– चंद्रशेखर टिळक                                                                                                                                                                                  सगळ्यातले सगळे, अगदी सगळेच कळतं अशा माझ्या अल्पमतीनुसार काही गोष्टी म्हणजे… भारतीय शेअरबाजार, भारतीय राजकीय नेते आणि भारतीय दूरचित्रवाणीवर विविध विषयांवर चर्चेसाठी आमंत्रित वक्ते. मी यांच्या सर्वांगीण बुद्धिवैभवाने अक्षरशः अवाक आहे. अलीकडे त्यात वेगाने भर पडणारे दोन वर्ग म्हणजे मोदीसमर्थक आणि मोदीविरोधकही.

ही सगळी मंडळी अशा वेगाने आणि आवेगाने कोणत्याही विषयावर बोलत असतात की माझी पक्की खात्री आहे की या सगळ्यांना आगाऊ सांगून ( कदाचित यांची आगाऊ परवानगी घेऊन ) च सगळ्या घटना घडत असाव्यात.

केवळ आणि निव्वळ अवाक …..
त्यातही आपला शेअरबाजार आणि आणि आपले राजकीय नेते यांच्यात तर कमालीचे साम्य आहे . कोणी कोणाचे गुण (यांच्यात अवगुण नसतातच!) घेतले हे कळणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे हे सुरवातीलाच मान्य करून टाकतो…एकदम सपशेल शरणागती… सातत्यातले सातत्य आणि सातत्याचा अभाव या दोन्ही द्रुष्टीने ते खरे आहे. हे दोघे बोलले तरी कळतं नाही. हे दोघे बोलले नाहीत तर कळण्याचा प्रश्नच येत नाही. हे दोघे जे बोलले आहेत, तेच आणि तसेच हे बोलले आहेत का हे तर बापजन्मात कळतं नाही. आपल्याला जे कळले आहे, असे निदान वाटते आहे तेच हे बोलले आहेत ना हा प्रश्न तर कधीच पाठ सोडत नाही .

बरं ! आपल्याला काही कळलं किंवा कळलं नाही असं जरा आपल्याला कळले आहे असे वाटायला लागावे, तर हे दोघेही “आम्ही असं म्हणलोच नव्हतो” असं कधी म्हणतील याची काही खात्री नाही. नसतेच हो! यांची खात्री नाही इतकीच काय ती खात्री! त्यातही आम्हांला असं म्हणायचे नव्हते ; प्रसारमाध्यमांचा काहीतरी गोंधळ झाला असे ते जेंव्हा सांगतात तेंव्हा तर जास्तच गोंधळ होतो. अगदी कालचा गोंधळ बरा होता असं म्हणावं असा…

अलीकडे …अगदी अलीकडेच माझ्या असं लक्षात यायला लागले आहे की आपला शेअरबाजार आणि आपल्या राजकीय नेत्यांची भाषणे यात अजून एक साम्य आहे… आपल्या नेत्यांची कशी प्रत्येकाची अशी एक शैली आहे …अगदी असेच आपल्या शेअरबाजाराचे, त्यातल्या समभागांचे असते ….

आता हेच बघा ना …
“गरजेल तो पडेल काय” हे राजकीय भाष्य आणि शेअरबाजार या दोन्हीत साम्य असते. खोटं बोल पण रेटून बोल यावर राजकारण आणि शेअरबाजार यांपैकी नेमके कोणाचे कॉपीराईट वा ट्रेडमार्क आहे हा तर चिरंतन वादाचा विषय होईल. पण जसे राजकारणात अटलजीं – शास्त्रीजी यांच्या सारखे सदा आदरणीय नेते असतात तसे शेअरबाजारातही सदाहरित शेअर्स असतातच की, अगदी अपवादानेच असतात हेही त्यांच्यात साम्य.

सर्वसाधारणपणे सगळाच शेअरबाजार, त्याचा निर्देशांक, त्यातल्या काही समभागांचे (शेअर्स हो) बाजारभाव हे अगदी “शरद पवार” असतात. पवार साहेब कसे आज म्हणतात की “पंतप्रधान मोदी यांच्या प्रामाणिकपणाविषयी शंका घेता येणार नाही.” आणि लगेचच दोन दिवसांनी म्हणतात की “राफेल प्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमली जावी.” आता यातलं नेमके खरं काय असं कधी आपण पवार साहेबांना विचारतो का? गंमत म्हणजे या दोन विधाने करण्याच्या मधल्या काळात राफेल संबंधित कोणतीही नवीन, महत्वपूर्ण माहिती जाहीर झालेली नसताना पवार साहेबांनी आपली भूमिका का बदलली असे पवार साहेबांना विचारावे असे आपल्यापैकी कोणाच्या मनात सुद्धा येत नाही. कारण पवार साहेबांचे असे वागणे आपल्या अंगवळणी पडलेले आहे. बाजार अगदी असाच असतो. पवारसाहेब आणि शेअरबाजार असेच वागतात आणि हे दोघे असेच वागणार हे आपण आता गृहितच धरलेले असते. अशा वागण्याला “कात्रजचा घाट” किंवा परस्परविरोधी म्हणायचं नसते अशी आचार – संहिता आता अनुभवाने आपणच आपल्यासाठी आखून घेतलेली आहे. आता आचार – संहिता आपल्यालाच असणार ना. पवार साहेब आणि शेअरबाजार यांच्या सारख्या मोठ्या असामीना कसली. मोठ्यांचे सगळेच मोठे…

