सॅबी परेरा

पाकिस्तान म्हणजे मागासलेला, कडव्या धर्मांध लोकांचा, आधुनिकतेपासून, आधुनिक विचारांपासून कोसो दूर असलेला देश अशी एक प्रतिमा आपल्या मनात असते आणि हल्लीच्या काही टीव्ही सिरिअल वगळता तिथली जी काही अत्यंत लोकप्रिय नाटके, सिनेमे आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतात त्यातील उथळ कथानकांनी, त्यांच्या अपरिपक्व हाताळणीने आणि भडक अभिनयामुळे पाकिस्तानी वेब सीरीजकडून आपल्याला फारशा अपेक्षा नसतात. अशावेळी असीम अब्बासी दिग्दर्शित चुडेल्स (Churails) ही वेब सीरीज आपल्याला एक सुखद धक्का देते.

इन्स्टंट जस्टीसचा आपल्या भारतीय उपखंडातील मनाला जरा जास्तच सोस आहे. कोर्टकचेरी करून मिळणाऱ्या न्यायापेक्षा सुडाने पेटलेल्या नायक/नायिकेने घेतलेला बदला आपल्याला भावतो. प्रेक्षकांच्या याच अपेक्षेला गोंजारणारा, आपल्याला त्रास देणाऱ्याला आपणही तसाच धडा शिकवायला हवा या विचाराचा, नव्वदच्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये डिम्पल कपाडिया अभिनित जख्मी औरत नावाचा सिनेमा आला होता. नंतर आपल्या सिनेमात, सिरिअलमधे त्याचे वेगवेगळे व्हर्जन्स निघत राहिले. ‘चुडैल्स’चा प्रयोग त्याच जातकुळीतला असला तरी बराच सेन्सिबल आहे.

कुटुंबासाठी वकिली सोडून पूर्णवेळ सुखवस्तू गृहिणी झालेल्या सारा, या एका राजकारणी व्यक्तीच्या बायकोला, आपला नवरा बाहेरख्याली असल्याचा सुगावा लागलेला आहे. एका लग्न समारंभात घडलेल्या अपघातामुळे घटस्फोटीत आणि मद्यपी असलेल्या जुगनूचा वेडींग प्लॅनरचा व्यवसाय मोडकळीस आलाय. वासनांध नवऱ्यापासून आपल्या कोवळ्या मुलीचे रक्षण करण्यासाठी त्याचा खून करणारी बतूल वीस वर्षाची शिक्षा भोगून नुकतीच तुरुंगातून सुटून आलीय आणि एका रूढीवादी कुटुंबातील झुबेदा या तरुण पोरीला बॉक्सर व्हायचे वेध लागलेत म्हणून ती घर सोडून पळून आलीय. या चार दिशेने आलेल्या चार जणी आपल्या इतर साथीदारांसोबत (ज्यात हॅकर, भुरटे चोर, लेस्बियन जोडपं, तृतीयपंथी, स्ट्रगलर अभिनेत्री, वेश्या असे तरतऱ्हेचें नमुने आहेत) एक अशी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजेन्सी सुरु करतात जी महिलांना आपल्या नवऱ्याचे गैरधंदे पकडून देण्यास मदत करील. हे काम पैशासाठीही केले जाईल आणि गरजू महिलांना पैसे न घेताही मदत केली जाईल असा या डिटेक्टिव्ह एजेन्सीचा उद्देश आहे आणि त्यांचं घोषवाक्य आहे “मर्द को दर्द होगा”.

आजूबाजूचा पुरुषप्रधान समाज आपल्याला चुडैल म्हणून हेटाळणी करायचा म्हणून या साऱ्या जणी आपलं चुडैल्स हे नामाभिधान अभिमानाने मिरवतात. बतूलने आपल्या नवऱ्याला मारले आहे म्हणून शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या नजरेत ती चुडैल, जुगनू पुरुषी व्यवस्थेने ठरवलेले सभ्यतेचे संकेत फाट्यावर मारते म्हणून ती चुडैल, झुबेदा आपल्या पालकांचा शब्द न पाळता पुरुषी खेळात प्राविण्य मिळविण्याची महत्वकांक्षा ठेवते म्हणून ती चुडैल. त्यांचा चुडैलपणा काय तर त्यांनी पुरुषप्रधान संस्कृतीची बंधने नाकारली आहेत किंवा त्यांना आव्हान दिले आहे.

