आज १५ ऑक्टोबर! ‘महिला किसान दिवस!’ माझ्या दवाखान्यात महाराष्ट्रातून, विविध ठिकाणाहून; साधारण परिस्थितीतील शेतकरी महिला येतात. मी देखील ग्रामीण भागाशी (डोंबिवलीला दवखाना असूनही) बर्यानपैकी जोडला गेलो आहे. एकंदरीतच सध्या सुरु असलेल्या नवरात्रोत्सव आणि #MeToo च्या पार्श्वभूमीवर ‘महिला किसान दिना’निमित्त या महिलांना डॉक्टर म्हणून भेटल्यानंतर अनुभवातून समोर आलेल्या गोष्टी मांडण्याचा केलेला हा प्रयत्न…

उन्हाळ्यातील काळसर रापलेली शेतजमिनीसारखी त्वचा, दुष्काळासारख्या कोरड्या हातावरच्या रेघा, नाडी तपासताना जाणवणारा राठ स्पर्श, एक दोन काचेच्या बांगड्या (अपवादात्मक सोन्याची), नवरा असल्यास कपाळी कुंकू वा मळवट, गळ्यात काळी पोत अथवा झिझलेले मंगळसूत्र, नवरा नसल्यास केवळ गोंदलेला ठिपका, चेहर्यांवर सुख दु:ख पचवून आलेली तटस्थता, अंगावर ईरकली टाइप लुगडं, पातळ-पोलकं वा चोळी, कमरेला करकचून बांधल्यामुळे पडलेले घट्टे आणि पांढरा डाग. थोडी खरूज किंवा नायटा, पायातील अंगठ्याजवळील बोटात चांदीचे जोडवं, तळपायाला भेगा… हे असं सर्वसाधारण प्रत्येकीचे चित्रं असतं

नाव म्हणाल तर… ‘जना’, ‘दुरपदा’, ‘सीता’, ‘लक्ष्मी’, ‘सरसती’, ‘आवडा’, ‘धोंडा’, ‘भागा’ आणि जास्ती ताणले तर ‘शेवंता’, ‘फुला’, ‘गुलाब’!

दवाखान्यात आल्यावर तक्रारीही तशा ठरलेल्या… ‘हातपाय रिवरिवतात’, ‘डोस्कं दुखितं’, ‘पोटात हुळहुळत’, ‘पाठ कंबर गूडगं ठणकत्यात’, ‘दम लागतो’, ‘नजर गढुळती’, ‘अंग’ खाली येतं’, बास इतक्याच काय त्या आरोग्याबद्दलच्या तक्रारी. रक्तदाब, मधुमेह यासारखी शहरी दुखणी त्यांना औषधालाही नसतात. कमरेला चंची असली तर त्यात विड्याच्या पानाचे तुकडे, तंबाकुची पुडी, सुपारीची खांडं आणि पैसे. तंबाकुमुळे दाताची दुखणी आणि मशेरीमुळे काळसर रंगाचे दात. वयामुळे येणारा संधिवात, ही प्रातिनिधीक शीरीरिक अवस्था त्यांची. त्यांच्या उपचारात ‘सुई’ आवश्यक. औषधाचा कोर्स वा तपासण्या हे लाड नाहीत. दोन तीन दिवस ‘स्टेटमेंट’ म्हणजे डोक्यावरुन पाणीच म्हणा. (आता अशा परिस्थितीत थोडा बदल होऊ लागला आहे हेच काय ते थोडे समाधान.)

अशा या सर्व शेतात राबणाऱ्या गावकडच्या स्त्रीयांकडे बघताना माझ्या मनात आज विचार आला घरासाठी, शेतासाठी आयुष्य घालवणार्या या किती बायकांना आजचा ‘किसान महिला दिन’ माहिती असेल?, त्यांच्या नावावर जमिनीचा तुकडा, घराचे छप्पर असेल?, यापैकी किती जणींनी कर्जापायी आयुष्य संपवले असेल?, मुलाबाळांकडे पाठ फिरवली असेल?

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी या सर्वाचा मागोवा घेतला. त्यातील संबंधित कार्यकर्त्यांशी बोललो. संशोधनात्मक लेख वाचले. त्याचा निष्कर्ष असा निघाला की अर्धशिक्षित वा अशिक्षित शेतकरी बायकांचा व्यक्त, अव्यक्त आर्थिक सहभाग, कुटुंब सांभाळण्यात वाटा हा ग्रामीण जीवनाचा कणा आहे. केवळ शेतकरी महिलेने आत्महत्या करण्याचे प्रमाण शून्य किंवा अगदीच नगण्य आहे. उलट आत्महत्या केलेल्या नवऱ्याच्या मागे उन्मळून न पडता कुटुंब ती एकट्याच्या जीवावर सावरते. त्याच्या पश्चात घर – शेत तिच्या नावावर होतेच असे नाही. सरकारी मदत वेळेवर आणि पूरी हाती येईलच असे नाही, कर्ता पुरूष गेल्यावर बाईच्या वाट्याला येणारे भोग तिला टाळता येत नाही. तरीसुद्धा ती, स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत मुलांसाठी जगत राहते. त्यांच्पा शिक्षणात खंड पडू देत नाही. कर्ज न फेडण्याचा कृतघ्नपणा ती करत नाही. जमेल तसा पै पैसा जोडत राहते. कुठल्याही समस्येला खंबीरपणे तोंड देते.

नवरात्रीचे “नऊ रंग” तिला ठाऊक नसतात. #MeToo तिच्या कानावर कधी पडत नाही. उपवास तिच्या पाचवीलाच पुजलेला असतो. खणानारळाची ओटी ती भरत नाही. स्वत:च्या कपाळाला कुंकु असो नसो. नवरात्रात केव्हातरी एकदा का होईना जवळच्या गावदेवीला; ढकलाढकली करत, पण रांगेत उभे राहून;  हळद कुंकु वाहते. मिळेल ते फूल अर्पण करते. तिच्या मनातील देवीबद्दलची श्रद्धा अविचल राहते.

खरे तर एकाच वेळी ती सरस्वती होते. त्याचवेळी ती लक्ष्मी असते. दूर्गाही होते. तीच साक्षात देवी असते. प्रत्येक घरात अशी देवी असते. पण तीच आता ‘स्वरुप’ विसरलीशी वाटते. असो!

किसान महिला दिनानिमित्त समग्र देवींना, विशेष करून किसान महिलांना मनोभावे दंडवत!

या निमित्ताने जे मनात आले ते लिहिले. मतभेद असू शकतात. कमी जास्त वाटल्यास, ‘मिच्छामि दुक्कडम!’

– डॉ. सुधीर कुळकर्णी