– करणकुमार जयवंत पोले

महामंडळाच्या बसचा प्रवास! ही गर्दी नकोच वाटतं होती. नेहमीचा तोचतोचपणा. याचा कंटाळा येऊन गेला होता. कधी वाटायच ही माणसच सगळी नष्ट व्हावी. काय गरज होती या मागच्या पिढ्यांना येवढा पसारा वाढवण्याची. कधी कधी ह्या राजकारण्यांनाही नाव ठेवत होतो. कधी कधी चुकूनच आपला जन्म भारतात झाला म्हणून येवढ्या गैरसोई वाट्याला आल्या असही वाटतं होतं. असं वाटण साहजिक होतं. कारण ती गर्दी तो गोंगाट ह्यामुळ जिव कासावीस होतं होता. त्यात आपल्याइकडंच्या गर्दीला असलेलेली बेशिस्त तर अजूनच हवालदिल करणारी. पण काही उपयोग नव्हता. कुणाला गाऱ्हानी सांगून. म्हणून स्वःलाच समजून सांगावे लागले. गर्दीत स्वःतला कधी शोधण्यापेक्षा आपण गर्दीचच होण्याचा शहाणपणा दाखवावा. हे मात्र मान्य कराव लागलं होतं. कोरोनाच्या आजच्या सोशियल डिस्टेन्सिंगच्या काळात मात्र भावना बदलेल्या आहेत तो प्रवास ती गर्दी ह्यांच्याविषयीच नाही तर जगण्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दलचा दृष्टीकोण बदलत चालेलेला आहे. संस्कृती उगाच बदलत नसतात. कोरोना नंतरच जग नक्कीच वेगळ असेल यात शंका नसेल. आज फक्त बसप्रवासाविषयी!

भरधाव वेगात मस्त पळणारी गाडी. बाहेर कटाक्ष टाकताच मागे टाकली जाणारी झाडं, घरं, माणसं, सुंदर डोंगर, दुरुनच दिसणारी हिरवा शालू नेसून नटलेली मनमोहन गावं , वळण घेत दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नुकतच डोंगराच्या माथ्यावर टेकलेल आभाळ, मध्येच पावसाची भुरभुर, सुपासारखा भल्ला मोठा पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मोर, शाळा अर्धवट सोडून मधल्या सुट्टीतून पळून जाणारी गणवेशातली टवाळ पोरं, शेतात शांतपणे चरणारी गुर, ही सर्व मनमोकक दृष्य ओल्या झालेल्या काचेतून अर्धवटच दिसत होती आणि त्याबरोबर गाडीतल्या चालक काकांनी रेडिओवरची लावलेली पावसाची गाणी वातावरण अजूनच प्रसन्न करून सोडत होती. बरोबरच ही गाडी कुठल्यातरी अर्धशहरी ठिकाणी काही क्षणांसाठी थांबली. काही माणसं गाडी थांबण्याच्या आगोदरच रूमाल टाकायला चालत्या गाडीवर खिडकीला लोंबकळत होती तर उतरनारी खाली लवकर कसं जाता येईल यासाठी आपलं सामान शोधत होती. त्यात खिडकीतूनच गरम गरम भाजलेले खरंट शेंगदाने असो की संत्र्यागोळ्या असो किंवा मग चटणी-मिठ बरोबर न मिसळलेली सुकी भेळ! नुकताच गरम केलेला मिरची सहित समोसा असो की प्लास्टिकच्या कपातला अद्रकचा चहा असो. खिडकीतूनच व्यवहार सुरू होते. चढणारी मंडळी उतरणाऱ्यांना उतरू देत नव्हती. खिडकीतून घेतलेल्या पदार्थांसाठी काही जणांकडे सुटे पैसे नव्हते तर काही जणांना ते पदार्थ घेण्याचा मोह उशीरा निर्माण झाला. तेवढ्यात कंडक्टर काकांनी दोरी ओढली. “ट्रिंग ट्रिंग” असा आवाज तेवढ्या गर्दीतही सगळ्यांना ऐकू गेला आणि एकच धावपळ सुरू झाली. मग पळत पळत चालत्या गाडीतून पदार्थ पोचवले जात होते तर खिडकीतून बाहेर फेकलेले पैसेही मिळवण्यासाठी फेरीवाले बेजार होतं होते. एकाच जागेवर जिथं जिथं दोघांनी रूमाल टाकले होते तिथं कुणी पहिल्यांदा रुमाल टाकला? याचे पुरावे देत भांडणं सुरूच होते. त्यात काहींना नमतं होऊन उभं राहण्याची वेळ आली होती.

