समीर जावळे

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा फोटो मनसे अधिकृतच्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोने बाळासाहेब ठाकरे यांनी एका निवांत क्षणी खेळलेल्या क्रिकेटच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

क्रिकेट हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवडता खेळ होता. क्रिकेटवर त्यांचं अतोनात प्रेम होतं. शिवाजी पार्कला जाऊन बाळासाहेब ठाकरे कांगा लिगच्या मॅचेस बघत असत. एवढंच नाही तर वानखेडे स्टेडियमवर जाऊनही त्यांनी काही मॅचेस पाहिल्या आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा टेनिस खेळतानाचा फोटो चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी खेळलेल्या क्रिकेटची आणि खासकरुन केलेल्या बॅटिंगची आठवण झाली. बाळासाहेब ठाकरे यांचा बॅटिंग करतानाचा फोटो आधीच चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोची आठवण आज राज ठाकरेंचा फोटो पाहून झाली आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात अनेक समान गोष्टी आहेत. त्यातला खेळ हा आपल्याला कुणाला फारसा माहित नसलेला धागा होता. राज ठाकरेंच्या टेनिस खेळतानाच्या फोटोमुळे हा धागाही समोर आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना क्रिकेट आवडत असे तर राज ठाकरे यांना टेनिस आवडतं आहे हे या फोटोच्या माध्यमातून समोर आलं आहे.

म्हणून राज ठाकरेंनी सोडलं क्रिकेट

लहानपणी राज ठाकरेही क्रिकेट खेळत असत. शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे क्रिकेट शिकण्यासाठी जात असत. एकदा खेळताना राज ठाकरेंच्या पायावर बॉल जोरात लागला होता. त्यामुळे राज यांचा पाय सुजला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना म्हणाले होते की, “आज तुझ्या पायावर बॉल बसून पाय सुजला आहे. उद्या हातावर बॉल लागला आणि हात सुजला तर व्यंगिचत्रिकार होण्याचं स्वप्नाचं काय?” बाळासाहेब ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नानंतर राज ठाकरे यांनी क्रिकेट खेळणं सोडलं. ‘ठाकरे कझिन्स’ या पुस्तकाचे लेखक आणि ज्येष्ठ राजकीय पत्रकार धवल कुलकर्णी यांनी हा किस्सा सांगितला.

 

राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातली साम्यस्थळं!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, गॉगल लावण्याची पद्धत हे सगळं सगळं काही थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या पद्धतींशी मिळतंजुळतं आहे. राज ठाकरे हे अगदी लहान असल्यापासून काका बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यांवर जात असत. त्यामुळे राज ठाकरे यांनी अगदी लहान असल्यापासून बाळासाहेब ठाकरेंच्या लकबींचं निरीक्षण बारकाईनं निरीक्षण केलं आहे. त्यामुळेच राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते. “बाळासाहेब ठाकरे हे माझे विठ्ठल आहेत” हे राज ठाकरे यांचं वक्तव्य होतं. त्यामुळेच राज यांना ते गुरुस्थानी होते यात काहीही शंका नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एक वेगळ्या प्रकारचा करीश्मा असलेले नेते आहेत. राज ठाकरे हे उत्तम नकलाकारही आहेत याची प्रचिती त्यांच्या विविध भाषणांमधून आली आहे. अजित पवार, रामदास आठवले, सोनिया गांधी, शत्रुघ्न सिन्हा, छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या नकला राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणांमध्ये केल्या आहेत. अवघा महाराष्ट्र तेव्हा खदखदून हसला आहे. अगदी त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरेही त्यांच्या भाषणात विविध नेत्यांच्या नकला करत असत. संदर्भाचं वाचन करण्याचीही दोघांची सवय अगदी सारखी आहे. बाळासाहेब ठाकरे भाषण करताना उत्स्फुर्तपणे बोलत असता. तशीच सवय राज ठाकरे यांचीही आहे. तसंच संदर्भ दाखवण्यासाठी बाळासाहेब ज्या प्रमाणे पेपरमध्ये छापून आलेले लेख, इतर माहिती हे भाषणांमध्ये दाखवत, सांगत. राज ठाकरेंच्या भाषणांमध्येही हे अनेकदा पाहण्यास मिळालं आहे. किंबहुना दोन पावलं पुढे जाऊन त्यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार केला होता.

राज ठाकरेंना व्यंगचित्र कलेचा वारसा मिळाला आहे तो देखील काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच. राज ठाकरेंच्या कुंचल्याचे फटकारे आजवर अनेकांना बसले आहेत. मग ते त्यांचे बंधू उद्धव ठाकरे असोत किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्या व्यंगचित्रांची मालिका प्रचंड गाजली होती. त्यावेळी त्यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावरही व्यंगचित्रांमधून निशाणा साधला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील उत्तम व्यंगचित्रकार होते त्यांचं फटकारे नावाचं व्यंगचित्रांचं पुस्तक आणि त्यातली व्यंगचित्रं पाहिली की त्यांच्या स्ट्रोकची प्रचिती येतेच.

राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातली साम्यस्थळं पाहता शिवसेनेचा वारसा राज ठाकरेंकडेच येईल असं वाटलं होतं. मात्र तसं घडलं नाही. शिवसेनेत होणाऱ्या घुसमटीला कंटाळून राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आपला नवा पक्ष स्थापन केला. फक्त पक्ष स्थापन करुन ते शांत बसले नाहीत तर दुकानांवरच्या मराठी पाट्यांचा मुद्दा, मराठी भाषेचा मुद्दा, पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा, टोलचा मुद्दा असं सगळं मांडून त्यांनी आपल्या पक्षाचं दखल घेण्यासारखं स्थान निर्माणही केलं. आजही राज ठाकरेंनी सभा बोलावली किंवा त्यांनी एखादं वक्तव्य केलं तर त्याची दखल घेतली जातेच. फक्त दखलच घेतली जात नाही प्रसंगी खळ्ळं खटॅकची भूमिकाही मनसेचे सैनिक घेताना दिसतात. मराठी माणसासाठी आपण नवा पर्याय आहोत हे दाखवण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना बऱ्यापैकी यशस्वी झाली आहे. राजकीय यश अपयश या गोष्टी राजकारणात घडत असतातच. मात्र मनसेने आपलं अस्तित्त्व सिद्ध केलंय हे नाकारुन चालणार नाही.

राज ठाकरे, त्यांचा करीश्मा, त्यांना मिळालेलं यश, त्यांना मिळालेलं अपयश या सगळ्याचीच चर्चा होते यावरुन हे वेळोवेळी सिद्धही झालंय. राज ठाकरेंना टेनिस हा खेळ आवडतो त्यामुळे त्यांचा टेनिस खेळतानाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. राजकारणात  करावी लागणारी बॅटिंग ही कोणत्याही नेत्यासाठी नवी नाही ती राज ठाकरेही करत आहेतच. मात्र टेनिसच्या कोर्टवरही चेंडू टोलवण्यात राज ठाकरे तेवढेच यशस्वी आहेत हेच हा फोटो सांगतोय. एवढंच नाही तर या फोटोने अनेक वर्षांपूर्वीच्या बाळासाहेब ठाकरेंच्या क्रिकेट खेळतानाच्या फोटोच्या आठवणीही ताज्या केल्या आहेत.

sameer.jawale@indianexpress.com