-अमित उजागरे

मानवी शरीर हे विविध अंगांनी बनलेले आहे. यामध्ये केवळ दृश्य स्वरुपात दिसणारे अवयव म्हणजेच शरीर नव्हे. या दृश्य अंगांना (अवयवांना) गती देण्याचे काम शरीरातील एक अदृश्य अंग करीत असते. चेतना अथवा मन हे ते अंग असून आपली प्रत्येक शारीरिक हालचाल, वागणूक मन नियंत्रित करीत असते. म्हणूनच जितके आपले मन स्वस्थ, चांगले आणि सुदृढ तितके आपले शरीरही स्वस्थ आणि सुदृढ राहते. बऱ्याचदा व्यायामाने सुदृढ शरीर कमावलेल्या व्यक्तीही आपल्याला निराश, दुःखी आणि विचित्र वागताना दिसतात. ज्या व्यक्तींचे मन अस्थिर असते, अशा व्यक्तींमध्ये अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे आपल्या शरीराला सुदृढ बनवण्यासाठी जसा व्यायाम असतो तसाच आपल्या मनाला सुदृढ करण्यासाठीही व्यायामाची गरज असते, हा व्यायाम म्हणजेच ‘विपश्यना’ होय. ‘विपश्यना ‘ही केवळ मन एकाग्रतेसाठीची एक ध्यान पद्धती नसून ती निरंतर चालणारी साधना आहे. यातून संपूर्ण दुःखमुक्तीचा मार्ग सापडू शकतो, सकारात्मक स्वभाव बदलाचा उपचार होऊ शकतो.

With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

आपण नेहमीच क्रियेला प्रतिक्रिया देण्याचे काम करतो, या प्रतिक्रियेलाच सर्वसाधारणपणे स्वभाव असे समजले जाते. असा नानाविध स्वभाव प्रत्येकामध्येच असतो मात्र, काही जणांनाच त्यावर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवण्याची कला अवगत असते, अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने आपल्या मोक्षाचा मार्ग स्वतः शोधते आणि जीवनात यशस्वी होते. हाच मार्ग म्हणजे ‘विपश्यना’ होय.

प्रत्येक व्यक्ती कमी जास्त प्रमाणात सुख-दुःखाचा समाना करीतच असते. अशी सुख-दुःख कोणत्याही कारणाने उत्पन्न होत असतात. अगदी एखादे साधे कारण, आपल्या इच्छा-आकांक्षाही याला कारणीभूत असतात. आपल्या नकळत या बऱ्या-वाईट घटना आणि इच्छा आपले मन नेहमी अस्थिर ठेवत असतात. जीवनातील दुःख मुक्तीसाठी आपण मरेपर्यंत प्रयत्न करीत असतो त्या दुःखामागे प्रामुख्याने या बऱ्या-वाईट घटना आणि इच्छा-आकांक्षांचा हात असतो याची आपल्याला साधी जाणीवही नसते. मात्र, याच गोष्टींमुळे जेव्हा आपला स्वभाव नकारात्मक बनतो, चिडचिड, नैराश्य येतं तेव्हा त्याचे परिणाम आपल्या शरिरावरही दिसू लागतात. शुल्लक कारणासाठीही टोकाची भुमिका घेणे, सतत आरडाओरडा करत बोलणे, हामरीतुमरीवर येणे, टोकाच्या निराश भावनेमुळे आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा तशी कृती करणे अशा घटना घडतात. आलिकडच्या काळात आपल्या धाकाधाकीच्या अतिशय व्यस्त आणि अनियमित जीवनशैलीमुळे या विकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.

