News Flash

गोडवीट सारख्या छोट्या पक्षांकडून आपण बोध घेणार काय ?

पक्षांच्या बदलत्या हिवाळी स्थलांतरावरून वातावरणीय बदलाचे स्पष्ट दाखले आपल्यासमोर असूनही कारखानदारी व विकासदर वाढीमध्येच आपण गुंतलो आहोत.

– प्रेमसागर मेस्त्री, पक्षीअभ्यासक
समुद्रपातळीमध्ये होणारी वाढ, उत्तर ध्रुवावरील झपाट्याने वितळणारा हिमनग आणि याचा मानवी जीवनावर होणारा घातक परिणाम आपण बघतो आहोत. परंतु दुर्दैवाने ते स्विकारणे आणि पर्यावरण संरक्षणासाठी सज्ज होणे असे प्रयत्न जागतिक पातळीवर होताना दिसत नाहीत. पक्षांच्या बदलत्या हिवाळी स्थलांतरावरून वातावरणीय बदलाचे स्पष्ट दाखले आपल्यासमोर असूनही कारखानदारी व विकासदर वाढीमध्येच आपण गुंतलो आहोत. ब्लॅकटेल गोडवीट म्हणजे मळगुजा या छोट्या व सुंदर पक्षांच्या आलास्का ते न्यूझीलँड व भारत अशा दिर्घ प्रवासावरून वातावरणीय बदलाचे तोटे लक्षात येतात.

रायगड जिल्ह्याला 109 किलोमीटरचा विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. सह्याद्री पर्वतरांगांतून उगम पावणाऱ्या सावित्री, काळ गांधारी, कुंडलिका, मजगाव म्हसळे येथील खाडी, पाताळगंगा, काळ, गाढी, उल्हास इत्यादी मोठ्या व इतर लहान नद्या समुद्रमुखांना खाड्यांच्या रुपाने मिळतात. अलिबाग ते हरीहरेश्वर पर्यंत या खाडी मुखांवर अनेक बंदरांचा विकास झाला. एकेकाळी मत्स्य उद्योंगावर प्रभुत्व मिळविलेला रायगड जिल्ह्यातील हा किनारपट्टा आता मात्र मागास झाल्याचे दिसते. मासेमारी व त्यावर उपजिविका करणारी व्यापारी श्रृंखला ठप्प झाली आहे. याचा परिणाम पाणस्थळी आपली वसतीस्थाने निश्चीत करणाऱ्या स्थलांतरीत पक्षांवर देखील झाला.

महाड परिसरातील सावित्री गांधारी नद्यांचा संगम आणि वीर रेल्वेस्टेशनच्या दलदल, कांदळवनाच्या भागात अनेक उत्तरध्रुव, युरोप, रशिया, उत्तर मध्य चीन, उत्तर पूर्व आखाती प्रदेश आदी देशांतून हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षी अगदी वेळेवर पोहचायचे. ज्यामध्ये कुदळ्या (ibis), कुरव (tern), कुरलव, ससाणा (Falcon), करकोचा (stork), अडईबदक (lesser whistling teal), उचाट्या (pied avocet), तुतारी (sandpiper), शेराटी (stilt), कैकर गरुड (osprey), कांडेसर (woolly necked stork), स्टेपी गरूड (steppe eagle), पट्टकादंब हंस (barheaded goose), राजहंस (swan)  चक्रवाक (brahmni duck), काळे गिधाड (cinereous vulture) असे साधारण 128 जाती प्रजातींचे पक्षी मोठ्या संख्येने येत असतात. परंतु गेल्या दोन दशकात त्यांच्या संख्येत कमालीची घट झालेली दिसते. खाडीमुखावरील प्रदूषण आणि नव्या मोठमोठ्या प्रकल्पांमुळे इथला पक्षांचा अधिवास  झपाट्याने संपुष्टात येत आहे. शिवाय जागतिक तापमान वाढीमुळे बदलते हवामान, चक्रीवादळे, आणि हिमवर्षाव याचा फार मोठा फटका पक्षीजगतावर घातक परिणाम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नुकतीच अकरावी आंतरराष्ट्रीय आशियाई शिकारी पक्षी संशोधन संवर्धन इंडोनेशिया येथील बाली या शहरात संपन्न झाली. साठ देशातील प्रतिनिधी पक्षी निरीक्षक, शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन याविषयी चर्चासत्रे, स्लाईडशोज, शास्त्रीय प्रबंधांच्या माध्यमातून काही उपाययोजना, निष्कर्ष काढले. प्रगत माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमाने एक नेटवर्क तयार होण्यास मदत झाली. त्यायोगे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाॅटस्अॅपचे तंत्र वापरून माहिती संक्रमण आणि प्रसार, निरीक्षण नोंद घेणे सहज शक्य झाले. त्याचा फायदा देशपातळीवरील त्या त्य़ा देशांतील वन्य जीव पर्यटनास होतोच पण त्याचबरोबर पक्षीसंवर्धनाबाबत आंतरराष्ट्रीय करार आणि अंमलबजावणी करणे  शक्य होते.

