– मनोज भोयर

रात्री ७ वाजता मी संशयित वॉर्डातून पॉझिटिव्ह वॉर्डात दाखल झालो. इथला प्रवेश काही वेळेसाठी मला हादरवणारा ठरला. इथलं वातावरण खूपच वेगळं होत. अत्यंत गरीब लोक तिथे होते. ते सतत खोकत होते. काहींना इतरही आजार असल्यामुळे आणि त्यात कोरोनची लागण झाल्यामुळे त्यांचा श्वसनाचा त्रास अधिकच वाढला होता .त्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. सर्वत्र हतबलता आणि निराशेने घर केलं होत. तिथल टॉयलेट तर अतिशय घाण होत. तिथे माणूस म्हणून कुणीही जाऊ शकत नव्हतं. अर्थात सफाई कामगार कमीच येत होते मात्र इथेही लोक त्या घाणीत भर घालत होते. मला तिथल्या लोकांबद्दल हळुहळू खूपच आपुलकी वाटत गेली .

माझ्याजवळ दोन वर्तमानपत्रं होती. पण कारमध्ये बसताना मी तो पेपर वापरला होता. आता तोच पेपर मी बेडवर पसरला.त्यावर एक बाजूला बॅग त्यात तुटपुंज्या वस्तु होत्या.आयुष्यात पहिल्यांदाच मला अत्यंत कमी वस्तुंमध्ये आणि कमी साधनांमध्ये वेळ मारून न्यायचा होता. आजूबाजूच्या रुग्णांशी जुजबी ओळख झाली. रात्रीच जेवण उरकलं. वेळ घालवायचा म्हणून मोबाईल मध्ये डोकं खुपसलं.

रात्री ११.३० वाजता एकाने माझ्या नावाने मला हाक मारली. मी म्हटलं, एवढ्या अवस्थ वातावरणात रात्री कोण आहे मला इथे ओळखणारं, म्हणून मग मी त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. तर तो मुलगा माझ्याच ऑफिसमधला सहकारी निघाला. तो जिथे राहत होता तिथून त्याला आणि त्याच्या वडिलांना करोनाची लागण झाल्याच समजलं. ऍम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध न झाल्यानं तो आणि त्याचे वडील स्कुटरने नायर हॉस्पिटलमधून इथे आले होते. तो माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, सर मी दोन तास नायर हॉस्पिटलमध्ये ताटकळत उभा होतो. शेवटी इकडे आलो. त्याची ती कहाणी मनाला चटका लावून गेली.

त्याची झोपण्याची व्यवस्था माझ्याच बाजूला रिकाम्या बेडवर आम्ही करून घेतली. त्या मुलाने काहीही खाल्लेले नव्हते. माझ्याकडे त्यादिवशी एक केळ आणि काही बिस्कीट होती. ती त्याने पाण्यात बुडवुन खाल्ली. करोनाचा सामना करण्यासाठी ओळखीचा सहकारी मिळाला.

दिवस उजाडला अनोळखी पायधुणीचा अब्दुल्ला चाचा चहाचा सर्वांसाठी निरोप घेऊन आला आणि त्यादिवसापासून त्यांच्याविषयीचा निर्माण झालेला आदर हृदयात कायम राहिला.

आता पुन्हा नव्याने जगायचं ठरवलं.

काहीही झालं तरी या परिस्थितीला अजिबात शरण जायच नाही असा मनात निश्चय केला. त्यामुळे मी योगा-प्राणायमला सुरुवात केली. कारण इथे साठीच्या वरचे रुग्ण खूप होते. त्यांच्यातलेच एक पार्किसन्सच्या आजाराने त्रस्त होते. त्याही अवस्थेत जेवणाची थाळी रांगेत उभे राहून ते आपल्या बेडपर्यंत घेऊन येत होते. माझ्या बाजूला तिसरंच त्यांचं बेड होत. त्यांना धड खाताही येत नव्हतं, आणि निट बोलताही. मी त्यांना प्रेमाने हसून नमस्कार करत होतो, तेही मला हसून तसाच नमस्कार कसाबसा करत होते.

