१० मार्च २०१९ रोजी सायंकाळी भा. क. पा (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेच्या सशस्त्र सदस्यांनी गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी गावात युगेंद्र मेश्राम या तरुण शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. युगेंद्र गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांची पत्नी कस्तुरबा कंत्राटी आशा सेविका असून सुमारे १०० किलोमीटर लांब कोटगुल येथे राहण्यास होती. सुट्टीच्या दिवशी युगेंद्र पत्नीतला भेटण्यास जायचे. त्याप्रमाणे १० मार्च रोजी रविवार असल्याने ते कोटगुलला गेले होते. याच दिवशी पोलिओ लसीकरण मोहीम होती. पत्नी पोलिओ लसीकरणासाठी बाहेर पडल्यावर युगेंद्रही तिच्यासोबत गेले. सायंकाळी ढोलडोंगरीत आल्यावर ५.३० च्या सुमारास “मूड फ्रेश करून येतो” असे पत्नीला सांगून युगेंद्र जवळच सुरु असलेल्या कोंबडा बाजारात निघून गेले. मात्र तिथे कोंबड्यांची झुंज पाहताना अनेक लोकांसमोर माओवाद्यांनी त्यांना पोलीस समजून गोळ्या घालून ठार मारले. हे समजताच त्यांच्या पत्नीवर आभाळ कोसळले. त्वरित घटनास्थळी गेली असता तिला आपल्या पतीचे मृत शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

मेश्राम यांच्या हत्येचा स्थानिक शिक्षक संघटनेने निषेध केला.१८ मार्च रोजी त्यांच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांनी “आमचे स्व. युगेंद्र मेश्राम सर यांची काय चूक?” असे फलक हाती धरून गडचिरोली शहरातुन मूक रॅली काढून माओवाद्यांचा निषेध केला. यानंतर प्रतिबंधित माओवादी संघटनेने माफीनामा प्रसिद्ध केला. यामध्ये माओवाद्यांनी युगेंद्र मेश्रामला पोलीस असल्याचे समजून चुकून मारल्याचे कबूल केले आहे. “हमारी इंटलीजेंस की (पहचान कि) गलती से दुर्भाग्यवश यह घटना हुई…”, असे म्हणून माओवाद्यांनी मेश्राम कुटुंबाची माफी मागितली आहे. माओवाद्यांचा माफीनामा खरा मानला तरी त्याने मेश्राम व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का? या माफीनाम्याने ना गेलेला जीव परत येणार ना मारेकर्यांना शिक्षा होणार. त्यामुळे माओवाद्यांच्या या माफीनाम्याला काहीही अर्थ नाही.

जनसंघर्ष समिती, नागपूरच्या दत्ता शिर्के व सहकार्यांनी युगेंद्र मेश्राम यांच्या पत्नीची भेट घेऊन तिचे सांत्वन केले. “माओवादी चळवळ भरकटली आहे. मेश्राम यांच्या पत्नी कस्तुरबा गर्भवती आहेत. त्यांना अडीच वर्षाचा एक लहान मुलगाही आहे. मेश्राम यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. समाज व शासनाने त्यांना आधार दिला पाहिजे,” असे शिर्के म्हणतात. तर ‘भूमकाल संघठन, नागपूर’ ने मेश्राम खून प्रकरणात प्रेस नोट काढून नक्षलवाद्यांचा जाहीर निषेध केला आहे.

एका सामान्य शिक्षकाला गोळ्या घालून मारल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. मात्र काही अपवाद वगळता कोणी मेश्राम यांच्या हत्येच्या विरोधात आवाज उठविताना दिसले नाही. निवडणुकीच्या प्रचारात रमलेले सर्व राजकीय पक्ष या घटनेबाबत मौन बाळगून आहेत. नागरी हक्क, मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या संघटनांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. मुळात ही माओवाद्यांनी केलेली पहिली हत्या नाही. याच वर्षात जानेवारी – फेब्रुवारी दरम्यान महिनाभराच्या कालावधीत माओवाद्यांनी गडचिरोलीत ७ आदिवासींना पोलिसांचे खबरी समजून निघृणपणे मारले आणि परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली. यावरून माओवाद्यांचा भारतीय लोकशाही, राज्यघटना, कायदा, संविधान कशावरही विश्वास नाही हे स्पष्ट होते. म्हणून संविधानवादी व्यक्ती, संघटना,विचारवंतांनी माओवादी हिंसाचाराचा निषेध करून मेश्राम कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. पोलीस प्रशासन व शासनाने मेश्राम कुटुंबास सर्वतोपरी मदत केली पाहिजे.