-मयूरेश गद्रे

खरंतर ही ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त विंदा करंदीकर यांच्या एका कवितेतली (‘विरुपीके’तली) माझी अत्यंत आवडती ओळ. पण आज जो अनुभव मला आला तो व्यक्त करायला माझ्याकडे केवळ आणि केवळ हेच शब्द आहेत. म्हटलं तर ही एका पुस्तकाची गोष्ट आहे. पण पुस्तकावर प्रेम करणाऱ्या आणि असं प्रेम करता करता पुस्तकं विकणाऱ्या माझ्यासाठी हा अत्यंत हृदयस्पर्शी अनुभव आहे. (कुणी असंही म्हणेल की ज्यावर प्रेम करतोस ते विकतोस कसं, पण तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो…)

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
water supply through tankers
दुष्काळ ; ५,००० गावे टँकरग्रस्त
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

झालं असं की, सुमारे महिन्या-दीड महिन्यापूर्वी मी दुकानात असताना एक फोन आला. पलिकडून एक बाई बोलत होत्या. “सर, आपलं पुस्तकांचं दुकान आहे ना?” म्हटलं हो. “सर, मी एक निबंधांचं पुस्तक लिहिलंय. ते तुमच्याकडे विक्रीला ठेवायचंय. पुस्तक मराठी निबंध आणि व्याकरणाचं आहे; पण CBSE आणि ICSCच्या मुलांसाठी आहे. पाठवू का तुमच्याकडे ?”. मी म्हटलं “पाठवायला हरकत नाही. पण शक्य असेल, तर पुस्तकाच्या काही पानांचे फोटो पाठवलेत तर बरं होईल. ते बघून मी तुम्हाला सांगतो.”

सध्या, माझा सर्वसाधारण अनुभव असा आहे की मोठे, नामवंत प्रकाशक, पुस्तक छापताना निदान पुरेसं मुद्रित-शोधन (प्रूफ रीडिंग) करून घेतात. पण बाकी अनेक, विशेषतः अशी घरगुती म्हणजे स्वतःच पुस्तक लिहून स्वतःच छापणारी मंडळी फार धमाल करतात. म्हणजे एकदम ‘ध’ चा ‘मा’. त्या बाईंनी पाचव्या मिनिटाला मला त्यांच्या पुस्तकातील अनुक्रमणिकेसहित चार-पाच पानांचे फोटो पाठवले. दुर्दैवानं माझी भीती खरी ठरली. ते फोटो बघून मला एकीकडे वाईट वाटलं आणि खूप उद्विग्नताही वाटली. पण मला स्वस्थ बसवेना. रात्री घरी आलो आणि त्यांना एक पत्र लिहिलं. ते पत्र इथे तसंच्या तसं देतो.

“आदरणीय मॅडम,

नमस्कार.

आज संध्याकाळी आपलं फोनवरून बोलणं झालं. मात्र आपला काहीच परिचय नाही. तरीसुद्धा मराठी भाषेवरील प्रेमापोटी हा पत्रप्रपंच.
व्यवसायाने मी पुस्तकविक्रेता असलो, तरी मी मुद्रण व्यवसायाशी संबंधित आहे. लहानपणापासून मराठी भाषेचे उत्तम संस्कार झाले आहेत. शिक्षणाने मी Bcom, BGL (general law) आणि कॉस्ट अकाउंटंट ( CWA) आहे. हे मुद्दाम अशासाठी लिहिलं कारण पुस्तकं विकणं हा केवळ माझा व्यवसाय नसून, ते माझं मिशन आहे आणि त्याचबरोबर पुस्तकं वाचणं हेच माझं व्यसन आहे.

तुमच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासूनच असंख्य चुका दिसत आहेत. दुर्दैवाने आपल्या पुस्तकाच्या केवळ चार पानात इतके मुद्रणदोष मला आढळले आणि मी मनापासून व्यथित झालो. भाषा ही बाब इतक्या सहजपणे घेण्याची नक्कीच नाही. उत्तम लेखनासाठी आणि उत्तम छपाईसाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. आजकाल इतके कष्ट घेण्याची तसदी कुणी घेत नाही ही मराठीचीच नव्हे, प्रत्येक भाषेची शोकांतिका आहे. ( लोकं इंग्रजी माध्यमातून शिकतात तरीसुद्धा अत्यंत ढिसाळ आणि अशुद्ध इंग्रजी लिहितात/वापरतात.)

