10 August 2020

News Flash

Coronology: कडीकुलुपे उघडल्यानंतर आता काय?

काळजी न घेतल्यास करोनाचा फैलाव याहूनही अधिक मोठा होण्याची शक्यता

– मोहन अटाळकर

सद्यस्थितीत अमरावती शहरातील बाजारपेठांमधील गर्दी बघता, अमरावतीकर करोनाच्या सावटातून बाहेर पडले, असे वाटू शकेल. पण, याचा अर्थ विषाणूची साथ संपली असा अजिबात होत नाही. दोन महिन्यांच्या टाळेबंदीत घरकोंडीच्या जाचाने तावून-सुलाखून निघालेल्या अमरावतीकरांनी आता करोनाशी जुळवून घ्यायचे ठरवलेले दिसतंय. अन्यथा इतक्या वेगाने जनजीवन सुरळीत होताना दिसले नसते. आता तर कुठलेही निर्बंध उठण्याची प्रतीक्षा न करता लोक जनजीवनाला पूर्वपदावर आणण्याच्या कमाला लागले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी टाळेबंदी-संचारबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू झाली, तेव्हा अमरावतीकरांच्या मनात घर करून बसलेला भयंगड आता जवळपास अदृश्य झाला आहे. धोका आहे, पण भीतीने मरण्यापेक्षा धोक्याला जाऊन भिडावे आणि त्याच्याशी दोन हात करून मरावे-जगावे, असे एकूण वातावरण आहे.

अमरावती शहरात गेल्या ३ एप्रिलला पूर्वेकडील हाथीपुरा भागातून सुरू झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता शहरात चहूबाजूने ६०च्यावर वस्त्यांमध्ये पोहचला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दहा गावांमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे. दररोज नवीन वस्त्यांमधून करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने समूह संक्रमणाकडे तर वाटचाल होत नाही ना, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. पण, हे भय बाजारपेठांमधून जाणवत नाहीये. टाळेबंदीच्या एका महिन्याच्या कालावधीत केवळ एकाचा मृत्यू आणि सहा करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या अमरावतीत अवघ्या दहा-बारा दिवसांमध्ये आणखी नऊ मृत्यू झाल्यानंतर घबराट पसरली होती. आता बळींचा आकडा १७ वर आणि रुग्णांची संख्या तीनशेच्या जवळपास पोहचली आहे. निम्म्याहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी पोहचल्याचे समाधान आरोग्य यंत्रणेला आहे.

शहरात २२ एप्रिलपर्यंत करोनाचा उद्रेक जाणवलेला नव्हता. हाथीपुरा या पश्चिमेकडील भागात २ एप्रिलला एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तेव्हाच धोक्याचा इशारा मिळाला होता. टाळेबंदीचा पहिला टप्पा १४ एप्रिलला संपला तेव्हा शहरातील एक मृत आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यच करोनाबाधित आढळून आले होते, पण अवघ्या काही दिवसांमध्ये परिस्थिती बदलली. हाथीपुरानंतर नुरानी चौक, हैदरपुरा, कमेला ग्राऊंड या भागातूनही करोनाबाधित रुग्ण दिसून आले. सुरुवातीला अवघ्या तीन ते चार वस्त्यांमध्ये असलेला करोनाचा संसर्ग आता शहरातील विविध साठ वस्त्यांमध्ये पोहचला आहे.

रुग्णाच्या संसर्गाचा इतिहास शोधणे आता अवघड बनले आहे. अरुंद गल्ल्या आणि दाटीवाटीची वस्ती यामुळे या भागात देखरेख ठेवणे हे पोलिसांसाठी आव्हानात्मकच होते. सुरुवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर काम भागवले गेले, पण जेव्हा उद्रेक दिसून आला, तेव्हा या भागात अतिरिक्त पोलीस कुमक पाठविण्यात आली. ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येऊ लागली. पण, लोकांचा संचार मात्र कमी होऊ शकला नाही. प्रतिबंधित क्षेत्रातही भाजीविक्री, फळविक्री सुरूच होती. पोलिसांनी या विक्रेत्यांवर कारवाईही केली. लोकांची बेपर्वा वृत्ती करोनाच्या फैलावासाठी अनुकूल वातावरण तयार करीत होती.

शहरातील घाऊक भाजीबाजारात होणारी प्रचंड गर्दी पाहून सायन्सकोर, दसरा मैदान या ठिकाणी भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, याही ठिकाणी जत्रा भरत होती. अखेरीस भाजीपाला विक्रीच बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.

आता शहरातील मुख्य बाजारपेठ हे सम-विषम तारखांच्या निकषांवर उघडण्यात आली आहे. घाऊक भाजीबाजार, फळ बाजार खुला करण्यात आला आहे. रस्त्यांवर आता प्रचंड गर्दी दिसू लागली आहे. त्याचवेळी रोज नवनव्या वस्त्यांमधून करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

करोना संसर्गाची भीती आहे, पण हे भय उराशी बाळगून किती दिवस तसेच बसून राहणार, ही अमरावतीकरांची प्रतिक्रिया आहे. ज्यांना सरकारी नोकरी किंवा सुरक्षित उत्पन्नाची सोय उपलब्ध आहे, त्यांच्यासाठी घरी राहणे सहज-सोपे, पण हातावर पोट असलेल्यांना घराच्या बाहेर पडावेच लागणार होते. अशा कष्टकऱ्यांनी आता करोनाची भीती मनातून दूर सारून कामावर परतण्याची लगबग सुरू केली आहे. पण, काळजी न घेतल्यास करोनाचा फैलाव याहूनही अधिक मोठा होण्याची शक्यता आहेच.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहा गावांमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. ग्रामीण भागात भयमुक्त वातावरण होते. बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करू नये, म्हणून अडथळे उभे करण्यात आले होते, तरीही स्थलांतरीत व्यक्तींकडून अनेक गावांमध्ये करोनाचा प्रवेश झाला. आधीचे भयमुक्त वातावरण संपले आहे. ग्रामीण भागातही आता अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 8:00 am

Web Title: coronology coronavirus situation in amravati after lockdown and unlock pkd 81
Next Stories
1 Coronology: खेळ मांडला!
2 का?
3 Coronology: आधीच्या चुकांपासून बोध घेण्याची गरज…
Just Now!
X