नैराश्य, चिडचिड, नकारात्मकता हे शारिरीक आजारांपेक्षा अतिशय भयानक आजार किंवा विकार असल्याची जाणीव होऊ लागल्यानंतर लोक त्यावर उपाय शोधतात. त्यासाठी ध्यानधारणा करणे, निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवणे (फिरायला, ट्रेकिंगला) असे पर्याय शोधतात. या पर्यायांचे चांगले परिणाम जाणवतातही मात्र, हा परिणाम खूपच तत्कालीन असतो. त्यामुळे, सतत तणावाखाली असणारे लोक अध्यात्माचा पर्याय निवडतात. ‘अधात्म’ ही बाब मनुष्यासाठी नवीन नाही. हजारो वर्षांपासून मनुष्यप्राण्याासाठी ‘अधात्म’ नवसंजीवनी ठरलं आहे. माणसाच्या दुःख निवारण्यासाठी अध्यात्म मदत करीत आलं आहे. भारतातील ऋषी, मुनी आणि संतांसह जगभरातील संतांनी आपल्या सांप्रदायिक समजुतीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या अधात्म पद्धतींची मांडणी केली आहे. या अधात्मांमध्ये मनाला विशेष मह्त्व दिलेले आहे.

वैज्ञानिकदृष्ट्या मेंदू तुमच्या सर्व बारीक-सारिक गोष्टी नियंत्रित करीत असला तरी अध्यात्मिक दृष्ट्या मेंदूला खाद्य पुरवण्याचे काम ‘मन’ किंवा ‘चित्त’ करीत असते. त्यानंतरच पुढील क्रिया घडतात. म्हणजेच मन हे आपल्या शरीररुपी गाडीचा चालक आहे. या चालकाच्या मनात जेव्हा आसक्ती, मोह, तृष्णा, तिरस्कार हे भाव उत्पन्न होतात. तेव्हा आपली ही शरीररुपी गाडी योग्य मार्ग सोडून भरकटली जाते. म्हणूनच सर्वांत आधी मनाला नियंत्रित करण्याची गरज असते. ज्या व्यक्तीचे मन त्याच्या स्वतःच्या नियंत्रणात असते त्याचे संपूर्ण शरीर आणि पर्यायाने जीवन नियंत्रित राहते.

आपले जीवन नियंत्रित राहणे हीच सर्वात महत्वाची बाब आहे. म्हणूनच मनाच्या एकाग्रतेसाठी, नियंत्रणासाठी अध्यात्माच्या विविध पद्धती आपल्याला मदत करीत असल्या तरी आपल्याला संपूर्ण नियंत्रित मनाचा किंवा दुःखमुक्तीचा अनुभव येत नाही. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपण जी अध्यात्मिक गोष्ट करीत आहोत त्यातील सांप्रदायिक अथवा धार्मिक मान्यतांचा प्रभाव. यामुळे ध्यान पद्धती, लक्ष केंद्रीत करण्याची पद्धत किंवा मन नियंत्रित करण्याच्या प्रक्रियांमध्ये शुद्ध नैसर्गिक भावना किंवा संवेदनां ऐवजी अभासी प्रतिमा, प्रतीकं, शब्दांचे उच्चार या कृत्रीम बाबींचाच समावेश असतो. मात्र, या सांप्रदायिकतेचे लेप लावलेल्या अध्यात्मिक पद्धतींपेक्षा ‘विपश्यना’ ध्यान पद्धती वेगळी ठरते. कुठल्याही सांप्रदायिक प्रतिकांचा लवलेश नसलेली केवळ नैसर्गिक संवेदनांवरच भर देणारी भारतातील एक पुरातन विद्या ‘विपश्यना’ ही मनस्वास्थ्यासाठी एक आदर्श मार्ग अथवा पद्धती ठरली आहे. भारतातून लुप्त झालेली ही विद्या भगवान गौतम बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी पुन्हा शोधून काढली. अनैसर्गिक गोष्टींचा स्पर्श नसल्याने ही विद्या खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीचा आदर्श मार्ग असून याद्वारे मनुष्य आपल्या दुःखाचे मुळ समजावून घेऊ शकतो. याचा प्रत्यक्ष अनुभव गौतम बुद्धाने घेतला आहे. ज्या कारणासाठी सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला ते कारण म्हणजे त्याला झालेली ज्ञानप्राप्ती. ही ज्ञानप्राप्ती म्हणजेच ही ‘विपश्यना’ विद्या होय.

