कृष्णा पांचाळ

अवघ्या जगात धुमाकूळ घालणाऱ्या करोना महामारीनं अनेक ठिकाणी लोकांना माणुसकी विसरायला भाग पाडलं आहे. ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच गावात येण्यास भुमिपुत्राला आज मज्जाव करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना गावातल्या लोकांकडून अपराधी असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. करोना विषाणूचा पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद या शहरांमध्ये आणि परिसरातच जास्त प्रादुर्भाव झाला आहे. ही सर्व औद्योगिक शहरं आहेत आणि या ठिकाणी इतर जिल्ह्यांमधून आलेले हजारो-लाखो नागरिक रोजगारानिमित्त राहत आहेत. मात्र, करोना आला आणि लोकांचा रोजगार गेला, सर्व काही ठप्प झालं त्यामुळे अनेकांनी पुन्हा गावची वाट धरणं भाग पडलं.

पोटापाण्यासाठी मोठ्या शहरांचा रस्ता धरलेल्या नागरिकांना या संकट काळात पुन्हा गावाकडं येणं रास्त होतं. पण या आजारानं भयभीत झालेल्या ग्रामस्थांनी परतीच्या वाटेवर असलेल्या आपल्याचं बांधवांसाठीच मार्ग बंद केले. गावातील मुख्य रस्त्याला खड्डा, वाटेत काटे, बांबू टाकून वाट अडवली गेली. यामुळे आपल्या गावच्या लोकांच्या भरवशावर जीवाची पर्वा न करता मिळेल त्या वाहनानं, हवं ते सोसून प्रसंगी पायीच गावी निघालेला भुमिपुत्र दुखावला गेला. समाजमाध्यमांमधूनही या कडवटपणानं वेग घेतल्याचे दिसून येत आहे. एका गावाच्या तरुणांनी तयार केलेल्या ‘आदर्श गाव’ नावाच्या व्हाट्सऍप ग्रुपवर आजवर विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. त्याच ग्रुपवर आज पुण्यातून किती आले मुंबईहून किती आले असं विचारलं जात आहे. आपल्याच बांधवांना गावात येण्यास मज्जाव करण्याचा ठराव मांडला जात आहे. त्यांची वाट अडवली जात आहे. मात्र, हे साफ चूक असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जात आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालंच तर पुण्याहून नगर जिल्ह्यात एका विवाह समारंभास गेलेल्या कुटुंबाला गावातील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळं या कुटुंबाला लांब थांबून विवाहास उपस्थिती लावली, असे बहिष्काराचे अनुभवही या काळात नागरिकांनी घेतले आहेत.

मराठवाडा, विदर्भासह इतर भागातील दुष्काळाला कंटाळून हजारो कुटुंब आपलं पोट भरण्यासाठी पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरात स्थलांतरित झाली आहेत. मोठ्या कष्टानं इथं लावलेली व्यवस्था व्यस्थित सुरू असताना या करोना विषाणूनं त्यांचा घात केला. परिस्थिती सुधारेल असं वाटत असताना टाळेबंदी वाढत गेली. अशा स्थितीमध्ये कुटुंबाचं पोट आणि घरभाडं कसं भरायचं? असा यक्ष प्रश्न घरातील करत्या पुरुषांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे टाळेबंदी लवकर हटणार नाही असं गृहीत धरून हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरितांनी शहरांमध्ये उपाशी-तापाशी दिवस काढण्यापेक्षा आपला गाव गाठण्याच्या निश्चिय केला. अनेकांनी रितसर सरकारची परवानगी घेऊन एसटीतून प्रवास सुरु केला तर काहींनी आणखी त्रास नको म्हणून आपलं पायी जाणंच पसंद केलं. मात्र, आपण करोनाबाधित शहरातून आलो म्हणून आपल्याला तिकडे मज्जाव केला जाईल, हे सुरुवातीला त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. गावात पोहोचल्यानंतर गावच्या वेशीतून आत जाऊ दिले जात नसल्याने इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती या लोकांपुढे निर्माण झाली. माध्यमांमधून याच्या बातम्या समोर येऊ लागल्यानंतर मात्र, शहरातील काहीजणांना परिस्थिती सोसण्यावाचून पर्याय राहिला नाही. त्यामुळं अनेकांनी आता शहरात राहणंच पसंत केलं आहे.

येरव्ही, गावचा हरिनाम सप्ताह, ग्रामपंचायत निवडणूक, लग्नकार्य असलं की शहराकडं गेलेल्या बांधवांना गावच्या मंडळींकडून आग्रहाच निमंत्रण असायचं. मात्र, आज त्यांनाच चारहात दूर ठेवलं जात आहे. यासाठी ग्रामीण भागात करोनासंदर्भात योग्य जनजागृती होणं फार गरजेचे आहे. शहरातील नागरिक ग्रामीण भागात गेल्यानंतर एक भीतीच वातावरण तयार होत आहे. यावर स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यायला हवं. शहरात अडचण असल्याने गावचं लेकरू परत गावात आलं आहे, त्यामुळं लेकराला गावाकडं येऊ द्या! याच भावनेतून भुमिपुत्राला सहकार्य आणि आत्मविश्वास देण्याची गरज आहे.

krishpanchalfa97@gmail.com