२००७ चा विश्वचषक.. पहिल्याच फेरीतील सामना …आणि तुलनेने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांगलादेशकडून भारताची झालेली शिकार! आजही भारतीय क्रिकेट चाहते हा पराभव विसरलेले नाहीत. त्यानंतर झालेल्या २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने दमदार कमबॅक केला आणि थेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पण म्हणतात ‘ना बुंद से गयी, वो हौद से नही आती!’ बांगलादेशकडून झालेली ती हार भारतासाठी लाजिरवाणीच होती. अशाच प्रकारचा काहीसा प्रकार पुन्हा एकदा २०१९ च्या विश्वचषकात घडतो की काय, असं सध्या चित्र दिसू लागलं आहे.

भारताचे २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. भारतीय संघ हा विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या दावेदारीसाठी भारतीय संघाने गेल्या ४ वर्षात प्रचंड मेहनत केलेली आहे. आतापर्यंत झालेल्या उभय देशांच्या आणि तिरंगी मालिकांमध्ये तसेच ICC च्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही भारताने ५ पैकी ३ सामने सहज जिंकले आहेत. हे ३ सामने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या ३ संघाशी होते. त्यामुळे या सामन्यांना विशेष महत्व आहे. पण यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अत्यंत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी अक्षरश: रडवले. अनुभवी फलंदाजी आणि प्रतिभासंपन्न गोलंदाजी अशा दोनही गोष्टी भारताकडे होत्या. पण इंग्लंडच्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानने भारताला निकराची झुंज दिली. अफगाणिस्तानने ६ पैकी ६ सामन्यात पराभव पत्करला असला, भारताविरुद्धच्या लढाईत त्यांच्या मानसिक विजयच झाला. असाच काहीसा धोका आता भारताला बांगलादेशच्या संघाकडून आहे.

बांगलादेशचा या स्पर्धेतील प्रवास अतिशय रंजक ठरला आहे. भारताविरुद्धच्या सराव सामन्यातून बांगलादेशने या स्पर्धेला सुरुवात केली. त्या सामन्यात त्यांना मोठी हार पत्करावी लागली. पण मूळ स्पर्धेत त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात बलाढ्य वाटणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला मात दिली. बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ३३० धावा चोपल्या आणि आफ्रिकेला ३०९ धावांत रोखले. काही अनपेक्षित लढती या कायम अशा स्पर्धा अधिक रंजक करतात. तशीच या स्पर्धेतील बांगलादेशची सुरुवात झाली.

पुढच्या २ सामन्यात बांगलादेशला हार पत्करावी लागली. पण न्यूझीलंडविरुद्धची त्यांची हार ती निराशाजनक मुळीच नव्हती. न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी ‘काँटे की टक्कर’ दिली. २४४ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना बांगलादेशने न्यूझीलंडचे ८ गडी माघारी धाडले आणि सामनादेखील ४८ व्या षटकापर्यंत खेचण्यात त्यांना यश आले. इंग्लंडने मात्र बांगलादेशच्या संघाला तब्बल १०६ धावांनी धूळ चारली. त्यानंतर बांगलादेश फारसा आव्हानात्मक संघ ठरणार नाही असा अंदाज काहींनी व्यक्त केला, पण विंडीजविरुद्ध त्यांनी दमदार कमबॅक केला. ३२१ धावांचे आव्हान बांगलादेशी वाघांनी केवळ ४१ षटकात पूर्ण केले, इतकेच नव्हे तर ३ गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतानाही त्यांनी दमदार आणि वेगवान गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे त्यांनी तब्बल ३३३ धावांपर्यंत मजल मारली.

बांगलादेशचे आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यात ५ गुण आहेत. मात्र गेल्या दोन सामन्यात बांगलादेश संघाची खेळी पाहता भारताला ते चांगलीच झुंज देतील असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बांगलादेशच्या संघाकडे गोलंदाजीत धार कमी असली, तरी फलंदाजीत बलाढ्य संघाच्या वेगवान आणि फिरकी माऱ्यापुढे त्यांनी स्पर्धेत ३ वेळा ३०० धावांचा टप्पा गाठला आहे. तशातच भारतीय गोलंदाजीकडे पाहायचे तर वेगवान गोलंदाजीची भिस्त जसप्रीत बुमराहवर आहे. भुवनेश्वर कुमार हा स्नायूंच्या दुखापतीमुळे किमान ३ सामने खेळू शकणार नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत स्विंग गोलंदाजाची उणीव भारताला भासू शकते. त्याच्या जागी संघात आलेल्या मोहम्मद शमीने अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेतली खरी, पण त्या हॅटट्रिकला किती महत्व आहे, हे प्रत्येक क्रिकेट रसिकाला ठाऊक आहे. भारताकडे मध्यमगती गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या आणि विजय शंकर हे दोन पर्याय आहेत. पण बांगलादेशच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया आणि विंडीजच्या गोलंदाजांचा ज्या पद्धतीने समाचार घेतला, त्यानुसार भारतीय संघाचा पाचवा गोलंदाज महागडा ठरू शकतो.

बांगलादेशशी भारताची झुंज २ जुलैला होणार आहे. दरम्यानच्या काळात भारत वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन संघाशी दोन हात करणार आहे. विंडीजने गुणतालिकेत अव्वल असलेल्या न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध केलेला खेळ पाहता भारताला हे आव्हान सोपे नसेल. दुसरीकडे इंग्लंडचे उर्वरित ३ सामने हे भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी आहेत. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंड विजय मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. या दोन सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश हे २ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात भारतीय संघाचे समीकरण काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. तसेच अफगाणिस्तानच्या संघाने ज्या प्रकारे भारताला झुंजवले, त्याप्रकारे जर सध्याच्या ‘इन – फॉर्म’ बांगलादेशी संघाने झुंजवले, तर बांगलादेशी वाघांकडून टीम इंडियाची शिकार होण्यास फारसा वेळ लागणार नाही.