खरंतर त्या वॉर्डात मी आणि माझ्या ऑफिसमधला तो माझा सहकारी असे आम्ही दोघेच तरुण होतो. 24 एप्रिलच्या त्या दिवशी संशयित रुग्णांच्या वॉर्डातले ओळखीचे 45 वर्षाचे पोलीस अचानक भेटले आणि म्हणाले, ‘मित्रा नमस्कार…’
मी ही त्यांचं हसून स्वागत केलं.

त्यांच्यासोबत असलेल्या नर्सच्या कुटुंबातल्या तीन सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते घरी गेल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र नर्स, त्यांचे पती आणि दोन चिमुकली मुलं आमच्यासोबत करोनाशी दोन हात करत होते.

तिथल्या खिडक्या सताड उघड्या होत्या. आणि त्यातून येणारी हवादेखील आमच्या मनावरील ताण कमी करत होती. वेळ पुढे सरकत होता. दिलेल्या हाइड्रोक्लोरोक्वीन आणि व्हिटॅमिन सीच्या दिवसातून तीनदा गोळ्या आम्ही घेत होतो.

माझा तापही उतरला होता. त्यामुळे जरा शरीरात नवी ऊर्जा येत होती. आजवर मी कधीही रुग्णालयामध्ये दाखल झालो नव्हतो.
रात्री अजिबात लवकर झोप येत नव्हती. बेचैन होऊन सतत छताकडे एकटक पहात रहावंसं वाटायचं. प्रत्येकाला करोनाची लागण झाली होती मात्र प्रत्येकाचे दुःख सारखे नव्हते.

पुन्हा तो अब्दुल्ला चाचा आठवला. त्याच्यामध्ये खूप माणुसकी होती. पालघरमधल्या आदिवासी लोकांनी ठेचून मारलेल्या त्या साधुंच्या प्रकरणामध्ये काही करंट्या लोकांनी हत्याकांडाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. मुस्लिमांच्या माथी प्रकरण चिकटवून दिलं गेलं. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो प्रयत्न हाणून पाडण्याचाही सातत्याने प्रयत्न केला होता. दुसरीकडे, अब्दुल्ला चाचा जातपात, धर्म न पाहता केवळ माणुसकीच्या नात्याने लोकांना मदत करताना पाहून मला या प्रकरणाची आवर्जून आठवण झाली.

मोकळा वेळ होता पण तो अस्वस्थ करणारा होता. खूप काही आठवत राहायचं. इथे मला सफाई कामगारांचंही काम करावं लागलं. कारण तिथेसुद्धा मी शरण गेलो असतो तर साधा प्रात:र्विधी सुध्दा मला उरकता आला नसता. मी ते सफाई कामगारांचं कामही अतिशय आनंदाने करत होतो. बालपणी माझ्या आई वडिलांडून ज्या चांगल्या गोष्टी शिकता आल्या त्या आयुष्यात पुढेही कामी पडतात, याचा मी अनुभव घेत होतो. अचानक तुम्ही सार्वजनिक शौचालय इतरांसाठी किंवा स्वतःसाठी साफ करू शकत नाही. त्याची सवय आधी अंगीकारावी लागते. तरच तुमच्या अडचणी तुम्ही स्वत: सोडवू शकता, हे मला पटले होते. तिकडे करोनाशी दोन हात करताना डॉक्टर आणि नर्सदेखील करोनाबाधित झाल्याचे वृत्त मी पाहत होतो. सातत्याने महाराष्ट्रात करोनाचे भीषण रुप पसरताना मी आधीही आणि रुग्ण म्हणून पाहत होतो.

