सुनीता कुलकर्णी

प्राणीप्रेमी लोकांना आपल्या घरातल्या प्राण्यांबद्दल काय सांगू आणि किती सांगू असं नेहमी होऊन जात असतं. घरातल्या लहान बाळांबद्दल जितक्या प्रेमाने बोललं जातं तितक्याच प्रेमाने ते घरातल्या पाळीव प्राण्यांबद्दल बोलतात. मलेशियामधल्या अतिफ अदन बिन मोहम्मद हनाफिया या तरुणाने त्याच्या घरामधल्या मांजराचा एक किस्सा ट्वीटरवर शेअर केला तर नेटिझन्सनी आपापल्या घरामधल्या मांजरांच्या किश्श्यांचा पाऊसच पाडला. त्यामुळे ठिकठिकाणच्या मनीमाऊ कय काय उद्योग करून ठेवतात ते वाचायला मिळालं.

झालं असं की अतिफला जुलै महिन्यात त्याचं फायनान्सचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याचं सर्टिफिकेट त्याला नुकतंच मिळालं. पण त्याच्या घरामधल्या मिका या नावाच्या मांजरीने तो कागद कडेकडेने थोडासा चावून टाकला. मिकाने चावलेलं ते सर्टिफिकेट अतिफने ट्वीटरवर टाकलं आणि खाली लिहिलं, माझ्या मांजरीने माझी पदवी खाऊन टाकली. २.५ लाख लोकांनी त्याच्या या पोस्टला लाइक दिले आहेत आणि ५० लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हजारो लोकांनी ते ट्वीट रीट्वीट केलं आहे.

एकजण लिहितो की नशीब समज की मिकाने तुझा गृहपाठ खाल्ला नाही. नाहीतर तुला ही पदवी देखील मिळाली नसती. एकाने फाटलेल्या कागदांच्या तुकड्यांचं छायाचित्र टाकत लिहिलं आहे की माझ्या कुत्र्याने माझ्या पदवीचं काय केलं बघा. मला दुसऱ्या देशात कामासाठी जाऊन हे सर्टिफिकेट द्यायचं होतं.

एकाने काही भाग चावलेलं आपलं पदवीचं सर्टिफिकेट आणि आपल्या मांजरीचं छायाचित्र टाकून म्हटलं आहे की आमच्याकडेही हाच उद्योग चालतो. एकाने लिहिलं आहे की माझ्या मांजरीने आमच्या जमिनीच्या व्यवहाराचा करारच खाऊन टाकला.

एकाने लिहिलं आहे माझ्या कुत्र्याने माझं सोशल सिक्युरिटी कार्डच खाऊन टाकलं आहे. एकाच्या पदवीच्या सर्टिफिकेटवर त्याच्या घरातल्या मांजरीने नैसर्गिक विधी करून ते खराब करून टाकलं आहे.

तुमच्या सगळ्यांच्या मांजरी ज्ञानाच्या भुकेल्या आहेत. आता तुमच्या पदवीला खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने ed-CATed झालात. आता तुमची मांजर gradu- ATE झालात अशाही कोट्या लोकांनी केल्या आहेत. शिवाय पदवीचा कोट आणि हॅट घातलेल्या, हातात रायफल घेऊन आता मला मारायची हिंमत कराल का असं म्हणणाऱ्या मांजराचं मीम अशा अनेक गमतीजमती लोकांनी केल्या आहेत.

तात्पर्य काय तर जगभरातल्या मांजरांना पदवीचं सर्टिफिकेट चावायला आवडतं. चारपाच वर्षे शिक्षण घेऊन पदवी मिळवण्यापेक्षा असं थेट ज्ञान मिळवण्याचा मार्गच त्यांना जास्त पसंत आहे.