सुनीता कुलकर्णी
बीबीसीचे वार्ताहर मार्टिन बशीर यांनी २० नोव्हेंबर १९९५ रोजी घेतलेल्या लेडी डायनाच्या ‘त्या’ जगप्रसिद्ध मुलाखतीची बीबीसी पुन्हा चौकशी करणार आहे.

लेडी डायना हा एकेकाळी जगातल्या अनेकांच्या हृदयाचा हळवा कोपरा होता. वयाच्या ३६ व्या वर्षी पापाराझींचा पाठलाग चुकवण्याच्या प्रयत्नात तिचा ३१ ऑगस्ट १९९७ रोजी अपघाती मृत्यू झाला आणि ती जणू काही दंतकथाच होऊन गेली. डायनाला जाऊन २३ वर्षे झाली असली तरी प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स विल्यम्स, प्रिन्स हॅरी यांना लोक स्वतंत्र माणसं म्हणून ओळखतच नाहीत. आजही त्यांची ओळख डायनाचा नवरा, डायनाची मुलं अशीच आहे.

मार्टिन बशीर यांनी घेतलेली डायनाची ५५ मिनिटांची मुलाखत तेव्हा बीबीसीवरून प्रसारित करण्यात आली होती आणि ‘चार्ल्सबरोबरच्या माझ्या वैवाहिक जीवनात कायमच आम्ही तिघं होतो. तिसरी व्यक्ती होतीच आमच्यात गर्दी करायला.’ असं उघडपणे सांगणाऱ्या डायनाने तिच्या लग्नाची परीकथा कशी फसली होती ते उघड केलं होतं. तिच्या या मुलाखतीनंतर राणी एलिझाबेथने महिनाभरात डायना आणि चार्ल्स, दोघांनाही पत्र लिहून त्यांच्या घटस्फोटाला आपली संमती असल्याचं कळवलं होतं.

ब्रिटिश राजघराण्यामधल्या कौटुंबिक गोष्टी जगाच्या चव्हाट्यावर मांडणाऱ्या डायनाच्या या बहुचर्चित मुलाखतीची आता २५ वर्षांनंतर चौकशी करण्याचा निर्णय बीबीसीने का घेतला आहे?

त्याला कारणीभूत ठरला आहे ‘आयटीव्ही’ या ब्रिटिश नेटवर्कवर गेल्याच महिन्यात दोन भागात प्रसारित झालेला ‘द डायना इंटरव्ह्यू: रिव्हेंज ऑफ अ प्रिन्सेस’ हा माहितीपट. या माहितीपटात मार्क व्हिसलर या ग्राफिक डिझायनरने म्हटलं आहे की डायनाची ती जगप्रसिद्ध मुलाखत घेणाऱ्या मार्टिन बशीर यांनी व्हिसलर यांना तेव्हा काही बनावट बँक कागदपत्रे तयार करून देण्यासाठी विचारलं होतं. डायनासाठी नेमलेल्या शाही घराण्याच्या कर्मचाऱ्यांना डायनावर पाळत ठेवण्यासाठी वेगळा पगार दिला जातो असं त्यांना त्या कागदपत्रांमधून दाखवायचं होतं, त्यातून डायनाचा विश्वास जिंकून ती मुलाखत मिळवली गेली असा मार्क व्हिसलर यांचा दावा आहे.

एम १५ या ब्रिटिश सुरक्षा यंत्रणेकडून आपल्यावर पाळत ठेवली जाते आहे असा डायनाला संशय होता. खोटी बँक कागदपत्र तयार करून तत्कालीन सुरक्षा प्रमुख अर्ल स्पेन्सर यांना एका प्रकाशकाकडून १०, ५०० पौंड दिले गेले असं दाखवलं गेलं आणि डायनाच्या मनातील असुरक्षिततेचा फायदा घेतला गेला असावा असा संशय आहे.

अर्थात डायनाची ती मुलाखत प्रसारित झाली तेव्हादेखील काही गडबड असल्याचे आरोप झाले होते आणि मुलाखत घेणारे मार्टिन बशीर मुलाखतीनंतर भूमिगत झाले होते. त्यानंतर १९९६ मध्ये बशीर यांच्यावरील त्या आरोपांची बीबीसीचे तेव्हाचे वृत्तप्रमुख टोनी हॉल यांनी चौकशी करून बशीर यांना क्लीन चिट दिली होती.

पण आता डायनाच्या भावाने बीबीसीचे आत्ताचे महासंचालक टीम डेव्ह यांना एक पत्र लिहून डायनाच्या त्या मुलाखतीच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. ‘टोनी हॉल यांनी सत्य जाणून घेण्यासाठी तेव्हा मला काहीच कसं विचारलं नाही? बशीर यांना अशा पद्धतीने पाठीशी का घातलं गेलं? मी पुन्हा सगळी चौकशी करा असं बीबीसीला म्हणत नाही, पण या प्रश्नांच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे. बशीर यांनी बँकेची ती कागदपत्रं दाखवल्यामुळेच तर मी त्यांची माझ्या बहिणीशी, डायनाशी भेट घडवून आणली. अन्यथा मला तसं करण्याचं कारणच नव्हतं असं स्पेन्सर यांचं म्हणणं आहे. बशीर यांनी डायनाच्या मुलांना सांभाळणाऱ्या नॅनीची विशिष्ट व्यक्तीशी जवळीक असल्याचं पत्र डायनाला पाठवून तिला मुलाखतीसाठी धमकावलं असा पुरावाही आपल्याकडे आहे असं डायनाच्या भावाचं म्हणणं आहे.

या घडामोडींमुळे बीबीसीने डायनाच्या त्या मुलाखतीसंदर्भात बशीर यांची पुन्हा चौकशी करायचं ठरवलं आहे. एकूण डायनाला नीट जगूही दिलं गेलं नाही आणि तिला शांतपणे चिरनिद्राही घेऊ दिली जाणार नाही असं दिसतं आहे.