या आधीचे भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाग १ – BLOG : …आणि मला ताप आला!
भाग २ – BLOG: …संशयितांच्या रांगेतलं कुटुंब, अन् रिपोर्टची धाकधुक

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधल्या डॅाक्टरांबद्दलही काही तरी लिहिले पाहिजे, अस मला प्रामाणिकपणे वाटतेय. कारण मी ज्यावेळेस रुग्णालयात दाखल झालो होतो. त्यावेळीअगदी मोजकेच म्हणजे दोन ते तीन डॅाक्टर ओपीडीमध्ये दिसत होते. तितकाच स्टाफ तिथे काम करत होता. एवढा सन्नाटा आणि शुकशुकाट सेंट जॉर्जसारख्या वर्दळीच्या हॉस्पिटलमध्ये मी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे दुरून आलेल्या लोकांची काळजी घेण्याचे काम इथले डॅाक्टरच करत होते. हे डॅाक्टर म्हणजे रुग्णांसाठी देवदूतासारखं काम करत होते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की, नर्सेस एका वृद्धाच्या सेवेत लागल्या होत्या. कचरा साफ करणारे कामगार सुद्धा सुरुवातीला कमी पण नंतर स्टाफ वाढल्यावर बऱ्यापैकी येत होते. बाकी स्वच्छतेची लोकांचीही जबाबदारी तितकीच होती. करोना पॉझिटिव्ह आणि त्यात मधुमेह, हृदयरोग आणि इतर गंभीर आजारी असलेल्या रुग्णाची सुटका लवकर होत नव्हती. पण अर्थातच नर्सेस आणि डॉक्टर पीपीई किट घालून रोज आपल्या जीव धोक्यात घालून काम करत होते. या वॉर्डातील रुग्णांना आपल्या नातेवाईकना अजिबात भेटता येत नव्हतं. कुठलीही गोष्ट त्यांना पोहोचवता येत नव्हती. माझ्या त्या पोलीस मित्राला रोज पोलीस स्टेशनमधून जेवण मात्र येत होतं. एकदा त्याने माझ्यासाठीही जेवण मागवल होत. गेल्या पाच ते सहा दिवसांत पहिल्यांदाच मी ते जेवण जेवलो होतो. ओळखीच्या डॉक्टरकडून अध्येमध्ये फळे मिळत होती ती आम्ही कधी वाटून खात होतो.

आता मी करोना पॉझिटिव्ह झालो आहे, हे माझ्या आईला कसे सांगायचे हाच सर्वात मोठा प्रश्‍न माझ्या पुढे होता. जी आई मला रोज रात्री 10.30 वाजता नियमित फोन करायची. मुंबईत करोनाचा हाहा:कार माजला आहे, हे माहीत असल्याने ती काळजीने न चुकता ऑफिस सुटल्यावर फोन करायची. करोनातून बरा झाल्यावरच आनंदी होवून तिला फोन करायचं ठरल.

बाकी न चुकता रोजचे अपडेट माझ्या दिल्लीतल्या अनिल गायकवाड या मोठ्या भावाला आणि जावई संजय ठाकरे यांना मी देतच होतो. जवळच्या काहीच मित्रांना फक्त माहिती होती. त्यांचे नियमित फोन येत असल्यामुळे खूप बरं वाटायचं.

या काळात नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर रागिणी पारेख मॅडम या फोनवरून सारखी काळजीने विचारपूस करत होत्या. काही आवश्यक गोष्टीही त्यांनी मिळवून पोहोचत्या केल्या त्यांची खूपच मदत या काळात झाली. रुग्णालयाचे superintendent Doctor आकाश खोब्रागडे यांना फोन करून काही शंकाही मला दूर करता यायच्या. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने यांचा आधार खूप मोठा होता. या सर्व पत्रकारिता करत असताना गेल्या अनेक वर्षांपासूनच्या ओळखी कामी येत होत्या.

