– मनोज भोयर

अनेक संकटाना सामोरे गेलो असलो तरी माणूस म्हटल की, काही कठीण क्षणी त्याच्या शरीरात एक वेगळी हालचाल होतेच… आणि ती हालचाल माझ्याही शरीरात झाली. पण मला आता अ‍ॅम्ब्युलन्समध्ये जायचं होतं. त्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये कोणीही नव्हतं. म्हणून मग मीच त्या अ‍ॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरची थोडी चौकशी केली. त्याला शोधून काढलं आणि त्याला मी जाण्यासाठी तयार असल्याचा निरोप दिला. त्यानंतर तोही त्याच सुरक्षा कवच घालून स्टेअरिंगवर बसला आणि मागच्या बाजूला मी एकटाच बसलो होतो. आता आमची गाडी सेंट जॉर्जच्या मागच्या बाजूनं बाहेर पडली होती. तो रस्ता माझ्यासाठी अजिबातच नवीन नव्हता. कारण मी ज्या सायन-प्रतिक्षा नगरमध्ये राहतो, त्या ठिकाणाहून फ्रि वे ओलांडून सेंट जॉर्जच्या याच रस्त्याने पुढे मंत्रालयात आणि नरिमन पॉईंटला जात होतो… त्या रस्त्यावरून पुढे जात पोस्ट ऑफिस, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबई महानगर पालिकेकडून जेजे फ्लायओव्हरवरून माझी अ‍ॅम्ब्युलन्स पुढे निघाली… गेल्या लॉकडाउनच्या काळापासून मी पहिल्यांदाच हे रस्ते, ही कायमची ओळखीची ठिकाणं पाहिली.

गेले वीस वर्ष मी मुंबईत आहे. आणि म्हणूनच लॉकडाउनच्या काळात असा अनुभव कधी गाठीशी येवू शकतो, याची मी कधी कल्पनाही केलेली नव्हती. पुढे दगडी चाळ आली… अरुण गवळीची ती दगडी चाळ… त्या अरुण गवळीचा सगळा इतिहास मला तिथून जाताना आठवला… त्या दगडी चाळीच्या आसपास मुस्लीमबहुल वस्तीमध्ये मात्र लोकांची वर्दळ दिसत होती. कदाचित रमजानच्या निमित्ताने ती असेल. मात्र, त्यातील काही लोकांनी मास्क घातलेले नव्हते. त्यात काही पुरुषही होते आणि काही स्त्रियाही होत्या. काहींनी तर केवळ आपली ओढणी तोंडाला बांधली होती. ते पाहून माझी चिंता आणखी वाढली. कारण, लोक असं बेजबाबदारपणे वागत राहिले आणि इथूनच पुन्हा करोनाची लागण वाढत गेली, तर पुन्हा सरकारी रुग्णालयांवरच त्याचा भार येणार होता. असं झालं तर पुन्हा तिथे आधीच जीव धोक्यात घालून काम करत असलेल्या डॉक्टर, नर्सेसची तारांबळ उडणार होती. त्यामुळे त्या रुग्णालयात काम करणार्‍यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी तरी लोकांनी स्वत:ची काळजी घ्यायला हवी, असं मला तेव्हा वाटत होतं. काही ठिकाणी तर कांद्याचे ट्रक भरले जात होते. जीवनावश्यक गोष्टींसाठी हे महत्त्वाचं होतं. मात्र काही लोक उगाचच रस्त्यावर उभे असल्याचं मी पाहत होतो. दगडी चाळीसमोरून माझी अ‍ॅम्ब्युलन्स पुढे गेली. त्या दगडी चाळीत मी अरुण गवळीच्या छोट्या छोट्या मुलाखती घेण्यासाठी अनेकदा आलो होतो. आणि आता हा मुंबईचा पुर्वीचा अंडरवर्ल्ड डॉन सध्या दगडी चाळीतच वास्तव्याला होता.पॅरोलवर तुरुंगातून त्याची सुटका झाली होती. खरंतर अंडरवर्ल्डचा हा बेताजबादशहा खुनाच्या आरोपाखाली नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये सजा भोगत होता. याच दगडी चाळीसमोरून जाताना मला अजून एका गोष्टीची आठवण झाली. ती म्हणजे, अरुण गवळी आमदार असताना त्याने माझ्यावर मानहानीचा दावा केला होता. अर्थात तो दावा खोटा होता. विशेष म्हणजे मी माझ्या बातमीतून त्याच्यावर जे आरोप केले होते, त्याच आरोपांअतर्गत त्याला अटक झाली होती आणि त्यामुळेच त्याचा तो दावा फोल ठरला होता.

