05 April 2020

News Flash

व्हायरस – ‘करोना’चा आणि अस्वस्थतेचा !

एकूणच आगीतून फुफाट्यात अशी परिस्थिती आहे

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

रविकिरण देशमुख

प्रसंग एक – मुंबईतल्या उन्हाळ्यातील मध्य रेल्वेच्या बऱ्यापैकी गर्दी असलेल्या उपनगरी गाडीतील साधारणपणे सकाळी ११-११.३० चा हा प्रसंग. त्या डब्यात काही शीख बसले होते. त्यांच्या दणकट व्यक्तिमत्वावरून आणि अंगातील पेहरावावरून ते शेतकरी असावेत. पंजाबी भाषेत त्यांचा आपापसात संवाद सुरू होता. बहुदा ते पहिल्यांदाच मुंबईत आले असावेत. दमट हवामानामुळे अंगातून घामाच्या धारा वाहात असल्याने जसजसा घाम घेईल तसतसा ते आपला शर्ट बिनधास्तपणे वर घेत होते आणि एकामेकांकडे अस्वस्थपणे पाहात होते. समोरचे मुंबईकर प्रवासी मात्र नेहमीच्या सवयीने पेंगत होते. न राहवून त्यातील एका पंजाबी व्यक्तीने एका बाजूच्या व्यक्तीला विचारले हे झोपणारे प्रवासी गावचे तर दिसत नाहीत. त्यांच्या कपड्यांवरून ते मुंबईचेच असावेत ना? तर तो प्रवासी म्हणाला, हो ना.. ते तर नेहमीप्रमाणे कामावर जात आहेत. मग तो पंजाबी लहेज्यात हिंदीत बोलत म्हणाला, बराच वेळ पाहतोय, हे या अशा वेळेला कसे काय झोपतात?  रात्री झोपत नाहीत का? प्रश्न अगदी योग्य होता. मग तो मुंबईकर म्हणाला. ते रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी परत कामावर जाण्यास तयार होण्यासाठी लवकर उठतात. त्या खुलाशाने तो पंजाबी शेतकरी त्याच्या सहकाऱ्यांकडे आश्चर्याने पाहू लागला.

प्रसंग दोन – मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतील एक अधिकारी सेवानिवृत्त झाले. मराठवाड्यात एका कोपऱ्यात असलेल्या तालुक्यात त्यांचे मूळ गाव. त्यांनी स्वतः सांगितलेला किस्सा असा- सेवेत असताना ते अधूनमधून गावी जात. गावी शेती आणि घर होते. शेती भाऊच पाहात असे. गावच्या भावाला पण मुंबईच्या भावाचा खूप अभिमान होता. हे अधिकारी गावी गेले की तो कौतुकाने गावकऱ्यांना बोलावून घेई. गावकरीही अडीअडचणी सांगत. शेतीच्या कामांसाठी तो भाऊ नियमितपणे पैसे मागून घेत असे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पन्न बेताचेच होते. त्यामुळे शेतीसाठी पैसे मुंबईकर भावालाच द्यावे लागत. मनपातील हे अधिकारी गावी संपर्क ठेवून होते कारण बालपण गावात गेलेले. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना वाटले मुंबईचे व्यस्त आयुष्य खूप झाले. आता गावा जाऊन राहू या. मुले तयार नव्हती. त्यांना इथेच ठेवून ते पत्नीसह गावी जाऊन राहिले. पण काही दिवसांतच त्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. गावी राहणाऱ्या भावाने काही दिवसांतच विचारले की, दादा तू गावी परत कशाला आलास? तिथेच स्थाईक व्हायचं ना.. मुंबईकरावर आश्चर्यचकित होण्याची वेळ आली. पण ते काही बोलले नाहीत. दिवसेंदिवस भावाच्या आणि गावकऱ्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवायला लागला. आपले गावी येऊन राहणे या सर्वांना आवडलेले दिसत नाही, असे यांचे ठाम मत झाले. पुढे शेतीमध्ये काही प्रयोग करूया का, नवीन काही पेरून पाहू या का, असे विचारताच गावातला भाऊ व्यवस्थित बोलेच ना. जवळ राहून दुरावा वाढत चालला. गावातले जे लोक पूर्वी पुढे पुढे करत ते ही टाळू लागले. अप्रत्यक्षपणे तुम्ही गावी परत येणे काही बरोबर वाटत नाही, असे दर्शवू लागले. कंटाळून हे सेवानिवृत्त अधिकारी परत मुंबईला येऊन राहिले आणि गावचा विषय बंद केला.

या दोन प्रसंगातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल परिसरात पोटापाण्यासाठी राहत असलेल्या नागरिकांच्या जीवनपद्धतीबाबतचा अंदाज बांधता येतो. मुंबईत निवासाचे ते कामाचे ठिकाण यातील अंतर, प्रवासासाठीचा वेळ, हक्काच्या झोपेलाही मुकणारा कष्टकरी-नोकरदार कसाबसा स्वतःला सामावून घेतो आणि मूळ गावाला उपरा राहतो. शेवटी आयुष्य घडविल्याचे १०० टक्के समाधान मिळते का, हा मोठा प्रश्नच.

