दिलीप ठाकूर

‘जजमेंटल है क्या ‘च्या पत्रकार परिषदेतील कंगना रणौत आणि मिडियातील वादाने बरेच उलटसुलट प्रश्न उपस्थित केलेत. यशाने कंगना रणौतच्या डोक्यात हवा गेल्याने तिने प्रश्नही नीट ऐकून न घेताच ‘मणिकर्णिका’चा विषय काढून वाद ओढवून घेतला का? यापासून अशा पद्धतीने वाद ओढवून आपल्या या चित्रपटाला जमेल तितकी उभी/आडवी/तिरकी/वाकडी प्रसिद्धी मिळवून द्यायची आणि हा चित्रपट प्रदर्शित व्हायला उशीर होतोय त्याचा बॅकलॉग भरुन काढण्याचा अधिकाधिक प्रमाणात प्रयत्न करावा असा तिचा हेतू आहे अथवा असावा येथपर्यंत अनेक गोष्टी चर्चेत आल्या. पण ज्या पद्धतीने यानिमित्ताने मिडिया एकवटला हे उल्लेखनीय आहे.

अशा पध्दतीने स्टार आणि मिडिया यांच्यात वाद होणे नवीन नाही. हा तसा मोठा विषय आहे आणि त्याला बरेच फाटेही फुटलेत. कधी तो व्यक्तिगत पातळीवर होतो, कधी तो एखाद्या मिडिया समूहाशी होतो, कधी एखाद्या भाषेतील सिनेपत्रकारांशी होतो, कधी एकदा स्टार एकूणच मिडियाशी कट्टी घेतो. काळ बदलला, माध्यमे बदलली, सिनेमा बदलला, प्रेक्षकांची पिढी बदलली, पण असे वाद अधेमधे होतच राहिले आणि अनेकदा त्यात प्रश्न पडला की, स्टार आणि मिडिया यांच्यात मैत्री किती असावी (ती खरंच होती का?) आणि या दोघांत अंतर किती असावे? (अथवा त्यांच्यात फक्त कामापुरतेच संबंध असावेत का?) आजच्या अतिशय वेगवान आणि व्यावहारिक जगात खरंच स्टार आणि मिडिया यांच्यात मैत्रीसाठी वेळ आहे का? एखाद्या स्टारसोबत वारंवार सेल्फी काढायची हौस पूर्ण केली म्हणजे त्याच्याशी आपला ‘दोस्ताना’ झाला हा सिनेपत्रकाराचा गोड समज गैरसमज असू शकतो. अथवा एखाद्या स्टारने दोन चारदा घरी जेवायला बोलावले म्हणजे त्याच्याशी ‘घरोबा’ झाला असाही गैरसमज होऊ शकतो अथवा हा पत्रकार आपला झाला असा खुद्द स्टारचाही गैरसमज होऊ शकतो. तात्कालिक परिस्थितीवर स्टार आणि मिडिया यांच्यातील संबंध/संदर्भ/संघर्ष अवलंबून असू शकतो.