मी स्वतः कल्याणमधील एका नामवंत शाळेत संचालक आहे, त्यामुळे शाळा आणि शिक्षण या गोष्टींचा मी जवळून साक्षीदार आहे. आज असंख्य लोक भाषेची याच पद्धतीने उपेक्षा आणि अवहेलना करत आहेत. आपण जर भाषाविषयक, विशेषतः व्याकरणाचे पुस्तक मुलांच्या हाती देत असाल, तर त्या पुस्तकातील भाषेच्या दर्जाबाबत आग्रही राहणे आवश्यक आहे. अशी असंख्य मुद्रणदोष असलेली पुस्तकं विद्यार्थ्यांच्या हातात पडली तर ती धोकादायक गोष्ट ठरेल असे तुम्हाला वाटत नाही का? जर एखादे औषध देऊन तुमच्या घरातील लहान मुलाच्या आरोग्याला गंभीर धोका पोहोचणार असेल, तर तुम्ही ते औषध तुमच्या मुलाला द्याल का? भाषेच्या बाबतीत यापेक्षा वेगळा विचार करता येत नाही. भाषेचं बाळकडू आयुष्यभर पुरतं . म्हणून त्याची शुद्धता अत्यंत महत्त्वाची ठरते. आपण माझे विचार समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.

पुढच्या वेळी पुस्तकछपाई करण्यापूर्वी या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करावा.तुम्हाला यासाठी काही मदत हवी असल्यास अवश्य सांगा. मी नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेन.
कळावे.”

मी किती उद्विग्न झालो असेन हे माझ्या पत्राच्या भाषेवरून तुम्हांला कळलं असेल. खरंतर अशा पत्रानंतर त्या बाई मला पुस्तकं पाठवण्याचा विषय सोडून देतील असं मला वाटलं होतं. पण खरी गंमत पुढे आहे. दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला. “सर, तुमचं पत्र वाचलं. मलाही खूप वाईट वाटलं. मी आणि माझ्या मिस्टरांनी काल बराच विचार केला. असं पुस्तक मुलांच्या हातात जायला नको हे अगदी खरं आहे. नशिबाने मी अजून पुस्तकं छापली नाहीयेत. माझ्याकडे पहिली डिजिटल प्रिंट आली त्याचे फोटो मी पाठवले आहेत. काय करू शकतो आपण? तुम्ही खरंच मदत कराल का? आम्ही काय असतील ते चार्जेस नक्की देऊ.”

माझ्यासाठी हा मोठा पण सुखद धक्का होता. त्यांनी माझं पत्र खरंच खूप गांभीर्याने घेतलं होतं. आता चेंडू माझ्या कोर्टात होता. मी आमच्या हरीश सरांशी बोललो. त्यांनीही हे काम स्वीकारायची तयारी दाखवली. (मला भेटलेला हा एक अजब माणूस. मुळातले DTP युनिट चालवणारे एक उत्तम व्यावसायिक. पण नंतर Advocate झाले. आता वकिली पण करतात आणि मूळचा DTP चा व्यवसायही सुरू आहे.) गेले महिनाभर या पुस्तकावर जमेल तेवढे कष्ट केले. शेवटच्या प्रूफ-रीडिंगला मी उपस्थित नव्हतो. पण मॅडम आणि हरीश सरांनी त्या शेवटच्या मॅरेथॉन सिटिंगमध्ये लागोपाठ दोन रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत सलग दीड दोन तास फोनवर बोलत सगळ्या त्रुटी दूर केल्या. आणि पुढच्या दोन दिवसांत सरांनी शेवटची मुद्रणप्रत तयार केली. काही तांत्रिक मर्यादा होत्या. त्या स्वीकारून छपाई झाली.

इथपर्यंत सगळं ठीक आहे. खरा सुखद धक्का आज बसला. आज मॅडमचे मिस्टर पुस्तकं घेऊन आले. अजून दोन तीन ठिकाणी पुस्तकं विक्रीसाठी द्यायची म्हणून चक्क मुलुंडपासून स्कुटर चालवत डोंबिवलीत आले. पण आल्यावर त्यांनी जी चार वाक्य उच्चारली ती माझ्यासाठी लाखमोलाची होती. म्हणाले, “अहो मी खरंतर बँकेत चांगल्या मॅनेजर पोस्टवर काम करतोय. तिची हौस आणि उत्साह पाहून हे पुस्तक छापायचं ठरवलं. पण एक पुस्तक लिहिण्यापासून ते शेवटी वाचकाच्या हातात पडेपर्यंत काय काय करावं लागतं ते आज कळलं. इतके वर्षं स्वतःसाठी, मुलांसाठी पुस्तकं घेताना सहज डिस्काउंट मागायचो. पण आज कळलं ते किती चुकीचं आहे.”

बास ! त्यांच्या या चार वाक्यांवर मी निहायत खूश आहे. गेल्या पंचवीस वर्षांच्या कष्टाचं आज चीज झाल्यासारखं वाटलं. पुन्हा एकदा मनापासून सांगतो, पुस्तकं हे माझं प्रोफेशन नाहीये. ते माझं पॅशन आहे. एका पुस्तकाच्या या सुफळ संपूर्ण कहाणीसाठी आणि त्या सद्गृहस्थांना झालेल्या या अनमोल साक्षात्कारासाठी आजचा दिवस मला साजरा करू दे…

(गद्रे बंधू , डोंबिवली)