21 September 2020

News Flash

Blog : काशिनाथ घाणेकरांच्या शेवटच्या प्रयोगाची मनाला चटका लावून जाणारी गोष्ट

मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारचा असा झाला करुण अंत..

सुरेश आकोटकर

‘आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर’ यावर्षी हा एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान वाटले. या महान कलावंताची अखेर अमरावतीला झाली. यावर काही ठिकाणी नाट्यप्रेमींची मत-मतांतरे वाचली. घाणेकर यांच्या रंगभूमीवरील शेवटच्या प्रयोगाबद्दल चित्रपटात दाखवले त्यापेक्षा वास्तव थोडे वेगळे आहे. त्या घटना दाखविता आल्या असत्या तर चित्रपटाचा शेवट आणखी परिणामकारक ठरला असता असे वाटते. त्यामुळे नक्की काय घडले याचा साक्षीदार म्हणून डॉ. घाणेकरांच्या शेवटच्या प्रयोगाबद्दल लिहितो आहे. ‘वनिता समाज’च्या प्रांगणात हा प्रयोग झाला होता. त्या काळी अमरावतीला नाट्यगृह नसल्यामुळे बहुतांश नाटकं याच छोट्याशा जागेत व्हायची. प्रयोगाच्या वेळी अमरावतीला पाऊस नव्हता. चित्रपटात मात्र जोरदार पाऊस दाखवलाय. प्रयोग झाला, हेही खरे आहे. कारण मी त्या प्रयोगाला हजर होतो. नाटक ‘तुझे आहे तुजपाशी’ होते. चित्रपटात ‘अश्रूंची झाली फुले’ सांगितले. घाणेकरांचा अभिनय चांगला झाला नाही. प्रेक्षक उभे राहून त्यांची खिल्ली उडवू लागले. न राहवल्याने पहिल्या अंकानंतर मी एका मित्रासोबत विंगेत गेलो. आमच्या मागे आणखी काही प्रेक्षक आले होते. मध्येच एका तरुणाने आम्हाला अडवले, घाणेकरांना भेटू दिले नाही. मी नियतकालिकेतून लिहीत असतो असा परिचय दिल्यावर काय बोलायचे ते माझ्याशी बोला असे ते म्हणाले. आम्ही म्हणालो की त्यांचे काम खूपच वाईट होत आहे. त्या गृहस्थाने सांगितले की त्यांनी मद्यपान वगैरे केले नसून त्यांची प्रकृतीच ऐनवेळी खूप बिघडली आहे. येथील डॉक्टरांनी औषधोपचार केले आहेत. मी त्यांना विनंती केली की घाणेकरांच्या तब्येतीविषयी प्रेक्षकांना सांगून पुढील अंक बंद करा, घाणेकरांना विश्रांतीची गरज आहे हे प्रेक्षक समजून घेतील. पण ते आमचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. नाटक बंद केल्यामुळे पुढील प्रयोगासाठी चांगला संदेश जाणार नाही असे त्यांच्या बोलण्यावरून वाटत होते. तो विदर्भ दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरला वगैरे जायचे आहे म्हणून ते बोलले. शेवटी कसेबसे नाटक पार पडले.

नाटकात डॉ. घाणेकर स्टेजवर लडखडत होते. त्यांना खोकल्याची उबळ येत होती. अधेमधे सोबतची पात्रे त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना सांभाळून घेत होती. त्या महान नटाला अशा अवस्थेत पाहून कसेसेच वाटत होते. काही प्रेक्षक उभे राहून त्यांची हुर्यो उडवू लागले. डॉ. आपले संवाद थांबवून हे बघत होते. घाणेकरांच्या मनाला हे खूप लागले असावे. कारण प्रयोग संपला त्या रात्रीच त्यांचे निधन झाले. रेल्वे स्टेशनजवळच्या एका हॉटेलमध्ये ते थांबले होते . त्या काळी मोबाईल नव्हते. फोनही कमीच. प्रयोगाचे स्थळ आणि हॉटेल यामधले अंतर म्हणजे रेल्वे पुलाची दोन टोकं, एवढे कमी. चित्रपटात मात्र उशीर झाला आहे आणि चिंताग्रस्त होऊन डॉक्टरांची प्रयोगाला येण्याची वाट बघणे सुरू आहे असे दाखवले आहे. डॉ. रात्री गेल्यामुळे सकाळच्या वृत्तपत्रात बातमी आली नाही. यामुळे घाणेकर गेल्याचे अमरावतीकरांना कळले ते तिसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून. त्यामुळे ते गेले त्या दिवशी त्यांना निरोप देण्यासाठी गर्दी होणे शक्यच नव्हते.

वृतपत्रातून माहीत झाल्यानंतर मात्र अमरावतीत शोकसभा होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. २ मार्च १९८६ ला रविवारी घाणेकर गेले. मित्रांकडून कळले की त्या दिवशी नाटकातल्या टीमपैकी केवळ एक सहाय्यक मागे थांबला होता. मग अमरावतीच्या पत्रकारांनी आणि काही सहका-यांनी पुढाकार घेऊन शवविच्छेदन करणे, नातेवाईकांशी संपर्क साधणे आदी बाबींची पूर्तता केली. यात दुपार टळून गेली. नंतर सायंकाळ होता होता त्यांचे पार्थिव मुंबईला पाठविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:32 pm

Web Title: blog on ani dr kashinath ghanekar movie last scene
Next Stories
1 शिक्षण खात्यातही एका सर्जिकल स्ट्राईकची गरज
2 BLOG : सीकेपी तितुका मेळवावा!
3 Blog: मनातल्या ‘कवितांचा कॅफे’!
Just Now!
X