तिथून पुढे महालक्ष्मी स्टेशनवरून वरळी- बांद्रा सी लिंक असा प्रवास करत अंधेरीच्या रस्त्यावर ॲम्बुलन्स आली. अंधेरीच्या महामार्गावरच माझ्या ऑफिसला जायचाही रस्ता होता. याच रस्त्यावरून मी कायम ऑफिसला जात-येत होतो. आजूबाजूला भीषण शांतता होती. जागोजागी पोलिसांच्या चौक्या उभारल्या होत्या. पोलीस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जागोजागी तैनात होते. पोलिसांच्या याच कर्तव्य दक्षतेमुळेच लोकांची रस्त्यावरील गर्दी कमी दिसत होती. कारण आता लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागरूकता आली होती. त्यांच्यामध्ये कायद्याचा धाकही निर्माण झाला होता. मात्र लोकांमध्ये ही जागरूकता यायला खूप उशीर झाला होता. त्यामुळेच मुंबईमध्ये करोनाबाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत गेला. ज्या ऑफिसच्या रस्त्यावरून मी रोज येजा करत होतो, आज त्याच रस्त्यावरून मी करोनाबाधित रुग्ण म्हणून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसून जात होतो. आजवर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसण्याचा मला अजिबातच अनुभव नव्हता. त्यात त्या भल्या मोठ्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये मी एकटाच बसून होतो.

मनामध्ये विचारांची चक्र सतत सुरू होतीच… आपण यातून कधी बरे होणार? या करोनामधून लोकांची मुक्तता कधी होणार? रुग्णांची संख्या कधी कमी होणार? अशा अनेक प्रश्‍नांची मालिका माझ्या डोक्यात तयार होत होती..त्याच उत्तर कुणाकडेही नव्हत . दुसरीकडे, जिवनावश्यक गोष्टींशिवाय मुंबईत काहीच मिळत नव्हतं. कारण इतके दिवस मी रुग्णालयात असताना माझा बाहेरच्या जगाशी पूर्णपणे संबंध तुटलेला होता. बाहेर नक्की काय सुरू आहे, ते मला माहित नव्हतं. मात्र, आता जेव्हा मी बाहेरच्या जगात परतलो होतो, तेव्हा माझ्या मनात खूप प्रश्‍न होते. कारण मी माझ्या कुटुंबापासून दूर होतो. माझ्या आईवडिलांपासून दूर होतो. असे प्रसंग मुंबईत आणि संपूर्ण देशात अनेक लोकांवर येतच होते. काही लोक नियमांचे पालन करूनसुध्दा त्यांना करोनाची लागण झाली होती. तर काही लोकांना त्यांच्या मुर्खपणामुळे करोनाची लागण झाली होती. अशा सगळ्या पातळ्यांवर विचार करत असताना आणि मीडियामध्ये गेली अनेक वर्षं काम करत असताना आता पुन्हा एकदा मला कधी काम करायला मिळेल, हाही एक प्रश्‍न माझ्यासमोर होता. कारण कामाशिवाय आपण जास्त काळ राहू शकत नाही, याची मला संपूर्णपणे खात्री होती. त्यामुळे आळशीपणाने झोपून खूप दिवस काढावे, अशा प्रवृत्तीचा मी नव्हतोच…

कारण एकदा पत्रकाराला ब्रेक मिळाला तर त्या ब्रेकमधून परत यायला त्याला खूप वेळ लागत असतो.

हाच सगळा विचार करत करतच आणि पत्ता शोधत अखेर ॲम्बुलन्स गोरेगावच्या त्या हॉटेलपाशी आली. अ‍ॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने मला खाली उतरण्यास सांगितलं. संजय चौधरी असं त्या ड्रायव्हरचं नाव होतं. गेली तीन साडेतीन वर्षं तो सेंट जॉर्जच्या अ‍ॅम्ब्युलन्सवर काम करत होता. नवी मुंबईतून तो रोज आपल्या ड्युटीवर येत होता. मला हॉटेलमध्ये प्रवेश करायला अजून काही काळ अवकाश होता. त्यामुळे मी तिथेच त्या ड्रायव्हरची विचारपूस करत होतो. पीपीई किटमुळे त्या संजय चौधरीचा जीव अगदीच विटला होता. त्याला त्या पीपीई किटमध्ये कमालीच कोंडल्यासारख होत होतं. त्यामुळे तो पुरता हैराण होता. जिथे सारखा सारखा मास्क घालून सामान्य माणसं वैतागली होती, तिथे त्याच नेमकं काय होत असेल याचा मला प्रत्यक्ष अंदाज आला होता. पुढच्या काही मिनिटांतच ती अ‍ॅम्ब्युलन्स मला तिथे सोडून निघून गेली. त्या गाडीकडेही मी अत्यंत भावूकतेने पाहत होतो. कारण मुंबईतल्या या संकटाच्या काळात तब्बल तीस किलोमीटर अंतर कापून ती मला इथे सुरक्षित ठिकाणी घेवून आली होती. वीस मिनिटांनंतर मला हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला. तिथल्या कर्मचार्‍याने अतिशय घाबरतच माझ्या अंगावर स्प्रे मारला. त्यानंतर जुजबी काही गोष्टी दिल्या. जेवणाचा डबा होता, तोही त्याने मला दिला. लिफ्टने मी तिसर्‍या मजल्यावरच्या माझ्या तीनशे दोन नंबरच्या खोलीत प्रवेश करता झालो…या हॉटेलला महापालिकेनं हॉस्पिटलचा दर्जा दिला होता.