आॅस्ट्रेलियातील माझे मित्र सर डेव्हिड बाँड या परिषदेत हजर होते. पूर्व आॅस्ट्रेलिया आणि न्यझीलँड बेट या परिसरातील फ्लायवे हर्बर्सवर त्यांचा प्रबंध त्यांनी सादर केला. पुढे मायदेशी परतल्यावर फेसबुकच्या माध्यमाने त्यांनी आलास्का, टुंड्राृ या उत्तर गोलार्धातील ब्लॅकटेल गोडवीट (मळगुजा) या पक्षाचे आॅस्ट्रेलियात आगमन झाल्याचे कळविले. आलास्का, टुंड्रा, रशिया अशा प्रवासाला 10 ते 11 आक्टोबरला निघालेला गोडवीट पक्षी तेथुन त्यांच्या सवंगड्यांसह निघाला तो बरोबर 20 आॅक्टोबरला ईस्टर्न फ्लायवे हर्बर आॅस्ट्रेलिया या पत्त्यावर न चुकता दाखल झाला. त्याला रेडियो ट्रान्समीटर बसवणारे माझे सहकारी सर ग्राहम हे वेडर्स (पाणथळी पक्षी) या समुद्रीपक्षांवर गेली चाळीसहून अधिक वर्षे शास्त्रीय संशोधन करीत आहेत. त्यांनी उत्तर गोलार्धातील आईसलँड, फिनलँड, ग्रीनलँड आणि आलास्का येथे टॅग केलेले पक्षी, त्यांची नोंद, रिंगनंबर्स जपान येथील एआरआरसीएन संस्थेचे अध्यक्ष तोरू यामाझाकी, फिलीपीन्स येथील अॅलीक्स टिएंगो, जैसन, थायलँड येथील चुमचोन, चुकेत नलसोरी, कोरीया येथील कीम आणि हांग, इंडोनेशिया अशा आशियाई देशांतर्गत अभ्यास करणाऱ्या अडीच हजारावर पक्षी संशोधकांना कळविले.

रेडिओ ट्रान्समीटरच्या संकेतानुसार पक्षांची स्थाने, त्यांची उड्डाणांची दिशा इत्यादी व अनेक माहितीचे संकलन व संक्रमण प्रसार माध्यम तंत्रामुळे कळविणे शक्य होत होते. आपल्या परिसरातील अलिबाग, रेवदंडा, आक्षी येथील फोटोसहीत नोंद पाठविण्याचे काम पक्षी अभ्यासक प्रविण कवळे व ड़ाॅ. वैभव देशमुख यांनी चोख बजावल्यामुळे मला माझ्या मित्रांना ही माहिती पोस्ट करता आली. आश्चर्य म्हणजे लाखोच्या संख्येने प्रवासाला निघालेला पक्षीसमुह अंतिम टप्प्यापर्यंत पोहचताना त्यांच्या संख्येत कमालीची घट होत असल्याचे निदर्शनास, आले. गेली दीड ते दोन दशके सातत्याने त्यांच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब आहे. थायलँड, मलेशिया, म्यानमार, पश्चिम बंगाल, भारत अशा प्रवासा दरम्यान त्यांची संख्या घटते. तसेच मंगोलिया, चीन , व्हिएतनाम याप्रवासा अंतर्गत देखील त्यांची संख्या कमालीचीच घटल्याची नोंद आहे.

सुमारे 11000 ते 13000 किलोमीटर इतका प्रवास करून गोडवीट पक्षी दहा दिवसात निश्चीत ठिकाणी न थांबता पोडचतो. इतका प्रवास करून त्यांच्या वजनात नैसर्गिक वजनापेक्षा चाळीस टक्के घट होते. मग हा पक्षी जेव्हा एखाद्या खाडीत पोहचतो तेव्हा त्याला खाद्य उपलब्ध होणे गरजेचे असते. परंतु आपल्याकडे प्रदूषणामुळे आणि कांदळवऩांची कत्तल होण्यामुळे या परदेशी पाहुण्यांना ऐन दिवाळीत उपासमारीला सामोरे जावे लागते. इतका लांबचा प्रवास करून आलेला पक्षी एका मिनीटांत 36 त् 30 वेळा खाद्य खातो. त्यामुळे निरीक्षण करताना तो स्थिर एका ठिकाणी थांबलेला दिसणे कठीण. शिवाय हवेच्या घर्षणामुळे त्याचे शरीरतापमान कमालीचे वाढलेले असते. ते पाण्यामध्ये थंड़ होणे गरजेचे असते. कांदळवन किनाऱ्यावरील खाडीच्या उथळ पाण्याचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. परुंतु खाजणीची हि कांदळवने नवीन प्रकल्प उभारणीमुळे नष्ट होत आहेत. त्याचा परिणाम पाण्याच्या तापमान वाढीत झालेला दिसतो. प्रदूषके आणि तापमान वाढीमुळे अशा पक्षांच्या थव्याला उष्माघाताला सामोरे जावे लागते. या सर्वांमध्ये काही नवीन पाणथळे शोधून तेथे हा पक्षीगण जगण्याचा प्रयत्न करतो व पुन्हा मायदेशी प्रवासाला सुरुवात करतो.

पर्यावरण आणि वृक्षतोड, परिस्थितीकी बाह्यविकास प्रकल्प आणि वाढती लोकसंख्या यामुळे पर्यावरणाचे विविधअंगी बदलाचे दाखले आपल्याला बघावयास मिळते.  पक्षांच्या या अचंबित करणाऱ्या प्रवासांतून असे दाखले मिळाल्यावर देखील आपण थांबणार नसू तर आपल्या पृथ्वी संजीवनीचा प्रवास लवकरच संपण्याच्या मार्गावर येणार की काय हे असा प्रश्न आपल्यापुढे येऊन उभा राहतो..

(लेखक हे एआरआरसीएन चे सदस्य आहेत)
sagarulaanvultu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 4:41 pm

Web Title: black tail birds travelling konkan raigad from alaska new zealand nck 90
Next Stories
1 निवडणूक निकालाचा अर्थ काय?
2 BLOG : शरद पवारांची ‘पॉवरफुल’ इनिंग
3 …आणि वाढली आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्याची शक्यता
Just Now!
X