सुनिता कुलकर्णी

दिल्लीच्या मालवीयनगरमधल्या कांताप्रसाद यांचा ‘बाबा का ढाबा’ समाजमाध्यमांमध्ये रातोरात लोकप्रिय झाला आहे. रवीना टंडन, सोनम कपूर अशा सेलेब्रिटींनी त्याची दखल घेऊन मदतीचं आवाहन केल्यामुळे दिल्लीकर रांगा लावून ढाब्यावर जेवायला जायला लागले आहेत.

झालं असं की करोनामुळे टाळेबंदी झाल्यानंतर कांताप्रसाद यांचं गिऱ्हाइक आणि आवक घटली. एक साधा धाबा चालवणारा माणूस अशा वेळी किती तग धरू शकणार ? कुणीतरी त्यांची चौकशी केली तेव्हा कांताप्रसाद यांना अश्रू अनावर झाले. आपल्याला कसे वाईट दिवस आले आहेत हे त्यांनी डोळे पुसतच सांगितलं. रडणाऱ्या सत्तरीच्या कांताप्रसाद यांचा व्हिडीओ त्यांची चौकशी करणाऱ्या त्या माणसाने समाजमाध्यमांवर टाकून दिला. त्याची दखल घेऊन कांताप्रसाद यांच्यासाठी मदतीचे हात पुढे यायला लागले आहेत. त्यामध्ये सेलिब्रिटी आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत. त्यामुळे ‘बाबा का ढाबा’च्या सभोवती पुन्हा एकदा मटर पनीरचा घमघमाट दरवळायला सुरूवात झाली आहे. एरवी समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरावर टीका करणाऱ्यांनी या माध्यमांचं तोंड भरून कौतुकही केलं आहे.

कांताप्रसाद यांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या संवेदनशील, सहृदय माणसांचं कौतुक केलंच पाहिजे, पण आपल्याला असे कांताप्रसाद दिसण्यासाठी खरोखरच दुसऱ्या कुणीतरी समाजमाध्यमांवर व्हिडीओ टाकण्याची गरज आहे का? आपण डोळे उघडे ठेवून वावरलो तरी आपल्याला आपल्या आसपास ते दिसतील. कुणी भाजी विकत असेल, कुणी आपल्या घरी, आपल्या सोसायटीत झाडू मारायला येत असेल. कुणी चहाचा ठेला चालवत असेल तर कुणी रिक्षा चालवत असेल.

करोनाच्या महासाथीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेकांचे संसार मोडून पडले आहेत. वाताहात झाली आहे. जवळची माणसं गेली आहेत. पैसे संपले आहेत. रोजगाराचं साधन नाहीसं झालं आहे. त्यांना कांताप्रसाद यांच्याप्रमाणेच छोट्याशा आधाराची गरज आहे. कुणीतरी पाठीवरून हात फिरवायला हवा आहे. लहान सहान कामं हवी आहेत. त्यांच्याकडच्या किरकोळ वस्तूंची खरेदी करायला हवी आहे.

चला तर मग, आपण दरवेळी दुसऱ्यांनी केलेल्या व्हिडीओवर कशाला प्रतिसाद द्यायचा? कधीतरी आपणही कृती करूया. आपल्या आसपासच्या छोट्या छोट्या माणसांना आधार देऊया.

देणारे हात होऊ या…