माझा मुलगा आशयला तर माझ्यापासून लागण झाली नसेल ना ही खूप मोठी भीती मनात होतीच. त्याविषयी डॉक्टरला विचारून झालं. कोणतीही लक्षण तरी त्यावेळी त्याला दिसत नव्हती. मात्र धास्ती कायम होती. उशिरा का होईना महापालिकेनं त्याची तपासणी केली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

ज्या बिल्डींगमध्ये करोना रुग्ण आढळतो, त्या सोसायटीला सील केल जात होत तशी माझीही सायन प्रतिक्षानगर मधली सोसायटी सील केली गेली होती. मी खूप काळजी घ्यायचो हे अनेकांना माहिती होत तरीही मला करोनाची बाधा झालीच कशी हा प्रश्न त्यांनाही पडला होता. काळजीने काहींचे मेसेज येत होते.

दिवस जात होते वेगवेगळे अनुभव येत होते… एका रात्री एक कॅन्सर पेशंट वॉर्डमध्ये आला. तो थेट चालत चालतच आमच्या बेडपर्यंत आला होता. माझ्या ऑफिसमधला सहकारी मला म्हणाला, बघा जरा धीर द्या सर त्याला… तुम्हीच ते करू शकता.. बाकी तर कोणी कुणाजवळ जात नव्हत. त्या पेशंटच्या जवळ जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. पण मी ती हिंमत जुळवत होतो. शेवटी त्या आजोबांना सांगितलं की, बेडवर आराम करा.. फिरू नका आता रात्री. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो वृद्ध खिन्न मनाने वॉर्डमध्ये दाखल झाला होता. बहुतांश रुग्ण वेगवेगळ्या भयंकर आजाराने ग्रसित होते. आणि त्यामुळे त्यांची प्रकृती लवकर खराब होत होती. त्यामुळेच त्यांना बरेच दिवस तिथे थांबावं लागत होतं.

अब्दुल चाचाला येऊन देखील 21 दिवस झाले होते. ते म्हणाले की, मी बरा झालो आहे तरीही मला घरी जाऊ देत नाहीत.. त्यांच्या आजाराची खरी कारण ही केवळ डॉक्टरांना च माहिती होती.

ऐका रात्री 2 वाजले होते. मला झोप लागत नव्हती. तेव्हाच एक बाई सिस्टर सिस्टर असं किंचाळत होती. मात्र तिथे कुणीच नव्हतं. म्हणून मग मीच सिस्टरला बोलवायला गेलो. तेव्हा तिथली सिस्टर मला म्हणाली, हो तिला ओटी मध्ये घेऊन जायचे आहे. ती सारखी किंचाळत होती. तिला खूप त्रास होत होता. शेवटी वॉर्डबॉय तयार होवून आला. आणि तेव्हाच मला एक सिस्टर काचेच्या बंद तिच्या खोलीतून खुणावत होती की तुम्हीही तिला मदत करा स्ट्रेचर वर ठेवायला.. पण हे माझ्यासाठी शक्य नव्हते. कारण माझ्या जवळ कुठलेही पीपीई किट नव्हते. आणि मी करोना बाधित रुग्ण होतो. शेवटी वॉर्ड बॉयने तिला ओटी मध्ये नेले. मी दारापर्यंत गेलो. दार उघडले तर दुरूनच तिची मुलगी तिला अम्मा अम्मा करून ओरडत होती. अशा असंख्य गोष्टी त्या करोनाच्या वॉर्डमध्ये घडत होत्या. त्यामुळे या सगळ्या वेदनादायी घटनांचा मी दिवसागणिक एक ज्वलंत साक्षिदार होत होतो. (क्रमशः)

(लेखक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सहसंपादक आहेत.)

या आधीचे भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाग १ – BLOG : …आणि मला ताप आला!
भाग २ – BLOG: …संशयितांच्या रांगेतलं कुटुंब, अन् रिपोर्टची धाकधुक