-सुनीता कुलकर्णी

गेली चार वर्षे युट्यूबवर धुमाकूळ घालत तब्बल सात अब्ज व्ह्यूज मिळवणाऱ्या ‘बेबी शार्क’ या लहान मुलांसाठीच्या गाण्याने या आठवड्यात लोकप्रियतेची नवी उंची गाठली आहे. त्याला निमित्त ठरलं ते सेऊलच्या पिंकफॉग या प्रॉडक्शन कंपनीने केलेल्या या गाण्याच्या रिमिक्सचं आणि पुनर्निमितीचं.

‘बेबी शार्क’ हे युट्यूबवरचं सगळ्यात जास्त बघितलं, ऐकलं गेलेलं गाणं आहे. एक मिनिट २१ सेकंदाच्या या गाण्यातील doo-doo-doo- du-du-du-du-du-du च्या तालावर सहससोप्या स्टेप्समध्ये नाचता येतं. त्यामुळे पाच वर्षाच्या आतल्या मुलांचं हे अतिशय आवडतं गाणं आहे. या गाण्याचा गीतकार कोण हे माहीत नाही, पण अमेरिकेत कॅम्पफायर दरम्यान गायल्या जाणाऱ्या गाण्यावर ते बेतलं आहे त्याच्या वेगवेगळ्या आवृत्या निघाल्या आहेत असं सांगितलं जातं.

सेऊलच्या पिंकफॉग या कंपनीने ते नुकतंच रिमिक्स करून नव्या पद्धतीने सादर केल्यावर त्याच्यावर बच्चे कंपनीच्या उड्या पडल्या आहेत. या नव्या प्रकारात ते होप सेगोइन या दहा वर्षीय कोरियन अमेरिकी गायकाने गायलं आहे.

‘बेबी शार्क’ किती लोकप्रिय आहे हे नेमकं सांगायचं तर जानेवारी २०१९ मध्ये ते बिलबोर्ड हॉट १०० च्या यादीत ३२ व्या स्थानावर होतं. युट्यूबवर आता त्याची नवी आवृत्ती इतकी पाहिली गेली आहे की त्यापासून पिंकफॉगला ५.२ दशलक्ष डॉलर्स (३८.६६ कोटी) उत्पन्न मिळालं आहे. गाण्याची ही नवी आवृत्ती आधी दक्षिण पूर्व आशियामध्ये आणि नंतर मग युरोप अमेरिकेत व्हायरल झाली.

२०१७ मध्ये इंडोनेशियन लोकांनी या गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या आपल्या लहान मुलांचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या संख्येने टाकायला सुरूवात केली आणि गाण्याचा ट्रेण्ड व्हायरल झाला. त्यानंतर २०१८ मध्ये टिकटॉकवर #babysharkchallenge हा ट्रेण्ड व्हायरल झाला. मग ते इंग्लंडमध्ये टॉप टेनच्या यादीत समाविष्ट झालं. गेल्या वर्षी अमेरिकेत वॉशिंग्टन नॅशनल्स बेसबॉल टीमने ‘बेबीशार्क’चा आपल्या टीमचं गाणं म्हणून स्वीकार केला. त्यानंतर व्हाईट हाऊसनेही काही खास समारंभांमध्ये त्याची ट्यून वाजवली. ओक्लाहामामध्ये तीन कारागृह कर्मचाऱ्यांवर हे गाणं कैद्यांना सलग दोन तास एेकायला भाग पाडल्याबद्दल कारवाई झाली. असं केल्यामुळे कैद्यांच्या मनावर भावनिक ताण निर्माण झाला असा निवाडा तेव्हाचे जिल्हा न्यायाधीश डेव्हीड प्रेटर यांनी दिला होता.