सुनिता कुलकर्णी

टाळेबंदीमुळे हे करता आलं नाही, ते करता आलं नाही असं गेले सहा महिने आपण काय काय ऐकलं. ते बरोबरही होतं. पण टाळेबंदीत काय काय करता आलं ते तुम्हाला माहीत आहे का?

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘पुथम पुधु कलाई’ नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला आहे. एक सिनेमा असं म्हणण्यापेक्षा खरंतर तो आहे ३०-३० मिनिटांच्या पाच लघुसिनेमांचा संग्रह. ‘पुथम पुधु कलाई’ या तमीळ शब्दांचा अर्थ एक नवी पहाट. २१ मार्च रोजी जाहीर झालेल्या पहिल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर या पाच लघुसिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘इलामाई इधो इधो’, ‘अवरम नानुम’, ‘कॉफी एनीवन?’, ‘रियुनियन’ आणि ‘मिरॅकल’ असे ते पाच लघुसिनेमे आहेत.
टाळेबंदीमुळे आलेल्या निर्बंधाच्या काळात सगळेचजण मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेले असताना, हबकलेले असताना सुधा कोंगरा, गौतम मेनन, सुहासिनी मणीरत्नम, राजीव मेनन आणि कार्तिक सुब्बराज या पाच दिग्दर्शकांनी त्या काळातली सकारात्मकता मांडणारे हे सिनेमे तयार केले आहेत. कोविद १९ च्या महासाथीच्या काळातही प्रेम, आशा, नवी सुरूवात या मुलभूत गोष्टी कधीही विसरता कामा नयेत असं हे पाचही लघुसिनेमे सांगतात.

त्यातही ‘इलामाई इधो इधो’ ही प्रौढ जोडप्याची अगदी गोड प्रेमकथा आहे. राजीव या विधुर व्यक्तीला त्याची, त्याच्याच वयाची मैत्रीण भेटायला येते. आपापल्या मुलांना पत्ता लागू न देता भेटण्यासाठी त्यांना दोघांनाही बऱ्याच खटपटी लटपटी कराव्या लागल्या आहेत. एक दीड दिवस भेटायचं, एकमेकांबरोबर वेळ घालवायचा असं ठरलेलं असताना त्याच रात्री आठ वाजता अचानक पंतप्रधान २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर करतात आणि मग काय होतं ती धमाल या लघुसिनेमात आहे. त्याची हाताळणीच इतकी वेगळी आहे की प्रेक्षक या जोडप्याच्या प्रेमातच पडतात.

‘अवर नानुम’ या लघुसिनेमात टाळेबंदीमुळे परदेशात अडकलेल्या आईवडिलांच्या आग्रहाखातर भारतातच एकट्या राहणाऱ्या आपल्या आजोबांकडे सोबत म्हणून कन्ना ही त्यांची नात जाते. काही कौटुंबिक कारणांमुळे तिच्या मनात आजोबांविषयी आकस आहे. पण काही दिवस एकत्र राहिल्यानंतर हळूहळू त्यांच्यात एक नातं निर्माण होत जातं आणि आपल्याला अनेक गोष्टी माहीतच नाहीत हे तिच्या लक्षात येतं. आजोबा आणि नातीच्या नात्यामध्ये निर्माण होत गेलेला गोडवा हा लघुसिनेमा फार छान पद्धतीने मांडतो.

‘कॉफी एनीवन?’ या सिनेमात प्रसिद्ध लेखिका असलेली आपली आई कोमात आहे हे समजल्यावर तिच्या दोन मुली टाळेबंदीतही धावत तिला भेटायला आलेल्या आहेत. त्यांना वाटतं आहे की त्यांनाच आईची खरी काळजी, खरं प्रेम आहे. पण तिला रुग्णालयातल्या नीरस वातावरणातून सरळ घरी आणणारे, आपल्या पद्धतीने तिच्यावर उपचार करणारे त्यांचे वडील, कुठल्याशा किरकोळ कारणामुळे घरातून निघून गेलेली सगळ्यात धाकटी बहीण यांचे कोमामधल्या आईशी खरे आतून जुळलेले भावबंध कसे आहेत हे हा लघुसिनेमा मांडतो.

‘रियुनियन’ या चौथ्या लघुसिनेमात एकाच शाळेत शिकलेले दोनजण, एक तरूण डॉक्टर आणि पॉप गायिका, टाळेबंदीमुळे एकत्र येतात, एकत्र राहतात आणि त्यांचं त्यांच्या आयुष्यात रियुनियन होतं असं दाखवलं आहे.
तर ‘मिरॅकल’ या पाचव्या लघुसिनेमात टाळेबंदीच्या काळात घरी बसून बसून आयुष्यात कधीही कुठेही चमत्कार घडू शकतो हे सांगणाऱ्या अध्यात्मिक बाबाच्या ऑनलाइन प्रवचनांना कंटाळलेली एक चोरांची जोडी आहे. शेवटी ते चोरी करायला बाहेर पडतात. एका गाडीचे टायर चोरून एका सिनेनिर्मात्याच्या ऑफिसमध्ये पोहोचतात. तिथलं नोटा भरलेलं पोतं, अमली पदार्थांची पाकिटं चोरून आणतात. टायर मात्र तिथेच टाकून देतात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या चमत्काराबद्दल हा सिनेमा गमतीशीरपणे सांगतो.

पाच लघुसिनेमांचा हा संग्रह बघितला नाही म्हणून फारसं काही बिघडणार नाही. पण बघितलात तर आपण टाळेबंदीमुळे घरात अडकलो आहोत अशी खंत करत बसलेलो असताना खरेखुरे प्रतिभावान लोक त्या परिस्थितीचाही कलात्मक अविष्कारासाठी कसा वापर करून घेता येईल याचा विचार करत होते, ते समजेल. एखाद्याकडे खरोखरच प्रतिभा असेल तर कोणतीही टाळेबंदी तिला अडवू शकत नाही, हेच खरं.