आज मुंबई महानगर परिसरात, पालघर आणि रायगड जिल्ह्यासह पुणे परिसरातील असंख्य लोक उपजिविकेसाठी आपापली गावे सोडून स्थायिक आहेत. यात सर्वसाधारण नोकरदार, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यार्थीसंख्याही मोठी आहे. आता करोन व्हायरसच्या भीतीमुळे ही मंडळी मराठवाडा, विदर्भातील आपारल्या गावी परत जात आहे. रोज असंख्य खासगी लक्झरी बसगाड्या या प्रवाशांना गावी नेऊन सोडत आहेत. गेल्या काही दिवसांतील परिस्थिती अशी आहे की, गावी प्रवासी सोडले की या बसगाड्या तासाभरात पुन्हा मुंबई-पुण्याकडे परत फिरतात. कारण गावी परतू इच्छिणारे लोक तयारच आहेत. वेळेचे भान राहिलेले नाही. जागा कशीही मिळो, बस कशीही असो ते गावी परतायला तयार आहेत.

कष्टकरी, नोकरदार वर्गाला तर कामच राहिलेले नाही असे सांगण्यात आले. शाळा, महाविद्यालये पण बंद. मग इथे राहून खर्च वाढवण्यापेक्षा गावी काही दिवस परत गेलो तर किमान खर्च तरी कमी होईल, ही भावना. पण सुरुवात तर इथेच झाली. खासगी वाहतूकदारांनी तिकिटांचे दर अव्वाच्या सव्वा वाढविले. परवडत असेल तर या नाहीतर नका येऊ, अशीच भाषा. विद्यार्थ्यांची अवस्था तर फारच वाईट झाली. मराठवाड्यातील काही पुढाऱ्यांच्या मते बीड, लातूर, उस्मानाबाद यासारख्या जिल्ह्यांत रोज १५ ते २० हजार लोक गावी परत येत होते. यावरून परिस्थितीची कल्पना येऊ शकेल. कोकणातील परिस्थितीही फार वेगळी नाही. छोट्या मोठ्या नोकऱ्या करणारा वर्ग कोकणात मोठ्या संख्येने परतत आहे.

गावी पोहोचताच या प्रवाशांना बसमधून उतरल्याबरोबर स्थानिक प्रशासनाच्या पथकांना समोरे जावे लागत आहे. काही गावांमध्ये तर थेट जंतूनाशक फवारणी केली गेली. काही ठिकाणी डॉक्टर्स तपासायला तयारच ठेवले होते तर काही गावांमध्ये चक्क दवंडी पिटून त्यांना तपासणी करून घ्या, अशी तंबी दिली गेली. वरवर पाहता हे सर्व ठिक आहे. पण यातून प्रचंड गोंधळही उडाला. अनेकांना या व्हायरसचे गांभीर्य समजायला वेळ लागला. हा मुंबई-पुण्याकडचा आजार अशीच गावाकडच्या मंडळींची समजूत झाली होती. सोशल मिडियातील माहिती गंमत म्हणूनच पाहण्याकडे कल होता.

काही लोक धास्तीने गुपचूप घरी पोहोचले तर त्यांच्यामागे पोलीस पाटील आणि ग्रामसेवकांचा ससेमिरा लागला. जे काही कामानिमित्त दुबई अथवा अन्यत्र गेले होते त्यांनीही तपासण्या टाळल्या तेव्हा पोलिसांनी त्यांना शोधून काढले.

गावी परतलेल्या लोकांची संख्या प्रचंड आणि त्यात तपासणीसाठीची यंत्रणा अपुरी. या तपासणीतच काही तास लागत होते. मुलाबाळांसह या तपासणीचक्रात बराच वेळ घालविल्यानंतर घरी पोहोचलेल्या या मंडळींपुढे २-३ दिवसांत प्रश्न उभा राहतोय तो कामावर गैरहजर राहिलेल्या कालावधीचा पूर्ण पगार मिळेल का, रोजंदारी व कंत्राटी कामगारांना व नोकरदारांना प्रश्न पडतोय की पुन्हा मूळ नोकरीची हमी राहील का, आणि नाही राहिली तर पुढे काय करायचे.

भलेही सरकारने जाहीरपणे सांगितलंय की कामगारांना, नोकरदारांना किमान वेतन द्या, माणुसकीने वागा. पण आपण जिथे नोकरी करतो ती आस्थापना व्यवसायच बुडाल्याने तोट्यात गेली असेल तर मालक हात वर करणार नाहीत कशावरून? मुंबई, ठाणे, पुणे या पट्ट्यातील अनेक उद्योग, व्यापार करोना व्हायरसमुळे बंद राहिल्याने प्रचंड तोट्यात जाणार आहेत. तेव्हा ते पूर्ववत उभे राहण्यास किती कालावधी घेतील आणि आपल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देतील का, याची हमी देता येत नाही.