आज बीग बी कमालीचा मिडिया फ्रेन्डली झाला आहे. पण ऐंशीच्या दशकात अमिताभने फिल्मी पत्रकारीतेवर पूर्णपणे बंदी घातली होती. त्यामागच्या कारणात महत्वाची गोष्ट होती ती, त्याच्या आणि रेखा यांच्यातील ‘मैत्रीसंबंधा’वर काही गॉसिप्स मॅगझिनमधून ‘काहीही वाटेल ते अतिरंजित’ प्रसिद्ध होत होते. त्याने एकूणच मिडियाशी चुप्पी घेतली. त्याच्याबरोबरच रेखानेही गॉसिप्स मॅगझिनशी संवाद बंद केला. एका गॉसिप्स मॅगझिनमधील काही गोष्टींवरुन प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा वांद्रे कोर्टात रेखा बुरखा घालून आली ती बातमी झाली हे तेव्हाच्या लोकसत्ताच्या वाचकांना आठवले असेल. त्या काळात आम्हा सिनेपत्रकारांना अमिताभच्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताला सेटवर प्रवेश असे. पण शूटिंगच्या वेळेस त्याच्या सेटबाहेर फलक असे, ‘पत्रकार आणि पाहुण्यांना आत प्रवेश नाही’. त्यामुळे त्याच्या अग्निपथ, हम, खुदा गवाह, शिनाख्त, रूद्र (हे दोन चित्रपट मुहूर्तालाच बंद पडले) अशा चित्रपटाच्या मुहूर्तांना आवर्जून हजर राहिलो. अन्यथा अमिताभच्या प्रत्यक्षातील वागण्याचे मूल्यमापन करणार कसे? राजकारणात अपयशी ठरल्यावर अमिताभने मिडियावरची बंदी उठवली आणि त्या दिवसात तो एका दिवसात एकाच पत्रकाराला स्वतंत्र मुलाखत अशा धोरणाने वागला. रेखानेही आपले धोरण सौम्य करून मिडियाला सहकार्य देणे सुरु केले. बिग बी त्या काळात मिडियापासून दूर होता तरी त्याची लोकप्रियता आणि चित्रपटाचे यश कायम होते. अर्थात, तटस्थपणे पत्रकारीता त्याच्या गुणवत्तेची दखल घेत असे. तेच तर महत्वाचे असते.

आपल्या आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमसंबंधावर अतिरंजित गोष्टी लिहिल्याचा राग धर्मेंद्रने कधी आणि कसा काढला माहितीये? सत्तरच्या दशकात एकदा बंगालच्या दुष्काळग्रस्तांसाठीची मुंबईतील मदत फेरी महालक्ष्मी रेसकोर्सवर संपत असतानाच त्याचे लक्ष गॉसिप्स पत्रकार देवयानी चौबळ आणि कृष्णा यांच्याकडे गेले आणि त्यांच्यातील ‘ही मॅन’ जागा झाला. आणि त्याने तेथेच देवी आणि पत्रकार कृष्णा यांना मारहाण केल्याची पहिल्या पानाची बातमी झाली आणि आजही स्टार विरुद्ध मिडिया असा लहान मोठा सामना होतो तेव्हा या गोष्टीचा हमखास उल्लेख होतो. सलमान खान आज मिडियाला आवर्जून मुलाखती देत असेल (त्यासाठी तो अथवा अन्य बडा स्टार कितीही उशीरा आला तरी मिडिया त्याची वाट का पाहतो?) याच सलमानचे सुरुवातीच्या काळात फिल्डवरच्या मिडियाशी खटके उडत. स्क्रीन साप्ताहिकाने तर त्याच्यावर काही काळ अशी बंदी घातली की त्याचा कोणत्याही चित्रपटातील फोटो प्रसिद्ध केला जात नसे.

