सुनीता कुलकर्णी

लोकांना व्यक्तिकेंद्रित गोष्टी आवडतात. त्यामुळे सिनेमाच्या क्षेत्रात बायोपीक हे बहुधा चलनी नाणं असावं. म्हणूनच अधूनमधून बायोपीकची लाट येत असते. आताही तीन वेगवेगळ्या बायोपीकची घोषणा झाली आहे. त्यातला एक तर पुढच्याच महिन्यात सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

या तीन बायोपीकमधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे बुद्धिबळ जगज्जेता विश्वनाथन आनंदचं. कलर यलो प्रॉडक्शन आणि सनडायल एंटरटेनमेंट या बायोपीकची निर्मिती करणार असून ‘तनू वेड्स मनू’चे दोन्ही भाग, ‘रांझना’, ‘झीरो’ या सिनेमांचे दिग्दर्शक आनंद राय या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ते सध्या ‘अतरंगी रे’ या सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाच्या कामात आहेत. विश्वनाथनवरच्या अजून या चित्रपटाचं नाव ठरलेलं नाही, विश्वनाथन आनंदची भूमिका कोण करणार, इतर कलाकार कोण असतील हेही जाहीर करण्यात आलेलं नाही. पण ‘विशी’चा बायोपीक येतोय… आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही मोठीच खूषखबर आहे.

दुसऱ्या बायोपीकची घोषणा झाली आहे तो आहे भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत तीन सुवर्णपदकं मिळवून देणाऱ्या तसंच ४०० गोल करणाऱ्या हॉकीपटू ध्यानचंद यांच्यावरचा. अभिषेक चौबे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. आरएसव्हीपी तसंच ब्ल्यू मंकी फिल्म्स या दोन कंपन्यांची ही निर्मिती असून या सिनेमाचं २०२१ मध्ये चित्रिकरण सुरू होणार आहे. हॉकीपटूंसाठी आनंदाची बातमी असलेला हा सिनेमा २०२२ मध्ये सिनेमागृहांमध्ये येणं अपेक्षित आहे.

क्रीडा क्षेत्रातल्या या दोन बायोपीकबरोबरच धार्मिक- अध्यात्मिक क्षेत्रातल्या सत्य साईबाबा यांच्यावरही बायोपीक येणार आहे. विशेष म्हणजे त्यात अनुप जलोटा सत्य साईबाबांची भूमिका करणार आहेत. जॅकी श्रॉफ, साधिका रंधवा, गोविंद नामदेव, अरूण बक्षी, मुश्ताक खान महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. विकी राणावत या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून भप्पी लाहिरी यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. जवळपास महिनाभरात म्हणजे २२ जानेवारी २०२१ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.
समाप्त