आता राफेल प्रकरणी चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमलेली बरी असे मत – प्रदर्शन करणाऱ्या माननीय पवार साहेबांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीतल्या किती प्रकरणांची चौकशी करण्यासाठी किती समित्या नेमल्या? आता असे प्रश्न विचारायचे नसतात… अगदी नसतातच, असे अलिखित संकेत, जे जास्त प्राणपणाने जपले जातात, ते शेअरबाजारातही असतातच…

अलीकडेच पवार साहेब म्हणाले की “ते सध्या गोळवलकर गुरुजीनी लिहिलेले विचारधन ( बंच ऑफ थॉट्स ) हे पुस्तक वाचत आहेत. कदाचित सध्या ते पुस्तक ते पुन्हा वाचत आहेत असे त्यांना म्हणायचे असावे. निदान तसं आपण सगळ्यांनी गृहीत धरले आहे. कारण पवार साहेबांसारख्या जाणत्या राजाने हे पुस्तक आधी वाचले नसेल हे कसे शक्य आहे? त्यामुळे आता नजीकच्या भविष्यकाळात आपल्या देशाच्या, निदान महाराष्ट्राच्या, सामाजिक – वैचारिक पूर्वपिठिकेची पुनर्मांडणी व पुनर्मूल्यांकन अपेक्षित आहे, अशी गृहीतके आणि अशी खात्री शेअरबाजारातही असतेच की!

काही बाबतीत आपल्या शेअरबाजाराचे राहूल गांधी यांच्याशी अतिशय साम्य असते. याच सविस्तर विवेचन मी करू शकणार नाही. कारण एकतर शेअरबाजार आणि राहूल गांधी हे दोन्ही विषय सतत Evolving असतात . आणि दुसरे म्हणजे हे दोन्ही विषय एकत्रितपणे विचारात घेणे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.

आपल्या शेअरबाजाराचे मोदी सरकारच्या कार्यशैलीशीही कमालीचे साम्य आहे. शेअरबाजाराचा हा गुण मोदी सरकारने घेतला असावा असं सांगणारा घटनाक्रम आहे. पण तसं म्हणून मी मोदीसमर्थक मंडळींचा रोष ओढवून घेऊ इच्छित नाही. कारण ही मंडळी अशा काही अभ्यासपूर्ण अभिनिवेशाने तुटून पडतात की माझ्यासारखा अशिक्षित माणूस काही पूरा पडू शकणार नाही. आता हेच बघा ना, एखादी गोष्ट घडली तर ती मोदी सरकारमुळे असते; पण घडली नाही तर ती नोकरशाहीमुळे घडलेली नसते. आपल्या शेअरबाजारात अगदी असेच असते. बाजाराच्या निर्देशांकात वाढ होत असते तेव्हा ती बाजाराच्या ताकदीने होत असते; पण बाजार कोसळताना मात्र त्याला बाजार सोडून इतरच सगळे कारणीभूत असतात, फक्त इतरच…

मोदी सरकारमधले गृहमंत्री परराष्ट्रविषयी मुद्द्यांवर बोलतात; परराष्ट्रमंत्री संरक्षणविषयी बोलतात; संरक्षणमंत्री आर्थिक विषयांवर बोलतात आणि अर्थमंत्री गृहखात्यावर बोलतात, अगदी तसेच आपल्या शेअरबाजारात घडत असते. घटना घडते एका क्षेत्रात आणि शेअर्स चढतात आणि पडतात दुसऱ्याच क्षेत्रातले.

” मन की बात ” असते दोन्हीकडे …पण कोणाच्या मनातली आणि कोणाच्या मनाप्रमाणे. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे” हे तर राजकीय भाष्य आणि शेअरबाजार यातले परम अहमहमिकेचे क्षेत्र आहे.
मोदी सरकार आणि शेअरबाजार यात असणारे कमालीचे साम्य म्हणजे काहीही होवू दे अथवा नको होऊ दे. आपल्याला अपेक्षा या दोघांकडूनच असतात. आशा अमर असते… बाजार चांगला वागेल आणि नरेंद्र – देवेंद्र -रविंद्र यांच्या कारकिर्दीत आमच्या डोम्बिवलीत विमानतळ होईल (अगदी कार्यरत होईल) असा Committed support… कितीही अडचणी – अपेक्षाभंग झाला तरी असतो का दुसरीकडे? बाजार आणि सरकार दोघांनी कितीही आपल्याला गृहीत धरले तरी…

(तळटीप: हा संपूर्ण मजकूर एक करमणूक म्हणून घ्यावा. वाचून हसून सोडून द्यावा ही नम्र विनंती)