकारशाही आता संपूष्टात आलेली आहे. मात्र या काळात झालेल्या अनागोंदी कारभाराचा फटका, भारतीय कबड्डीला नक्कीच बसलेला आहे यात काही शंकाच नाही. तसेच यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी ३-३ प्रशिक्षकांना भारतीय संघासोबत पाठवण्यात आलं होतं. एक मान्यवर प्रशिक्षक तर प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये बसून फक्त कॅमेऱ्यावर फुटेज खात होते. यापाठीमागचा नेमका विचार काय होता हे संघटनेतील एकही माणूस सांगू शकणार नाही.

वरकरणी या गोष्टी छोट्या वाटत असल्या तरीही याचे दूरगामी परिणाम होत असतात. क्रिकेटमध्ये एक काळ वेस्ट इंडिजच्या संघाचं वर्चस्व होतं. मात्र १९८३ साली भारताने वेस्ट इंडिजवर मात करुन विश्वचषक जिंकला. यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाची झालेली परिस्थिती आपण सर्वजण पाहतोच आहोत. भारतीय संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारनेही भारताच्या या पराभवबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या पराभवाचे दूरगामी परिणाम होतील आणि ते भारताच्या हिताचे नसतील अशी भीती अनुपने व्यक्त केली आहे. तरीही या पराभवामुळे भारताच्या साम्राज्याला धोका बसेल अशी परिस्थिती सध्यातरी नाही, मात्र मुलभूत गोष्टींमध्ये बदल झाला नाही तर भारताचं कबड्डीतलं संस्थान खालसा होण्यास फार अवधी लागणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 9:20 am

Web Title: asian games 2018 indonesia reasons behind indias loss in kabaddi blog by prathmesh dixit
टॅग : Asian Games 2018
Next Stories
1 डॉन ब्रॅडमन यांना गुगलकडून मानवंदना, ११० व्या वाढदिवसानिमीत्त खास डूडल
2 Asian Games 2018 Day 9 : सुधा, नीना, आय्यासामीला रौप्य; सायनाला कांस्यपदक
3 Asian Games 2018 : भारतीय पुरुष संघही उपांत्य फेरीत
Just Now!
X