05 December 2020

News Flash

‘बिहार में का बा?’ आणि ‘बिहार में ई बा…’; गायिकांच्या रॅपने प्रचारात धमाल

बिहार विधानसभा निवडणूक; प्रचाराची रणधुमाळी

-सुनिता कुलकर्णी

मैथिली ठाकूर आणि नेहा सिंग राठोड या दोन गायिकांनी सध्या ‘बिहार में का बा’ आणि ‘बिहार मे ई बा’ या रॅपच्या जुगलबंदीतून बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जान आणली आहे. त्यामुळे उमेदवार, त्यांची कामं, आश्वासनं या सगळ्यापेक्षाही सध्या या दोघींच्या गाण्यांचीच बिहारमध्ये जास्त चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी ‘बंबई में का बा’ असं एक जबरदस्त भोजपुरी रॅप साँग प्रदर्शित झालं होतं. अनुभव सिन्हा दिग्दर्शित त्या रॅपमध्ये प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी होते. या गाण्यावरून तयार झालेलं ‘बिहार मे का बा’ हे गाणं नेहा राठोडने गायलं. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘बिहार में का बा’ हे रॅप चांगलंच उचललं गेलं. त्यात राज्यातल्या सरकारी व्यवस्थेवर टीका करण्यात आली होती. त्याचाच आधार घेत विरोधकांनी ‘बिहार में का बा’ अशी पोस्टर्सही ठिकठिकाणी लावली.

त्याला उत्तर देताना भूपेंद्र यादव या भाजप नेत्यांनी ‘कितना गिनाए बिहार में का बा, का बा, देख लिजिए बिहार में ई बा’ असा व्हिडिओ प्रसिद्ध केला. एवढ्यावरच सत्ताधारी थांबले नाहीत तर त्यांनी मैथिली ठाकूर या बिहारमधल्या प्रसिद्ध तरूण गायिकेला पुढे करून ‘बिहार में ई बा’ हे गाणं पुढे आणलं अशी चर्चा आहे. मैथिली ठाकूर आपल्या व्हिडिओमध्ये ‘बिहार में ई बा’ हे रॅप गाताना दरभंगा विमानतळापासून ते आगामी एम्सपर्यंत बिहार कसा बदलला आहे ते सांगताना दिसते. प्रत्येक गावात सरकारने रस्ता, वीज, पक्क्या शाळा आणल्याचं सांगताना ती ‘बिहार में का बा’ हे गाणं लोकांची दिशाभूल करतं आहे असंही सांगते.

मैथिली ठाकूरच्या या गाण्यावर नेहा सिंग राठोडने ट्वीट केलं की कलाकारांनी सरकारची तारीफ न करता लोकहिताच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. समाज माध्यमांमध्ये ही दोन्ही गाणी भलतीच हिट झाली असून त्यावर आपली मतं मांडायला लोकांनी सुरूवात केली आहे. सत्ताधारी भाजप आणि जेडीयूने मैथिली ठाकूरला तर विरोधकांनी नेहा सिंगला असं आपापल्या भूमिकांनुसार पुढे केलं आहे, अशीही लोकांमध्ये भावना आहे.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणापासून बिहारी विधानसभा निवडणुकीला मिळालेला जबरदस्त फिल्मी ट्वीस्ट अजूनही उतरायला तयार नाही. बॉलिवूड कलाकारांमधली प्रेमप्रकरणं, अमली पदार्थांचं रॅकेट, हमरीतुमरी, त्यात उड्या मारत इतरांची ट्वीटरयुद्ध या सगळ्या धावपट्टीवरून पुढे गेलेल्या बिहार निवडणुकीत कुणी कुणाशी हातमिळवणी केली, कुणी कुणाची साथसंगत सोडली या सगळ्यापेक्षाही आता ‘बिहार में का बा’ ला मिळालेलं ‘बिहार में ई बा’ हे उत्तरच जास्त मनोरंजक ठरलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या मर्यादांमुळे मोठमोठ्या प्रचारसभा होतील की नाही, सरकारची कामं, विरोधकांचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचतील की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण नेहा राठोड आणि मैथिली ठाकूर यांच्या या रॅप गाण्यांनी त्यांची उत्तरं देऊन टाकली आहेत.

समाप्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 11:40 am

Web Title: bihra assembly election bihar poll bihar election bihar mein ka ba song election campaing bmh 90
Next Stories
1 BLOG: बडे बडे देशो में… गारुड कायम!
2 थंडी करोनाला गोंजारणार की गुंडाळणार ?
3 काय ? सरकारची ‘सेक्स’वर बंदी ?
Just Now!
X