15 January 2021

News Flash

बॉलिवूड सेलेब्रिटी मालदिवला का करताहेत गर्दी?

रोज उठून कुणीतरी नट वा नटी का बुवा मालदीवला जाताहेत...

सुनीता कुलकर्णी

समस्त जनता करोनाचा संसर्ग, त्यातून रुग्णालयाच्या वाऱ्या, विलगीकरण, प्रियजनांचा मृत्यू, टाळेबंदी, नोकऱ्या जाणं, पैशाची चणचण, कुठेही जाता न येणं या सगळ्याला कातावलेली असताना दिसतील ती तमाम बॉलिवूडकर मंडळी मात्र उठसूट मालदीवच्या बेटांवर जाऊन समुद्र किनारी पहुडलेल्या अवस्थेत अल्पवस्त्रांकित छायाचित्रे काढून ती सोशल मीडियावर डकवताना दिसत आहेत.

सोनाक्षी सिन्हा, आयुषमान खुराणा, समंथा, रकुल प्रीत सिंग, काजल अग्रवाल, नेहा धुपिया, नुसरत भरूचा, दिशा पटनानी, तारा सुतारिया, टायगर श्रॉफ, वरूण धवन, मंदिरा बेदी, तापसी पन्नू, मौनी रॉय ही त्यांच्यापैकी काही नावं.

एरवी कुणीही या गोष्टी श्रीमंतांच्या हौसमौजा म्हणूनच सोडून दिल्या असत्या. पण या नटनट्यांची मालदीव बेटांवरची इतकी छायाचित्रं प्रसिद्ध व्हायला लागली की रोज उठून कुणीतरी नट वा नटी का बुवा मालदीवला जाताहेत असा प्रश्न अनेकांना पडायला लागला. पर्यटन वाढवण्यासाठी मालदीव पर्यटन विभागातर्फे बहुधा या सेलेब्रिटी मंडळींना आमंत्रणं दिली असावीत आणि त्यामुळे टाळेबंदीच्या काळात आलेला कंटाळा घालवण्यासाठी, बदल म्हणून मालदीवला जाणाऱ्या सेलेब्रिटींच्या लीलांनी मालदीवची बेटं गजबजू लागली आहेत.

त्याचे अर्थातच पडसाद उमटले आहेत ट्वीटरवर. बॉलिवडमधले सेलेब्रिटी मालदीवमध्ये मौजमजा करत असताना सर्वसामान्य पामर मात्र त्यांची छायाचित्रं बघत ट्वीटरवर कॉमेंट्सचा पाऊस पाडत मजा करत आहेत.

मालदीव हे आता मुंबई झालं आहे असं म्हणत कुणी गर्दीने खच्चून भरलेल्या मुंबईतल्या लोकलचं छायाचित्र टाकलं आहे तर कुणी आकाशात उडणाऱ्या विमानाला लटकलेले लोक दाखवून बॉलिवूड स्टार अशी गर्दी करून मालदीवला चालले आहेत असं सूचित केलं आहे. बॉलिवूड स्टार्सची गर्दी बघून आता मालदीवचं नाव बांद्रा असं ठेवलं जाणार आहे अशी कोपरखळी कुणी मारली आहे तर कुणी प्रचंड गर्दीचं छायाचित्र टाकून मालदीवमध्ये जमलेले बॉलिवूड सेलिब्रिटी अशी फोटो ओळ दिली आहे. हे मालदीवला जाऊन मजा करताहेत आणि मला माझी आई घरातून बाहेरही पडू देत नाहीये अशी कुणाची लाडीक तक्रार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 1:02 pm

Web Title: bollywood celebrities enjoying holiday in maldives sgy 87
Next Stories
1 BLOG : रोहितची दुखापत आणि BCCI चा कम्युनिकेशन एरर
2 बालपणीच्या आठवणींना उजाळा
3 पाहा चिनी रिअ‍ॅलिटी शोमध्ये चाललंय काय?
Just Now!
X