समीर जावळे

‘सत्या’ सिनेमातला प्रसंग आठवतोय… दोघेजण स्कूटरवर येऊन भर चौकात एका निर्माता दिग्दर्शकाला गोळ्या घालतात आणि पळून जातात. काही समजायच्या आत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ‘तो’ गतप्राण होतो. सत्या सिनेमा १९९८ मध्ये आला होता. या प्रसंगाला पार्श्वभूमी होती ती निर्माता आणि कॅसेट किंग गुलशन कुमारच्या हत्येची. अगदी सिनेमात दाखवल्याप्रमाणेच ऑगस्ट १९९७ मध्ये गुलशन कुमारची हत्या करण्यात आली. आज त्याच कॅसेटकिंग गुलशन कुमारची जयंती आहे. हिंदी सिनेसृष्टी आजही गुलशन कुमार यांना विसरलेली नाही. दिल्लीतला ज्यूस विक्रेता ते कॅसेट किंग हा त्यांचा प्रवास निश्चितच थक्क करणारा आहे.

माणसाने मोठं होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं तर तो किती मोठा होऊ शकतो याचं मोठं उदाहरण होते गुलशन कुमार. १९५६ ला त्यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला. सुरुवातीच्या काळात ते ज्यूसचं दुकान चालवायचे. हे ज्यूसचं दुकान त्यांचे वडील चंद्रभान यांचं होतं. मात्र या व्यवसायात त्यांचं मन फार रमलं नाही. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. त्यामुळे दिल्लीत त्यांनी कॅसेटचं दुकान टाकलं. अनेक गाजलेली गाणी स्वतःच्या आवाजात किंवा नव्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन ते त्याच्या कॅसेट्स स्वस्तात विकत. त्यांनी लढवलेली ही युक्ती जादू करुन गेली. कारण या कॅसेट्सचा खप त्या काळात प्रचंड वाढला. त्यामुळे नोएडा या ठिकाणी गुलशन कुमार यांनी टी सीरिज या नावाने म्युझिक कंपनी सुरु केली. त्यानंतर काही काळाने ते मुंबईत आले. देवांना टीव्हीवर आणि म्युझिक इंडस्ट्रीत कुणी ग्लॅमर मिळवून दिलं असेल तर ते नाव म्हणजे गुलशन कुमार. त्यांनी देवांची अनेक गाणी गायली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. त्यांचं करिअर भराला होतं तेव्हाच त्यांना अनुराधा पौडवाल यांचीही साथ लाभली. अनुराधा पौडवाल यादेखील टी सीरिजच्या अल्बम्समध्ये झळकू लागल्या आणि कॅसेट्समधून त्यांचाही आवाज घराघरांमध्ये पोहचला.

एवढंच नाही तर सोनू निगम, कुमार सानू यांच्यासारख्या आजच्या घडीला प्रतिथयश असणाऱ्या गायकांना पहिला ब्रेक दिला गुलशन कुमार यांनी. या गायकांची गाणी संगीत प्रेमींना आवडू लागली. टी सीरिजचं साम्राज्यही वाढू लागलं. १९९० ते १९९६ या काळात टी सीरिज हा एक मोठा ब्रांड म्हणून उदयास आला. अमिताभ हिट्स, राजेश खन्ना हिट्स अशा स्पेशल नावाने गुलशन कुमार कॅसेट्सची विक्री करत. पूर्व आशियाई देशांमधून अवघ्या सात रुपयांमध्ये एक कॅसेट या दराने ते कोऱ्या कॅसेट्स आणायचे. रेकॉर्ड केलेल्या गाण्यांच्या या कॅसेट्स स्वस्तात विकायचे. १९८६ ते १९९६ या काळात टी सीरिजचा बोलबाला बाजारात चांगलाच वाढला. खरंतर कॉपी राइट कायद्याचं उल्लंघन हे गुलशन कुमार सर्रास करत होते. तशी तक्रार HMV सारख्या कंपन्यांनी केलीही होती. मात्र कॅसेट बाजारात आल्याशिवाय ती कोणती आहे याचा पत्ता लागत नसे. प्रत्यक्ष गाण्यांची कॉपी करताना गुलशन कुमार यांना ऑन द स्पॉट पकडणं आवश्यक होतं. मात्र तसे ते कधीही कुणाच्या हाती लागले नाहीत.

मोहम्मद रफीकी याद में, किशोर कुमार की यादमें या नावाने ते कॅसेट्स काढू लागले. तो काळ सीडी, डिव्हीडी, MP3 प्लेअर्सचा नव्हता. तेव्हा गाणी ऐकण्याचे दोनच पर्याय होते एकतर टेपरेकॉर्डरवर कॅसेट लावून गाणी ऐकणं किंवा रेडिओवर जी गाणी लागतील ती ऐकणं. पहिला पर्याय काहीसा खर्चिक होता. सामान्य माणसाला परवडतील अशा कॅसेट्सच्या किंमती त्या काळात नव्हत्या. हीच बाब गुलशन कुमार यांनी हेरली आणि स्वस्त दरांमध्ये कॅसेट विक्री सुरु केली. नवख्या गायकांच्या आवाजात जुनी गाणी गायली जायची त्याच्या कॅसेट्स विकायच्या.. ही कॅसेट्स हातोहात खपल्या. एकीकडे टी सीरिजचा वाढता बोलबाला आणि दुसरीकडे या टी सीरिजचं वाढणारं साम्राज्य यामुळे हिंदी सिनेसृष्टीत गुलशन कुमार यांना कॅसेट किंग म्हणून संबोधलं जाऊ लागलं.

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच गुलशन कुमार यांच्या करिअरची गोष्ट आहे. त्यांची ही प्रगती अंडरवर्ल्डच्या दृष्टीक्षेपात आली नसती तरच नवल. दाऊद अर्थात डी कंपनीचे फोन गुलशन कुमार यांना खंडणीसाठी येऊ लागले. त्या काळात डी कंपनीचा फोन आल्यानंतर सिनेमातलं कास्टिंगही बदललं जात होतं. खंडणीसाठी त्यांनी नकार दिला हे कारण तात्कालिक ठरलं. हिंदी सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अनेकांना त्यांची प्रगती खटकत होती.

अखेर १२ ऑगस्ट १९९७ हाच तो दिवस होता. ज्यादिवशी भर दिवसा गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी लिहिलेलं Let Me Say it Now हे पुस्तक प्रकाशित झालं. यामध्ये राकेश मारियांना गुलशन कुमारच्या हत्येची टीप आधीच मिळाली होती असा उल्लेख आहे. गुलशन कुमार शंकराचे भक्त होते. ते शंकराच्या मंदिरातून बाहेर पडत असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर नदीम श्रवण या संगीतकार जोडीतल्या नदीमने गुलशन कुमार यांच्या हत्येची सुपारी दिल्याचाही आरोप झाला.. त्यांच्या झालेल्या या अशा हत्येमुळे सगळी हिंदी सिनेसृष्टी हादरली.

गुलशन कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे त्यांचा मुलगा भूषण कुमार हे टी सीरिजचं सगळं काम पाहतात. त्यांनी टी सीरिजचं साम्राज्य आणखी पसरवलं. मात्र कॅसेट किंग गुलशन कुमार यांना आजही हिंदी सिनेसृष्टी आणि सामान्य माणसं विसरलेली नाहीत.