मुक्काम पोस्ट गोरेगाव
गेल्या आठ दिवसांपासून मी अजिबातच नीट आंघोळ केली नव्हती. मला ते शक्यही नव्हतं. त्यामुळे माझे केस सगळे पिंजारलेले होते. मळकट झाले होते. दाढीही खूप वाढलेली होती. मला आरशात माझंच ते रुप पहावेना… यानंतर सर्वात प्रथम मी सामानाची लावालाव केली. आणि आठ दिवसांनंतर मला दिलेल्या शांपूने गरम पाण्याने नीट आंघोळ केल्यावर मला ऐका वेगळ्या सुखाचा अनुभव झाला. ज्या गोष्टी सहज साध्य होतात त्याच गोष्टी आयुष्यात किती कठीण होवून जातात, याचा मी चांगलाच अनुभव घेतला होता. एकीकडे जीवनामध्ये आपल्या प्रचंड आशा-आकांक्षा वाढलेल्या असतात, आकाशाला गवसणी घालण्याचा आपण कायम प्रयत्न करत असतो. पण दुसरीकडे जीवन जगत असताना कमी साधनसुविधांमध्येही आपल्याला जगता येतं, आणि असे दिवसही काढता येतात. पण हे केवळ तेव्हाच घडतं, जेव्हा तुमच्यावर तशी वेळ येते. अन्यथा आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आदळआपट करून घरातील वातावरण खराब करत असतो, याचीही मला आता चांगलीच जाणीव झाली होती. मात्र, माझ्या मुळातच गरजा कमी असल्यामुळे आणि खाण्याचे माझे लाड नसल्यामुळे या अशा परिस्थितीचा मला तसा कमीच त्रास झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेकदा दिवस काढलेले असल्यामुळे माझ्या शरीराला तशी सवय झाली होती.

स्वच्छ आंघोळ केल्यानंतर मी ताजातवाना होवून शांतपणे एका खुर्चीत बसलो. त्या दिवशी मिळालेल्या रिन साबणाने मी माझे प्रथम आवश्यक कपडे धुतले कारण तोवर मी लाईफबॉयच्याच साबणाने आणि लिक्विड सोपनेच माझे कपडे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये धुत होतो. हाही एक वेगळाच अनुभव होता आणि मी तो आनंदाने अनुभवला. एका सामान्य रुग्णालयामध्ये आठ दिवस काढल्यानंतर एका छानशा हॉटेलच्या रुममध्ये रहायला येणं, समोर टिव्ही असणं, पिण्यासाठी मिनरल वॉटरची व्यवस्था असणं, जेवण-चहा, नाश्ता अशा सर्वच प्रकारची व्यवस्था असणं, यामुळे मला थोडं हायसं वाटत होतं. अर्थात जगण्यातील हा मुलभूत आणि खूप मोठा बदल माझ्या आयुष्यात मी अनुभवत होतो. सामान्य माणसाच्या आयुष्याचा जो काही अनुभव होता तो मी त्या रुग्णालयात घेतला होता.त्यामुळे सेंट जॉर्ज हॉस्पिटल ते गोरेगावमधल्या या हॉटेल पर्यंतचा प्रवास जगण्याला सकारात्मकता दिशा देणारा निश्‍चितच होता. पण जगण्यातील वेगवेगळ्या टप्प्यांबद्दल गंभीरपणे विचार करायला भाग पाडणारा होता.

गेले अनेक दिवस मी मुंबई पाहिली नव्हती. ती मुंबई मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत इथे आलो होतो. आता निश्‍चितपणे माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. या मुंबईला इतक्या भयाण शांततेत मी कधीच पाहिलं नव्हतं. गेली वीस वर्षात दिवसाच्या सर्वच प्रहरात मी या मुंबईला अनुभवलेलं होत.त्या महानगरातील, ही भयाण शांतता लवकरात लवकर जावी अशी मनोमन प्रार्थना केली. माझ्या मानसिक शांततेसाठी हा विचार खूपच गरजेचा होता. हे मात्र तितकंच खरं की, ही मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ निश्‍चितच लागणार होता.

(लेखक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सहसंपादक आहेत.)

भाग १ –  BLOG : …आणि मला ताप आला!

भाग २ – BLOG: …संशयितांच्या रांगेतलं कुटुंब, अन् रिपोर्टची धाकधुक

भाग ३ – Blog : करोना पॉझिटिव्ह वॉर्डात जगलो…

भाग ४ – BLOG: पुन्हा टेस्ट पॉझिटिव्ह आणि घबराट