समीर जावळे

परवाच ‘तेजाब’ सिनेमातलं गाणं टीव्हीवर लागलं आणि आठवलं की वा काय सिनेमा होता हा. या सिनेमातल्या ‘डिंगडाँग डिंग’ या गाण्याने माधुरी दीक्षित ही घराघरात पोहचली. रातोरात स्टार झाली. त्याच माधुरीचा आज वाढदिवस! तिला घेऊन सिनेमा केला तो हिट होणारच हे समीकरणच झालं होतं. मात्र ती आली आणि तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असं तिच्या बाबतीत घडलं नाही…माधुरी दीक्षितचा ‘तेजाब’ सिनेमा तिकिटबारीवर तुफान चालला आणि माधुरी रातोरात स्टार झाली. पण त्याआधी तिने राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’मध्ये काम केलं. पण हा सिनेमा प्रेक्षकांच्या म्हणावा तसा पसंतीस उतरला नाही. त्यानंतर ‘स्वाती’ ‘हिफाजत’, ‘आवारा बाप’ ‘मोहरे’ यांसारखे चित्रपट आले मात्र तिकिटबारीवर ते अपयशी ठरले. एन. चंद्रा यांचा ‘तेजाब’ आला आणि माधुरी स्टार झाली. ‘एक-दो-तीन हे गाणं आज ३२ वर्षांनीही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

त्यानंतर मग माधुरीने मागे वळून पाहिलंच नाही. ‘राम लखन’, ‘त्रिदेव’, ‘परींदा’ ‘दिल’,’सैलाब’, ‘थानेदार’, ‘100 डेज’ ‘साजन’, ‘जमाईराजा’, ‘बेटा’, ‘खलनायक’, अंजाम, राजा, याराना, कोयला, मोहब्बत, हम आपके हैं कौन?, दिल तो पागल है, वजुद, पुकार, गजगामिनी, लज्जा, देवदास अशी किती तरी नावं घेता येतील. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट माधुरीने दिले. प्रेक्षकही तिचा सिनेमा म्हणून तो बघायला जात. सिनेमा डिजिटल झाला २००० नंतर त्याआधी माधुरीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यासाठी तिच्या अभिनयाचं कौतुकही झालंय.

(फोटो सौजन्य- माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम पेज)

‘तेजाब’ ते ‘देवदास’ची यशस्वी कारकीर्द
सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते अर्थात ‘तेजाब’चंच. तेजाबमधली मोहिनी तिने उत्तम प्रकारे साकारली. सिनेमात अनिल कपूर तिचा हिरो होता. चंकी पांडे, किरण कुमार, अनुपम खेर असे इतर कलाकार होते. मात्र माधुरी वेगळी ठरली ती तिच्या अभिनयामुळे आणि डिंगडाँग गाण्यामुळे. जी गोष्ट तेजाबची तीच गोष्ट ‘राम लखन’ सिनेमाची…

‘राम लखन’ हा सिनेमा सुभाष घईंचा होता. जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, राखी, अनिल कपूर अशी कलाकारांची फौज होती. त्यातही माधुरी हटके ठरली. तिचा अभिनय आणि तिचं नृत्य. ओ रामजी हे गाणं आजही आपल्या तोंडी सहज येतं.

‘साजन’ सिनेमा हा जुन्या ‘संगम’चा रिमेक होता अशी चर्चा रंगली होती. यातही दोन आघाडीचे स्टार होते संजय दत्त आणि सलमान खान. या दोघांसोबत होती माधुरी. प्रेम त्रिकोण दाखवणारा हा सिनेमा गाण्यांमुळे हिट तर ठरलाच पण माधुरीच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं.

‘बेटा’ सिनेमात तिची आणि अरुणा इराणी यांच्या अभिनयाची जुगलबंदी अजूनही आठवते. त्यातले डायलॉग्जही आपल्या लक्षात आहेत. यातल्या ‘धक धक करने लगा’ने माधुरीला एक उपाधी मिळाली ती कायमची तिच्या नावापुढे चिकटली. जी होती ‘धक-धक गर्ल’.

‘दिल’ सिनेमात माधुरी आणि आमिर खान हे दोघेही एकत्र झळकले. हा सिनेमाही सुपरडुपरहिट ठरला. प्रेमकहाणी, मग विरह मग पुन्हा एकत्र येणं अशी साधी सोपी कथा होती.. यातलीही गाणी सुपरहिट होती आणि माधुरी दीक्षितचा अभिनयही आमिरच्या तोडीस तोड होता.

‘साजन’ सिनेमाच्या वेळेस संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्यात जवळीक निर्माण झाल्याच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या. ‘खलनायक’ सिनेमाच्या वेळी हे दोघे आणखी जवळ आले होते असंही काहीजण सांगतात. मात्र संजय दत्त एके ४७ बाळगल्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेला आणि त्यानंतर या दोघांमधली कथित जवळीकही संपलीच. पण या दोघांमधली केमिस्ट्री त्या सिनेमात बघायला मिळते. जशी ती ‘थानेदार’ या सिनेमातही बघायला मिळाली होती..

