– रेश्मा राईकवार

गेले काही वर्ष सातत्याने ३००० कोटी रुपयांच्या पलिकडे उलाढाल असावी यासाठी धडपडणाऱ्या बॉलिवूड इंडस्ट्रीच्या प्रयत्नांना अखेर यश आले होते. गेल्यावर्षी ४००० कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडत मैलाचा दगड प्रस्थापित करणाऱ्या बॉलिवूडच्या गतीला यंदा मात्र करोना आपत्तीमुळे चांगलीच खीळ बसली आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मार्चपासून चित्रपटगृहांवर बंदी घातली गेली आणि चित्रिकरणावरही निर्बंध आले. दोन महिने नुकसानीच्या कळा सोसल्यानंतर चित्रीकरण आणि पोस्ट प्रॉडक्शनच्या कामांना हिरवा कंदील मिळाला आहे. मात्र जोवर चित्रपटगृहे सुरू होत नाहीत, तोपर्यंत आर्थिक उत्पन्नाचे दरवाजे उघडणार नाहीत. निदान जुलै-ऑगस्टमध्ये चित्रपटगृहे सुरू झाली तर, पुढच्या पाच महिन्यांत बॉलिवूड चित्रपटांना नक्कीच भरीव कमाई करता येईल, अशी अपेक्षा ट्रेड विश्लेषक व्यक्त करताना दिसतात.

बॉलिवूडचे स्टार कलाकार आणि त्यांचे ग्लॅमर अजूनही प्रेक्षकांना भुरळ घालते आहे. या स्टार कलाकारांचे भव्यदिव्य बजेटचे चित्रपटही तयार आहेत. या चित्रपटांची कुठल्याही माध्यमातून प्रसिध्दी करण्याचीही या कलाकारांची तयारी आहे. मात्र त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी तिकीट खरेदी करून चित्रपटगृहांत गर्दी करणाऱ्या दर्दी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणेच अशक्य झाले आहे. त्यातल्या त्यात बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने ओटीटीसारख्या नव्या माध्यमांची वाट चित्रपटांना सापडली आहे. पण हा यशाचा हमखास मार्ग नाही, असे ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी सांगितले. चित्रपटांची सर्वाधिक कमाई म्हणण्यापेक्षा त्यांचा नफा हा फक्त चित्रपटगृहांमधून जी तिकीटविक्री होते त्यावरच अवलंबून आहे हे वास्तव कधीही नाकारता येणार नाही. एखादा चित्रपट तयार झाल्यानंतर चित्रपटगृहातील त्याचे वितरण, संगीताचे हक्क, उपग्रह वाहिन्यांचे प्रसारण हक्क आणि आता ओटीटी प्रसारणाचे हक्क अशा वेगवेगळ्या मार्गाने निर्मात्याला उत्पन्न मिळते. सध्या चित्रपटांच्या निर्मितीचे खर्च, प्रसिध्दीसाठी येणाऱ्या खर्चाचे आकडेच इतके मोठे आहेत की उपग्रह वाहिनी आणि ओटीटीच्या प्रसारण हक्कातून फारतर चित्रपटाच्या प्रसिध्दीचा खर्च निघू शकतो. मात्र निर्मितीचा खर्च वगळून नफा मिळवण्यासाठी चित्रपट आजही तिकीटबारीवरच्या यशावरच अवलंबून आहेत, असे अतुल मोहन यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी बॉलिवूडचे ‘सूर्यवंशी’, ‘८३’, ‘कूली नं. १’, ‘लालसिंह चढ्ढा’ सारखे सगळेच मोठे चित्रपट चित्रपटगृहे पुन्हा सुरू कधी सुरू होतील याच्या प्रतिक्षेत आहेत.

डिसेंबरपर्यंत सध्या ४० ते ६० चित्रपट तयार आहेत. यातील १५ ते २० चित्रपट ओटीटीकडे गेले असे गृहीत धरले तरी ४० ते ४५ चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहणार आहेत. ओटीटी कंपन्यांनी ‘गुलाबो सिताबो’ सारखे मोठया कलाकारांचे पण सर्वसाधारण बजेट असलेले काही चित्रपट विकत घेतले आहेत. यातून निर्मात्यांना काही प्रमाणात उत्पन्न मिळेल. त्यांचा चित्रपटनिर्मितीचा खर्च यातून सुटेल आणि त्यावर काही अधिकचे पैसे त्यांना मिळतील, मात्र यातून चित्रपट व्यवसायाची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होणार नाही, अशी माहिती हिंदीतील प्रथितयश चित्रपट वितरकाने दिली. यावर्षी चित्रपट उद्योगाचा पन्नास टक्के महसूल तरी चित्रपटगृहांच्या व्यवसायावरच अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. जुलै-ऑगस्टमध्ये चित्रपटगृहे सुरू झाली तरी लोक लगेच चित्रपटगृहांपर्यंत येणार नाहीत. त्यासाठी मोठ्या चित्रपटाची गरज भासेल. आणि सध्या हॉलिूवडने तशी तयारी केली आहे. ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ‘टेनन’ हा चित्रपट जुलैमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. करोनानंतर प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट ठरणार आहे, अशी माहिती चित्रपट वितकर सनी चंदरामाणी यांनी दिली. पाठोपाठ ऑगस्टमध्ये वॉर्नर ब्रदर्सच्या ‘वंडर वुमन १९८४’ या चित्रपटासह आणखी २० हॉलिवूडपट यावर्षी भारतातही प्रदर्शित होणार आहेत. एकदा लोकांची चित्रपटगृहांमधील वर्दळ सुरू झाली की ऑक्टोबरपासून मिळणाऱ्या १२ आठवड्यांत हिंदीतील काही मोठे चित्रपट प्रदर्शित होतील. हॉलिवूडपट सातत्याने देशात ७० ते २०० कोटींच्या आसपास कमाई करत आले आहेत. त्यामुळे हॉलिवूडपट आणि बिग बजेट बॉलिवूडपट यांच्या कमाईतून चित्रपट व्यवसायाचे आर्थिक गणित पुन्हा एकदा वेग घेईल, असा विश्वाास ट्रेड विश्लेषकच नाही तर चित्रपटगृह मालकांकडूनही व्यक्त केला जातो आहे.

सहामाहीची परीक्षा देणारे चित्रपट

मुंबई आणि दिल्ली ही दोन शहरे जोपर्यंत पूर्ववत होत नाहीत तोवर हिंदीतील बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत. या दोन शहरांमधून एकूण व्यवसायापैकी ५० टक्के व्यवसाय होतो. शिवाय, देशभरात चित्रपटगृहे सुरू होण्याआधी अमेरिका आणि आखाती देशांमधील चित्रपटगृहे सुरू होतील जेणेकरून हिंदी चित्रपटांना त्यांची परदेशी बाजारपेठही खुली होईल. ही सगळी समीकरणे लक्षात घेऊन २ ऑक्टोबरला रणवीर सिंगचा ‘जयेशभाई जोरदार’, ‘बंटी और बबली २’ नोव्हेंबरमध्ये आणि दसरा-दिवाळीत अनुक्रमे ‘कुली नं. १’, ‘सूर्यवंशी’ असे काही चित्रपट प्रदर्शित होतील. यासह सिध्दार्थ मल्होत्रा, इम्रान हाश्मी, अजय देवगण अशा मोठ्या कलाकारांचेही काही चित्रपट प्रदर्शित होतील. मात्र ‘पृथ्वीराज’, ‘लालसिंह चढ्ढा’सारखे काही चित्रपट पुढच्या वर्षीपर्यंत पुढे ढकलले गेले आहेत.