मुळात एक पाकिस्तानी वेब सीरीज महिला सबलीकरणाबरोबरच वंशवाद, समलैंगिकता, घरगुती हिंसा, बालविवाह, गर्भपात, वेश्याव्यवसाय, अशा विषयाला हात घालते आणि जाता जाता बायकोशी प्रतारणा करणारा नवरा गे असेल तर काय? त्याला दुहेरी आयुष्य जगण्यासाठी समाजाने भाग पाडले असेल तर काय? असे प्रश्नही उभे करते. विषयाचे इतके विविध कंगोरे हाताळूनही निरस डॉक्युमेंट्री न होता, ही सीरिज एक समृद्ध, मनोरंजक आणि खिळवून ठेवणारा अनुभव देते ही महत्वाची बाब आहे.

या वेब सीरीजचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे सच्चेपणा. यातील प्रत्येक पात्रातली स्त्री ही सच्ची वाटते, त्यांच्या तोंडची भाषा त्यांच्या-त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा लहेजा घेऊन येते, त्यांचे कपडे डिझायनर वाटत नाहीत. एकेका घटनेला, प्रसंगाला प्रत्येकीची प्रतिक्रिया कृत्रिम वाटत नाही. काळा बुरखा वापरणाऱ्या दबलेल्या सामान्य स्त्री पासून आपल्या रंगीत बुरख्याचा सुपरहिरो सारखा वापर करणाऱ्या डिटेक्टिव्ह स्त्री पर्यंतचा त्यांचा हा प्रवास अगदी नैसर्गिक वाटतो.

प्रमुख पात्र असलेल्या महिलांच्या व्यक्तिरेखा खूप तपशीलवार रेखाटणाऱ्या या सिनेमात खलपात्र म्हणून येणाऱ्या पुरुषांच्या व्यक्तिरेखा तितक्याशा सशक्त वाटत नाहीत. आपल्या साम्राज्यावर, आपल्या अस्तित्वावर घाला घातला जात असतांना या धनदांडग्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि राजकीयदृष्टया प्रभावी असलेल्या व्यक्तिरेखांकडून फारसा प्रतिकार होत नाही हे काही पटत नाही. शेवटाकडे या वेब सीरिजची पकड थोडी ढिली होते. प्रेक्षकांसाठी खलनायक कोण हाही सस्पेन्स राहिलेला नसतो, तो फक्त एक उपचार बाकी असतो. साराचा नवरा राजकारणी असल्याचे संदर्भ येतात खरे, पण त्याच्या राजकारणी असण्याचा कथावस्तूला कसलाच बरावाईट फायदातोटा झाल्याचे दिसत नाही. तसेच बायकोच्या उपदव्यापाचा त्याच्या राजकारणावर काही परिणाम झाल्याचाही कुठे उल्लेख येत नाही. ह्या काही उण्या बाजू.

कथानकाच्या केंद्रस्थानी जरी स्त्री असली तरी संपूर्ण सीरीजभर ह्यातील स्त्री पात्रं चित्रचौकटीच्या मध्यावर कधी येत नाहीत, ती कडेकडेलाच दिसतात. आपल्या नवऱ्याची तक्रार घेऊन आलेली बाई, आपलं बायकोपण विसरू शकत नाही. म्हणूनच ती त्याला फार त्रास होणार नाही असं बघा अशी विनंती करते. अन्यायग्रस्त स्त्रियांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी जो एक कन्फेशन बॉक्स सारखा सेटअप केलेला आहे त्यात खालच्या बाजूला एक छोटी खिडकी केली आहे. त्या खिडकीतून केवळ पैसे घेतले जात नाहीत तर निराशेच्या गर्तेत असलेल्या स्त्रीचा हात हातात घेऊन तिला धीर देण्याचेही काम केले जाते. अशा छोट्या-छोट्या प्रसंगाचं चित्रण या सीरिजला अधिकच सुंदर आणि सच्चं बनवते.

सुंदर छायाचित्रण, ओघवते संवाद, आणि सर्वच कलाकारांचा नैसर्गिक अभिनय यामुळे ही सीरिज प्रेक्षणीय झालेली आहे. एकेक तासाचे दहा एपिसोड असले तरीही अनुभवात कुठे उणेपन येत नाही, सीरिज कुठेही कंटाळवाणी होत नाही, एकसुरी होत नाही.

जरूर पाहावी अशी पुरुषप्रधान संस्कृतीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्री च्या प्रश्नाला हात घेणारी मात्र कुठलंही थेट विधान न करता ते प्रेक्षकांच्या संवेदनशीलते वर सोडणारी zee5 ची वेब सीरिज…. Churails!