मग आला ‘हम आपके हैं कौन?’ हा सिनेमाही राजश्री प्रॉडक्शनचा. माधुरीसोबत सलमानही होता. पण सिनेमा हिट ठरला तो माधुरीमुळेच. कारण सलमानचे अनेक सिनेमा त्यावेळी फ्लॉप ठरले होते. त्यामुळे तो एका हिटची वाट बघत होता. सिनेमा यशस्वी झाला पण चर्चा झाली ती माधुरीचीच. या सिनेमात तिने साकारलेली ‘निशा’ अविस्मरणीय ठरली. ‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘माई नी माई’ यांसारखी गाणी आजही आपल्या तोंडी आहेत हे यश माधुरीचंच आहे.

त्यानंतर आला ‘दिल तो पागल है’. या सिनेमात शाहरुख खान, करीश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित होते. या सिनेमातलीही गाणी सुपरहिट ठरली. हा प्रेमत्रिकोणही सगळ्यांनाच आवडला आणि यातला माधुरीचा वेगळा लुकही.

याशिवाय माधुरीने याच काळात ‘याराना’, ‘कोयला’, ‘वजुद’ यांसारखेही सिनेमा केले. वजुदमध्ये तिच्यावर करण्यात आलेली कविता जी नाना पाटेकरांनी म्हटली होती ती ‘कैसे बताऊ मै तुम्हे मेरे लिये तुम कौन हों’ ही देखील आजही स्मरणात आहे.

(फोटो सौजन्य- माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम पेज)

१९९९ मध्ये लग्न
२००० साल उजाडलं आणि हिंदी सिनेमाने कात टाकली. याआधी म्हणजे १९९९ मध्ये माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं आणि त्यानंतर पुढची चार वर्षे तिचे चित्रपट आले खरे. पण विशेष चर्चा झाली ती २००२ मध्ये आलेल्या ‘देवदास’ मधल्या तिने साकारलेल्या ‘चंद्रमुखी’ची. संजय लीला भन्साळी यांचा हा सिनेमा होता. या सिनेमात ऐश्वर्या रायने ‘पारो’ची भूमिका साकारली होती. या दोघींची भेट सिनेमात घडते तो प्रसंग आजही तसाच डोळ्यासमोर आहे. डोळ्यात प्राण आणून देवदासची वाट बघणारी चंद्रमुखी माधुरीने ज्या खास पद्धतीने रंगवली आहे त्याला खरंच तोड नाही. या सिनेमानंतर पाच वर्षे माधुरीने सिनेमा केला नाही..

२००७ मध्ये कमबॅक
‘डान्स’ हे माधुरीचं पॅशन आहे ते सिनेमांमधल्या तिच्या नृत्यांवरुनही दिसलं. स्टेज परफॉर्मन्सवरुन कळलं. पण कम बॅकच्या सिनेमासाठी तिने ‘आजा नचले’ हा सिनेमाच निवडला. हा सिनेमा अर्थातच नृत्यावर आधारीत होता. हा सिनेमा फारशी जादू चालवू शकला नाही. पण माधुरीची जादू कायम राहिली. ‘डेढ इश्कियाँ’, ‘गुलाब गँग’, ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’ हे तिचे अलिकडच्या काळातले चित्रपट. या सिनेमांमध्येही माधुरीला पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच ठरली.

पहिला मराठी चित्रपट

२०१८ मध्ये माधुरीने पहिला मराठी सिनेमा केला. ज्याचं नाव होतं ‘बकेट लिस्ट’ हा सिनेमाही प्रेक्षकांना आवडला. या सिनेमात माधुरीने बुलेटही चालवली. नऊवारी नेसून लावणीही केली. तिचं नृत्यावरचं प्रेम किती आहे हे यातून जाणवलं. या शिवाय ‘झलक दिखला जा’, ‘So You Think You Can Dance’, ‘Dance Deewane’ या रिअॅलिटी शोजमध्ये तिने नृत्य परीक्षकाची भूमिकाही चोख पार पाडली.

श्रीदेवी आणि माधुरी यांच्यातलं शीतयुद्ध
माधुरीने पदार्पण केलं तेव्हा श्रीदेवीची कारकीर्द ऐन भरात होती. या दोघींचेही चित्रपट तिकिटबारीवर गर्दी खेचत. तेव्हा या दोघींमध्ये एक शीत युद्ध रंगलं होतं असेही किस्से आहेत. नंबर वन कोण? अशी स्पर्धा या दोघींमध्ये होती असं म्हटलं जातं. मात्र या दोघींनीही ते कधी दाखवलं नाही.

(फोटो सौजन्य- माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम पेज)

माधुरी आता सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर ती तिचे अनेक फोटो पोस्ट करत असते. माधुरी दीक्षित हे नाव घेतलं की आजही आपल्या समोर येतं ते तिचं निखळ निरागस हसू आणि तिचं मोहून टाकणारं सौंदर्य.. हेच तिचं यश आहे आणि म्हणूनच माधुरी हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे यात काहीही शंका नाही. Happy Birth Day! माधुरी