हे संपूर्ण विश्वच अतिसूक्ष्म अणू-रेणूंनी बनलेले असल्याचे अधात्म सांगते ते विज्ञानानेही पुष्ट झाले आहे. त्यामुळेच सहाजिकच मानवी शरीरही अणू-रेणूंनी बनलेले आहे. या अणूंची आपल्या शरिरात प्रतिक्षण निरंतर हालचाल सुरु असते. त्यामुळे शरिरात क्षणाक्षणाला अनेक तरंग निर्माण होत असतात. त्यामुळेच आपल्याला विविध प्रकारच्या संवेदनांची जाणीव होत असते. अणूंची निर्मिती होणं आणि नष्ट होणं ही प्रक्रिया सातत्याने घडत असल्याने त्यामुळे निर्माण होणाऱ्या संवेदना देखील नेहमी बदलत असतात, म्हणूनच त्या अनित्य असतात. शरिरातील या अनित्य संवेदना अंतर्मनात शिरुन जाणून घेता येतात. अशा संवेदना जाणवल्यानंतर त्याला आपण स्वाभाविकपणे प्रतिक्रिया देत असतो. याच संवेदना आणि प्रतिक्रियांचा संबंध मनाशी जोडलेला असतो. या संवेदनांना अनित्य असल्याने म्हणजेच फार काळ टिकणाऱ्या नसल्याने त्याला प्रतिक्रिया न दिल्यास आपले मन आपल्या नियंत्रणात राहू शकते. अर्थात या सुखःद अथवा दुःखद संवेदनांकडे भोगण्याच्या भावनेने न पाहता समतेच्या अर्थात तटस्थ भावनेने पाहिल्यास ही मन नियंत्रणाची कला साध्य करता येते. समतेने किंवा तटस्थ भावनेने पाहणे म्हणजे सुःखद संवेदनांमुळे आनंदी न होणे तसेच दुःखद संवेदनांमुळे दुःखी न होणे होय.

हीच सुक्ष्मसंवेदनांप्रती समता राखण्याची कला ज्याला अवगत झाली ती व्यक्ती केवळ वरवरच्या दुःखमुक्तीतून नव्हे तर जन्मोजन्मीच्या दुःखातून स्वतःला मुक्त करु शकते, बुद्ध होऊ शकते. त्याचा एकमेव मार्ग हा ‘विपश्यना’ आहे. मात्र, ही विपश्यना विद्या काटेकोरपणे अनुभवण्यासाठी अथवा शिकण्यासाठी काही कठोर नियमांचे पालन करणे क्रमपात्र ठरते. हे नियम म्हणजे ‘पंचशील’. विपश्यनेचा लाभ घेताना पंचशिलांचे पालन करणे अनिवार्य ठरते. या विपश्यना विद्येच्या अंगाचा तो वेगळा न करता येणारा भाग आहे. त्यामुळे पंचशिलांशिवाय विपश्यान करता येणे शक्य नाही. भगवान बुद्धाच्या आधिच्या काळातच लुप्त झालेली ही भारतातील पुरातन विद्या बुद्धाच्या नंतरच्या काळातही लुप्त झाली. काही अंशी यातील तत्वे दिसून येत असली तरी विविध सांप्रदायिक प्रतिकांच्या घुसखोरीमुळे ती शुद्ध स्वरुपात आपले अस्तित्व टिकवून ठेऊ शकली नाही. मात्र, भारतातून लुप्त झालेली ही विद्या पुरातन गुरु-शिष्य परंपरेने भारताच्या शेजारच्या ब्रह्मदेशात (म्यानमार) अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी शुद्ध स्वरुपात टिकवून ठेवली. याच गुरु-शिष्य परंपरेने ही विद्या प्राप्त करीत आचार्य सत्यनारायण गोयंका यांनी ती पुन्हा भारतात आणली तसेच परदेशातही नेली. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून या विद्येचा लाभ अनेक भारतीयांसह परदेशी नागरिकांनाही घेता आला आहे.

amit.ujagare@gmail.com

तुम्हाला विपश्यनेचा अनुभव घ्यायचा असल्यास इथं संपर्क साधा…