गावची मंडळीसुद्धा या सर्वांना किती दिवस सामावून घेतील हाही मोठा प्रश्नच आहे. मराठवाड्याच्या बहुतेक भागात आणि विदर्भात विशेषतः पश्चिम भागात शेती आतबट्ट्याचीच ठरतेय. पिण्याचे पाणी पुरेसे नाही आणि सिंचन सुविधा नाहीत. लहरी पावसामुळे पीक हाती लागेलच याची खात्री नाही. घरी सर्वांनीच शेती करणे परवडत नसल्याने काहींनी पदरमोड करून मुले शिक्षणासाठी पुण्यात ठेवली आहेत. तर ज्यांना हे परवडतच नाही त्यांची मुले ठाणे, पुणे, पनवेल, भिवंडी, तारापूर, बोईसर येथील औद्योगिक परिसरात मिळेल ती नोकरी करून गुजराण करत आहेत. कोकणातील मंडळीही यात मागे नाहीत.

येत्या काही दिवसांत करोन व्हायरसचे भूत उतरले नाही तर या बहुतेकजणांसमोर अस्तित्वाचे मोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत. औद्योगिक व आर्थिक मंदीच्या काळात नोकऱ्यांचे प्रमाण कमीच होत असते. तशाच आहे त्या नोकऱ्या गोत्यात आल्या तर कठीणच परिस्थिती होईल. काही भागात पाऊस कमी झाल्याने शेती उत्पादन पुरेसे होणार नाही. तेव्हा गावाकडच्या मंडळींसमोरही प्रश्न उभे राहणार आहेत. त्यात या मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पुणे परिसरातून आलेल्यांची भर.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यासारखी मोठी शहरे सोडली तर उर्वरित भागात सरकारी आरोग्यसेवा फारशी कार्यक्षम राहिलेली नाही. गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची आणि तालुका पातळीवरील रुग्णालयाचीं अवस्था विचारायलाच नको. अगदी जिथे वैद्यकीय महाविद्यालये आहेत तिथे आधुनिक वैद्यकीय उपकरणे व सामग्री आहे पण त्यासाठीचा तंत्रज्ञवर्ग नाही. मशिनरी धुळ खात पडल्या आहेत. नोकरभरतीवर मर्यादा आल्याने ग्रामीण भागातील असंख्य पदे रिक्त आहेत. डॉक्टर्सच काय त्यांच्या हाताखालचा कर्मचारीवर्ग पण गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहण्यास तयार नाही. सर्वांना जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरांत राहायचे आहे. सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात काही पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. तर लातूरसारख्या शहरात तर प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एक सुसज्य रुग्णालय बांधून केव्हाच तयार असून ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे खासगी रुग्णसेवेचे फावते आहे. करोना व्हायरसच्या भयंकर साथीच्या पार्श्वभूमीवर या समस्यांची चर्चा व्हायला हवी. दुर्दैवाने बाधीतांची संख्या वाढली तर आरोग्यसेवा पुरेशी पडणार नाही.

दरम्यान, मुंबई-पुण्याकडे रोजीरोटीनिमित्त धाव घेतलेला कष्टकरी, नोकरदार मूळ गावाला तसा पारखाच होत आहे. नोकरीतील ताणतणाव व मुलांचे शिक्षण यामुळे तो गावी लग्नादी समारंभाना हजेरी लावू शकत नाही. शक्य झाले तरी परण्याची घाई. त्यामुळे गावी वरचेवर संपर्क कमी होत जातो. हळूहळू गावची मंडळी, नातेवाईक, मित्र त्यांचा नाद सोडून देतात व आपला माणूस आता मुंबई-पुणेकर झालाय असे सांगून काहीवेळा कार्यक्रमांची पूर्वकल्पनाही देणेही बंद करतात. इकडे कसेबसे स्थिरस्थावर झालेला हा मुंबईकर, पुणेकर कसेबसे घर घेतो, आयुष्यभर कर्जाचे हप्ते फेडत असतो. निवृत्तीच्या वेळेला मुलांची लग्ने झाली म्हणून छोटेसे घर मुलाच्या ताब्यात देऊन गावी जाऊन राहावे म्हटले तर तिथेही तो स्वीकारला जाईलच याची काहीही खात्री राहिलेली नसते. एकूणच आगीतून फुफाट्यात अशी परिस्थिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 10:10 am

Web Title: coronavirus dilemma to live in mumbai pune or village
टॅग Coronavirus
Next Stories
1 Blog : निमित्त ‘कोरोना प्यार है’ चित्रपटाचे!
2 महाविकास आघाडीचा अजेंडा राबवताना तारेवरची कसरत निश्चित
3 BLOG : पराभवाला गोंजारणं थांबवा !
Just Now!
X