आपल्या इकडंच्या बस मध्ये काही लोकांना विशेष आरक्षण दिलेल असतं म्हणजे जस पत्रकार आमदार खासदार वैगरे. आता पर्यंत आयुष्यात केलेल्या प्रवासामध्ये आपण कितीतरी वेळा आमदाराच्या किंवा खासदाराच्या शिट वर बसलो असेन पण त्यांनी आमच्यासाठी किंवा आमची गैरसोय व्हावी म्हणून बस नाकारली. आणि आम्हाला मात्र नेहमीच “आमदारासाठी राखीव” या मथळ्याखालील जागेत बसल्यानंतर आमदार झाल्यासारखं वाटलं. गर्दीमुळ जागा न मिळालेल्यांना गाडीच्या बदलनाऱ्या गतीशी जुळवून घेणे भाग होत आणि गाडी मात्र आपल्या गतीनुसार त्यांना नाचवीत असे. एका शिटवर फक्त दोघे बसतात हा नियम आहे आणि तो मोडता येणार नाही असं म्हणून उच्च शिक्षित एखादा अर्धमाणसाळू एखाद्या आज्जीला जागा देण्यास नाकारत होता तर गावाकडचा शेतात काम करून रापलेला चेहरा असणारा अर्धशिक्षित एकाच शिटवर अड्जस्टमेंट करून एकाच सीटवर तिघांना बसवून “एका शिटवर फक्त दोघे” हा नियम मोडत होता. तिकडं मागच्या कोपऱ्यात मात्र एका आजोबांचा फोन वाजला. आजोबा बोलायला लागले. आणि इतकं मोठ्यान कोण बोलतय हे पाहण्यासाठी सर्व माणसं मागे पाहायला लागली. अचानक गाडी कुठं थांबली तर काय झालंय हे पाहण्यासाठी सर्वजन उभ राहून पाहण्याची तसदी घेताना दिसले. कुठ नदी आली तरीही सारखंच. एखाद्या देवाचं मंदिर लागल रस्त्यात तर एखाद्यान हात जोडावे आणि शेजारच्याला कुठला देव कुठल मंदिर माहिती नसतानाही त्यानही हात जोडावे.

कुठल्यातरी आज्जीला अचानक भूक लागली आणि त्यांनी अचानक पालवात गुंडाळलेली भाजी भाकर काढली. त्या बरोबर त्या पावसाळ्यांतल्या दिवसांत आंब्याचं मडक्यात केलेल लोणचं काढल आणि त्याचा अतिशय चविष्ट वास सर्व बसमध्ये पसरला. एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या स्वयंपाक्याच्या जिभेलाही पाणि सुटावं अशी कमाल त्या आज्जीन केली. एक लहान पोरगं मात्र अधूनमधून उगाचच दोरी ओढायच आणि गाडी थांबवायच. कंडक्टर तिकीट काढायला उठले की त्यांच्या जागेवर बसायला मिळाव थोडावेळ म्हणूनपण लोक भांडायचे म्हणजे तुम्हाला आयुष्यात मन मोकळ करायचं असेल भांडून! तर बस प्रवास करावाच. म्हणजे कस खूप दिवसांनी मनात साठलेल जे असेल ते अनोळखी व्येक्तीला भांडून आपल मन फुकटात मोकळं करून घेण्याची सोय जगात कुठे असेल? पण ही आम्हाला दररोज मिळत असते आणि त्यामुळं आमची मन साफ असतात.

काही माणसं झोपलेली असतात आणि त्यांची गाव निघून जातात. मग पुन्हा समोरच्या स्टेशनला उतरून परतीचा प्रवास. आता ज्यांची जेवढी चिल्लर बाकी होती त्याचा तेवढा आकडा कंडक्टरन तिकीटामागे लिहून ठेवला होता. आता ती उतरनाऱ्यांना द्यावी लागतं होती. पण कंडक्टरकड चिल्लर नव्हती. एकाच ठिकाणी उतरनाऱ्यांना पाच पाच रुपये वेगळे पाहीजे होते. कंडक्टर दहा रुपये दोघांत देतो आणि पुन्हा त्या तिघांतही जुंपते. आणि गाडीचा प्रवास पुन्हा सुरू होतो.

सततचा हा प्रवास सुरू असताना आपल्याला नकोसा वाटतो. पण अंगवळणी पडल्यामुळ या कोरोनाच्या काळात त्याची खूप आठवण येते. त्या सुंदर सुंदर घडणाऱ्या साध्या गोष्टी मला जगण्यातला आनंद देत होत्या आणि जिवंतपणे जगायला शिकवत होत्या. आता जेंव्हा लॉक डाउन उघडेल तेंव्हा पहिल्यांदा बसचा मनसोक्तपणे प्रवास तर करेनच पण आयुष्यात पुन्हा ह्या गर्दीचा कंटाळा नाही येणार आणि जग खरंच बदलेल असेल!

( polekaran@gmail.com )