शाहरूख खान, सैफ अली खान वगैरे स्टारचा मिडियातील कोणाशी ना कोणाशी खटका उडालाय. चित्रपटाविषयी प्रश्न न करता अगदी खाजगी आयुष्यावर प्रश्न केला की कधीतरी स्टारचा संयम सुटणे स्वाभाविक आहे. नटीचे लग्न, हिरोचे विवाहबाह्यसंबंध अशा ‘न्यूज स्टोरी’ म्हणजेच सिनेपत्रकारीता असा ठाम समज असलेला वर्ग आहे. आणि त्यातून मग कलाकाराच्या प्रायव्हसिचा मुद्दा येतो. फार पूर्वी चित्रपटाच्या गुणवत्तेवर चौफेर आणि खोलवर लिहिले जाई आणि स्टारच्या मुलाखती त्या दिशेने असत. म्हणून तर तेव्हाचे स्टार आम्हा सिनेपत्रकाराना आवर्जून घरी बोलवत, त्यातून त्यांच्या कुटुंबाशीही परिचय होई. आणि विशिष्ट जवळीक आणि ठराविक अंतर ठेवून हे नाते असे. या नात्यात पीआरओची भिंत नसे. तोही स्टार आणि मिडियाचे स्वातंत्र्य मान्य करे. कालांतराने चित्रपट निर्मिती वाढली, मुद्रित माध्यमात चॅनल, डिजिटल अशी भर पडली. आणि पीआरओ हा घटक महत्वाचा झाला. आणि पत्रकार परिषदा हा प्रकार आला. पूर्वी तो सिनेमाच्या बाबतीत क्वचितच असे. तेव्हा पत्रकारही स्वतंत्र बाण्याचे असत. आता मल्टिप्लेक्सचे थिएटर खच्चून भरेल इतका मिडिया असतो. एवढी गर्दी म्हणजे प्रचंड प्रसिद्धीची हमी असा गोड समज गैरसमज निर्माण झाला. ( तरीही चित्रपट फ्लॉपचे प्रमाण वाढते का?) आता पीआरओ स्टारना मिडियाच्या कार्यालयात घेऊन जाऊ लागला आणि त्यात गोडधोड मुलाखतीचे युग आले. पूर्वी काही स्टारना अनेक पत्रकारांचा अभ्यासू दृष्टिकोन आणि कुवत माहित असे. आताचे स्टार खरंच त्या तपशीलात जातात का?

स्टार आणि मिडिया यांच्या नात्याला असे अनेक कंगोरे आहेत. एका मिडिया ग्रुपचे आपण प्रतिनिधी आहोत हे विसरून बरेच पत्रकार स्टारशी जवळीक वाढवायचा प्रयत्न करतात तर आपल्याला सहज भरपूर कव्हरेज देईल अशाच पत्रकाराचा मोबाईल अटेन्ड करण्यात स्टारला रस असतो. ही वस्तुस्थिती आहे. या नात्यातून समिक्षेचे स्वातंत्र्य जाते. एकादा चित्रपट सामान्य असूनही समिक्षक स्टारशी नाते कायम रहावे म्हणून चित्रपटाला सांभाळून घेतो. या सगळ्या नातेसंबंधात चित्रपट आणि वाचक/प्रेक्षक खूप मागे पडतोय काय असा प्रश्न पडतोय. चित्रपटाचे आणि त्यातील अनेक गोष्टीचे योग्य मूल्यमापन हे त्या चित्रपटाशी संबंधितांसाठी आणि प्रेक्षकांसाठी हिताचे आहे. चित्रपट जगला तर आणि तरच स्टार आहेत आणि मिडियाही आहे. त्याचा कुठे तरी विसर पडतोय म्हणून मग कंगना रानावतसारखे प्रकार घडतात. असे असले तरी स्टार आणि मिडिया यांच्यात काही चांगल्या दोस्तीचीही उदाहरणे आहेत. मीना अय्यर आणि मनिषा कोईराला हे कायमच आदर्श उदाहरण राहिलयं. दोन्ही बाजूंनी आपापल्या नात्यातील मर्यादा जपल्या तर एक माणूस म्हणून अनेक वर्षे ते चांगले मित्र असू शकतात. पत्रकार राम औरंगाबादकर यांची हिंदीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींशी अतिशय उत्तम संबंध होते. तो तसा पत्रकाराने व्यक्तिगत पातळीवर स्टारना भेटण्याचा काळ होता आता एक तर काही स्टार एकाच दिवसात चाळीस मुलाखती देतात (‘कहानी ‘च्या वेळेस विद्या बालनने तेवढ्या मुलाखती दिल्याची बातमी झाली), अथवा भरगच्च पत्रकार परिषदेतच भेटू अथवा पीआरओशी संपर्क साधा असा स्टारच सल्ला देण्याचे युग आहे आणि अशातच कंगना रानावतसारखे प्रकार घडतात आणि या नात्याच्या परंपरेवर ‘फोकस’ पडतो.